डोन्बास क्षेत्रात रशियाची आगेकूच सुरू असतानाच अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांकडून युक्रेनचे शस्त्रसहाय्य वाढविण्याचे संकेत

युक्रेनचे शस्त्रसहाय्य

वॉशिंग्टन/मॉस्को/किव्ह – रशियाच्या लष्करी मोहिमेची उद्दिष्टे केवळ डोन्बासपुरतीच मर्यादित नसून दक्षिण युक्रेन तसेच इतर भागांमध्येही हल्ले करण्यात येतील, असा इशारा रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी नुकताच दिला होता. रशिया आपल्या मोहिमेची व्याप्ती वाढवित असतानाच अमेरिकेसह इतर पाश्चिमात्य देशांनी युक्रेनचे शस्त्रसहाय्य अधिक वाढविण्याचे संकेत दिले. बुधवारी पार पडलेल्या ‘युक्रेन कॉन्टॅक्ट ग्रुप’च्या बैठकीत यासंदर्भात घोषणा करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच युक्रेनचे संरक्षणमंत्री अलेक्सी रेझ्निकोव्ह यांनी, पाश्चिमात्य संरक्षण कंपन्यांनी त्यांची नवी शस्त्रे व यंत्रणा यांची चाचणी युक्रेनमध्ये घ्यावी, असे आवाहन केल्याचेही समोर आले आहे.

युक्रेनचे शस्त्रसहाय्य

पूर्व युक्रेनच्या डोन्बास भागातील लुहान्स्क प्रांतावर नियंत्रण मिळविल्यानंतर रशियाने डोनेत्स्कमध्ये जबर मारा सुरू केला आहे. गेले काही दिवस सातत्याने सिव्हेर्स्क, बाखमत व स्लोव्हियान्स्क शहरांवर क्षेपणास्त्रे, रॉकेट्स व तोफांच्या सहाय्याने हल्ले करण्यात आले. रशियन लष्करी तुकड्या सिव्हेर्स्कमध्ये शिरकाव करण्यात यशस्वी ठरल्या असून बाखमत शहराजवळील काही भागांवरही नियंत्रण मिळविल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली. मात्र रशियन हल्ले एवढ्यापुरतेच मर्यादित नसून दक्षिण युक्रेनमधील मायकोलेव्ह व ओडेसानजिकही रशियाने क्षेपणास्त्र हल्ले चढविले आहेत. उत्तर तसेच मध्य युक्रेनमधील काही शहरांनाही रशियन हल्ल्यांचा फटका बसला आहे. या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित तसेच मालमत्ता हानी झाल्याचा दावा युक्रेन सरकारने केला.

युक्रेनचे शस्त्रसहाय्य

रशियाने हल्ल्यांची व्याप्ती वाढविल्याने युक्रेनसह पाश्चिमात्य देशांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. युक्रेनने रशियन आघाडीला धक्का देण्यासाठी प्रतिहल्ले सुरू केले आहेत. या प्रतिहल्ल्यांची तीव्रता वाढविण्यासाठी युक्रेनने पाश्चिमात्य देशांकडे पुन्हा एकदा वाढीव शस्त्रसाठ्याची मागणी केली आहे. अमेरिका, ब्रिटन व युरोपिय महासंघाने या मागणीला प्रतिसाद दिला असून अतिरिक्त शस्त्रसहाय्याची घोषणा केली.

अमेरिकेकडून युक्रेनला चार अतिरिक्त ‘हायमार्स सिस्टिम्स’ पुरविण्यात येणार आहेत. युरोपिय महासंघाने युक्रेनला 50 कोटी डॉलर्सचे नवे संरक्षणसहाय्य जाहीर केले. तर ब्रिटनने रॉकेट सिस्टिम्ससह इतर सहाय्याचे संकेत दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या दौऱ्यावर असणाऱ्या युक्रेनच्या ‘फर्स्ट लेडी’ ओलेना झेलेन्स्का यांनी अमेरिकी संसदेत केलेल्या भाषणात ‘एअर डिफेन्स सिस्टिम्स’ची मागणी केल्याचे वृत्त समोर आले.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी क्रिमिआच्या मुद्यावरून युक्रेनला बजावणारे माजी रशियन राष्ट्राध्यक्ष दिमित्रि मेदवेदेव्ह यांनी नवा इशारा दिला. ‘नाटो वेगाने रशियन सीमेनजिक येत असून त्यातून खरे महायुद्ध भडकण्याचा धोका आहे. रशियाने युक्रेनवर केलेले आक्रमण व पाश्चिमात्यांनी दिलेले प्रत्युत्तर यामुळे युक्रेन आपले सार्वभौमत्त्व गमावून बसेल व जगाच्या नकाशावरून नाहीसा होईल’, असा इशारा मेदवेदेव्ह यांनी दिला.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info