मॉस्को/किव्ह – रशियन फौजांकडून सातत्याने सुरू असणाऱ्या हल्ल्यांमुळे सेव्हेरोडोनेत्स्क मधील युक्रेनी फौजा शहराबाहेर ढकलल्या गेल्या आहेत, असा दावा लुहान्स्कमधील वरिष्ठ युक्रेनी अधिकाऱ्यांनी केला. नजिकच्या काळात युक्रेनी तुकड्यांना पूर्ण माघार घेऊन शहराबाहेर सुरक्षित जागी आश्रय घेणे भाग पडेल, असेही युक्रेनी अधिकाऱ्यांनी बजावले. तर डोन्बासमधील संघर्षात युक्रेनी फौजांना जबर नुकसान सहन करावे लागल्याचा दावा रशियाच्या संरक्षणदलांनी केला आहे.
गेल्या आठवड्यात डोन्बासमधील सेव्हेरोडोनेत्स्क शहरावरील ताब्यासाठी रशिया व युक्रेनच्या फौजांमध्ये निर्णायक संघर्ष पेटला होता. रशियन फौजांनी सातत्याने हल्ले करून युक्रेनी फौजांना मागे रेटण्यास सुरुवात केली होती. मात्र युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष तसेच वरिष्ठ अधिकारी युक्रेनी फौजा रशियन हल्ले परतवून ठामपणे उभे असल्याचा दावा करीत होते. मात्र हे दावे फोल असल्याचे लुहान्स्कमधील युक्रेनी गव्हर्नरने दिलेल्या माहितीतून स्पष्ट झाले. अवघ्या 24 तासांपूर्वी लुहान्स्कमधील गव्हर्नर सर्चिय हैदाई यांनी सेव्हेरोडोनेत्स्कमधून युक्रेनी फौजांना माघार घ्यावी लागेल, असे भाकित केले होते.
बुधवारी युक्रेनी फौजा शहराच्या बाहेरील सीमाभागांमध्ये ढकलल्या गेल्याची कबुली गव्हर्नर हैदाई यांनी दिली. युक्रेनी फौजा शहराचा बाहेरील भाग नियंत्रणात ठेवण्यासाठी लढत आहेत, असे लुहान्स्कच्या गव्हर्नरनी स्पष्ट केले. त्यामुळे रशियाने सेव्हेरोडोनेत्स्कवर जवळपास नियंत्रण मिळविल्याचे स्पष्ट झाले आहे. रशियाचे संरक्षणमंत्री शोईगु यांनी मंगळवारीच डोन्बासचा भाग असलेल्या लुहान्स्क प्रांताच्या 97 टक्के क्षेत्रावर रशियाने ताबा मिळविल्याचे जाहीर केले होते.
दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी आपण रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी थेट चर्चा करण्यास तयार असल्याचे वक्तव्य केले आहे. जर युद्ध थांबविण्यासंदर्भात गांभीर्याने विचार केला जात असेल तर आपण रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी बोलणी करण्यास तयार आहोत, असे झेलेन्स्की यांनी सांगितले. मंगळवारी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी परदेशी नेते तसेच माध्यमांमधून रशियाशी वाटाघाटी करण्याबाबत दडपण आणले जात असल्याचा दावा केला होता.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |