मॉस्को/किव्ह – युक्रेनने क्रिमिआवर हल्ल्याचा प्रयत्न केलाच तर तो दिवस युक्रेनसाठी अखेरचा दिवस ठरेल, असा सज्जड इशारा रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्रि मेदवेदेव्ह यांनी दिला. रशिया इतका प्रचंड व जबरदस्त हल्ला चढवेल की युक्रेनमधील कोणालाच लपण्यासाठीही जागा उरणार नाही, असेही मेदवेदेव्ह यांनी बजावले. काही दिवसांपूर्वीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी, युक्रेनचे लष्कर क्रिमिआवरही ताबा मिळवेल, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर युक्रेनचे लष्करी अधिकाऱ्यांनी अमेरिका व पाश्चिमात्य देशांनी दिलेल्या शस्त्रांच्या सहाय्याने क्रिमिआवर हल्ले चढविण्याची धमकी दिली होती. या पार्श्वभूमीवर, रशियाच्या प्रमुख नेत्यांनी दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.
गेल्या महिन्यात रशिया-युक्रेन शांतीचर्चेबाबत माध्यमांमधून विविध प्रकारचे दावे प्रसिद्ध झाले होते. त्यात जगातील आघाडीचे मुत्सद्दी तसेच विश्लेषकांनी युक्रेनला काही भाग सोडून द्यावा लागेल, अशा स्वरुपाचे आवाहन केले होते. त्यावर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. युक्रेनी जनता गमावलेला सर्व भूभाग परत मिळवेल व त्यात क्रिमिआचाही समावेश असेल, असे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी बजावले होते. त्यानंतर युक्रेनने रशियन फौजांना मागे लोटण्यासाठी प्रतिहल्ले चढविण्याची नवी मोहीमही हाती घेतली होती. या मोहिमेबाबत बोलताना, अमेरिकी शस्त्रांच्या सहाय्याने क्रिमिआवरही हल्ले चढविले जातील असा दावा युक्रेनच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी केला होता. त्याला रशियन नेतृत्त्वाकडून प्रत्युत्तर मिळाल्याचे दिसते. माजी राष्ट्राध्यक्ष व सिक्युरिटी कौन्सिलचे उपप्रमुख मेदवेदेव्ह यांनी वोल्गोग्रॅड शहरातील एका कार्यक्रमात युक्रेनला सज्जड इशारा दिला. ‘काही रक्तपिपासू विदूषक बेछूट वक्तव्ये तसेच रशियाला धमक्या देण्याची कामे करीत आहेत. त्यात क्रिमिआवर हल्ला चढविण्याचा धमक्यांचा समावेश आहे. अशा प्रकारच्या कारवायांचे परिणाम भयावह असतील हे त्यांनी लक्षात ठेवावे’, असा इशारा मेदवेदेव्ह यांनी दिला.
‘क्रिमिआवर हल्ल्याचा प्रयत्न जरी झाला तरी पूर्ण युक्रेनला त्याचे कठोर प्रत्युत्तर मिळेल आणि त्यांच्यासाठी तो दिवस आयुष्यातील अखेरचा दिवस ठरेल. रशिया इतका जबरदस्त हल्ला चढवेल की युक्रेनमधील कोणालाही लपण्यासाठी जागा शिल्लक राहणार नाही. याची पूर्ण जाणीव असतानाही युक्रेनचे नेतृत्त्व बेजबाबदार व चिथावणी देणारी वक्तव्ये करीत आहे’, असे रशियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी बजावले. काहीही झाले तरी रशिया युक्रेन मोहिमेची उद्दिष्टे पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाही याची जाणीव युक्रेनला कोणत्या तरी टप्प्यावर नक्कीच होईल, अशा जहाल भाषेत मेदवेदेव्ह यांनी युक्रेनला समज दिली.
दरम्यान, रशियाच्या फौजांनी ओडेसा शहरावरील युक्रेनी तळावर हल्ला करून अमेरिकेने दिलेल्या ‘हार्पून’ क्षेपणास्त्रांचा मोठा साठा नष्ट केल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली. डोनेत्स्क प्रांतात अमेरिकेने दिलेले ‘हायमार्स लाँचर्स’ही उद्ध्वस्त केल्याचे संरक्षण विभागाने सांगितले.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |