मॉस्को/किव्ह – युरोपिय देशांनी युक्रेनला अण्वस्त्रे पुरविण्याचा निर्णय घेतला तर युरोप जगाच्या नकाशावरून नाहीसा होईल, असा सज्जड इशारा रशियाचे वरिष्ठ नेते विआचेस्लाव वोलोदिन यांनी दिला. काही दिवसांपूर्वी पोलंडच्या माजी संरक्षणमंत्र्यांनी युक्रेनला अण्वस्त्रे देण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यावर रशियाकडून ही आक्रमक प्रतिक्रिया उमटली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी यापूर्वीच रशियाच्या ‘न्यूक्लिअर फोर्सेस’ना अलर्टवर राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर रशिया-युक्रेन युद्ध सुरू असतानाच रशियाने दोन अण्वस्त्र चाचण्या घेतल्याची माहितीही समोर आली आहे.
रशियाने युक्रेन मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू केल्यापासून युक्रेन व त्याला समर्थन देणाऱ्या पाश्चिमात्य देशांना मोठे धक्के बसत असल्याचे दिसून येत आहे. रशियाने युक्रेनच्या डोन्बास क्षेत्रात मोठी आघाडी मिळविली असून युक्रेनी लष्कराची पिछेहाट सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर युक्रेनकडून मोठ्या प्रमाणावर प्रगत शस्त्रांची मागणी होत आहे. या संदर्भात वक्तव्य करतानाच पोलंडचे माजी परराष्ट्रमंत्री रॅडोस्लाव सिकोर्स्की यांनी युक्रेनला अण्वस्त्रे पुरवायला हवीत, असे वक्तव्य केले. रशियाने युक्रेन तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील करार मोडले असल्याने युक्रेनला अण्वस्त्रे दिली जाऊ शकतात, असे खळबळजनक विधान पोलंडच्या माजी मंत्र्यांनी केले होते.
या विधानावर रशियाने तीव्र प्रतिक्रिया नोंदविली. ‘सिकोर्स्की युरोपात अणुयुद्धाची चिथावणी देत आहेत. वक्तव्ये करताना त्यांनी युक्रेन किंवा पोलंडच्याही भविष्याचा विचार केलेला दिसत नाही. जर त्यांच्या मागणीला प्रतिसाद दिला गेला, तर युक्रेन किंवा पोलंड शिल्लक राहणार नाहीत. युरोपही जगाच्या नकाशावरून नाहीसा होईल’, असा इशारा रशियन संसदेचे सभापती वोलोदिन यांनी दिला. सिकोर्स्की व त्यांच्यासारखे इतर जण करीत असलेल्या वक्तव्यांमुळेच युक्रेन अण्वस्त्रमुक्त असणे व या देशाचे निर्लष्करीकरण करणे का महत्त्वाचे आहेहे समजते, असा टोलाही रशियन सभापतींनी पुढे लगावला.
दरम्यान, युक्रेनने रशियन हद्दीतील एका तळावर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचे वृत्त समोर आले आहे. रशियाच्या ब्रिआन्स्क प्रांतातील क्लिंन्त्सी गावानजिक हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येते. हल्ल्यात चार जण जखमी झाले असून अनेक घरे व इमारतींचे नुकसान झाले आहे. पाश्चिमात्य माध्यमांनी युक्रेनकडून रशियन तळ लक्ष्य करण्यात आल्याचा दावा केला आहे. मात्र युक्रेनने त्याला दुजोरा दिलेला नाही. याच पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी, युक्रेनचे लष्कर डोनेत्स्क व लुहान्स्कसह क्रिमिआलाही रशियन नियंत्रणातून मुक्त करेल, असा दावा केला आहे. सोमवारी रात्री देशाला उद्देशून प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत झेलेन्स्की यांनी सदर वक्तव्य केल्याचे समोर आले. गेल्या काही दिवसात युक्रेनवर शांतीकरारासाठी दडपण आणल्याची वृत्ते प्रसिद्ध होत असताना राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केलेले वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |