मॉस्को/किव्ह – लुहान्स्क प्रांतावरील ताब्यानंतर रशियन संरक्षणदलांनी आपल्या हल्ल्यांची तीव्रता व व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढविली आहे. रशियन फौजांनी एकाच वेळी डोन्बास क्षेत्रातील स्लोव्हिआन्स्क, क्रॅमाटोर्स्क व बाखमत शहरांच्या दिशेने आगेकूच सुरू केल्याचे सांगण्यात येते. त्याचवेळी पश्चिम तसेच दक्षिण युक्रेनमध्ये क्षेपणास्त्रहल्ल्यांची संख्याही वाढविण्यात आल्याची माहिती युक्रेनने दिली. दरम्यान, युक्रेनी ड्रोन्सचे हल्ले रोखण्यासाठी रशियाने प्रगत ‘इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेपन्स सिस्टिम’ वापरल्याची माहिती रशियन सूत्रांकडून देण्यात आली. या युद्धात ‘इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेपन्स’चा वापर होण्याची ही पहिलीच घटना ठरते.
लुहान्स्क प्रांतावरील ताब्यानंतर रशियन संरक्षणदलांनी आपला मोर्चा डोन्बास क्षेत्रातील डोनेत्स्क प्रांताकडे वळविला आहे. गेल्या आठवड्यात लुहान्स्कवर पूर्ण नियंत्रण मिळविल्यानंतर रशियन लष्कर व समर्थक बंडखोरांनी डोनेत्स्कमधील महत्त्वाच्या शहरांवर हल्ले सुरू केले. यात स्लोव्हिआन्स्क, क्रॅमाटोर्स्क व बाखमतचा समावेश आहे. रशियन फौजांचे पहिले लक्ष्य स्लोव्हिआन्स्क असून त्यावर रणगाडे, तोफा व रॉकेटस्च्या सहाय्याने जबरदस्त मारा करण्यात आला. मंगळवारी झालेल्या हल्ल्यांमध्ये स्लोव्हिआन्स्कमध्ये काही जणांचा बळी गेल्याची माहितीही समोर आली आहे. ब्रिटनच्या संरक्षणविभागाने दिलेल्या वृत्तात रशियन फौजा या शहरापासून अवघ्या 10 मैलांवर येऊन ठेपल्याचे सांगण्यात आले.
या वाढत्या हल्ल्यांमुळे स्थानिक प्रशासनाने शहरातील नागरिकांना स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारपासून शहराच्या बाहेर पडण्यासाठी बससह इतर वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली असून 24 तासात हजारो नागरिक बाहेर पडल्याचे सांगण्यात येते. स्लोव्हिआन्स्कव्यतिरिक्त युक्रेनच्या इतर भागांमध्येही रशियाकडून हल्ले करण्यात आले. त्यात पश्चिम युक्रेनमधील ख्मेल्नित्स्की प्रांतासह सुमी व मायकोलेव्ह या शहरांचा समावेश आहे. या शहरांवर क्षेपणास्त्रहल्ले झाल्याची माहिती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी दिली.
दरम्यान, युक्रेनमधील युद्धात पहिल्यांदाच प्रगत ‘इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेपन सिस्टिम’चा वापर केल्याची माहिती रशियन संरक्षणदलांकडून देण्यात आली. युक्रेनी ड्रोन्सच्या विरोधात रशियाने ‘स्टुपर इलेक्ट्रोमॅग्नेटिक गन्स’चा वापर केला. या गन्सच्या सहाय्याने ड्रोन व ड्रोन ऑपरेटरमधील संपर्क तोडण्यात येतो, असे रशियन सूत्रांनी सांगितले. डोन्बास प्रांतातील संघर्षात याचा वापर झाल्याचे संकेत रशियन सूत्रांनी दिले. यापूर्वी रशियाने हायपरसोनिक क्षेपणास्त्रे तसेच लेझर वेपन्सचा वापर केल्याचेही जाहीर केले होते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |