मॉस्को/किव्ह – पूर्व युक्रेनमधील सर्वात मोठा ऊर्जा प्रकल्प असणाऱ्या ‘वुहलहिर्स्क पॉवर प्लँट’वर ताबा मिळविल्याचा दावा रशियन फौजांनी केला आहे. लुहान्स्क प्रांतावरील नियंत्रणानंतर पूर्व युक्रेनमध्ये रशियाला मिळालेले हे दुसरे मोठे सामरिक यश ठरते. मात्र युक्रेनने रशियाचे दावे फेटाळले असून प्रकल्पावर रशियाचा पूर्ण ताबा नसल्याचे म्हटले आहे. पूर्व युक्रेनमधील हा संघर्ष दिवसेंदिवस अधिक प्रखर होत असतानाच रशियाने पुन्हा एकदा राजधानी किव्ह व इतर भागांमध्ये मोठे क्षेपणास्त्र हल्ले चढविल्याचे समोर आले.
युक्रेनने गेल्या काही दिवसांमध्ये रशियाने ताब्यात घेतलेल्या युक्रेनी प्रांतांवर प्रतिहल्ले चढविण्यास सुरुवात केली होती. हे प्रतिहल्ले रशियाच्या पूर्व युक्रेनमधील मोहिमेची गती मंदावण्यास कारणीभूत ठरतील, असे दावे काही विश्लेषकांनी केले होते. मात्र हे दावे खोटे ठरले असून रशियाकडून डोनेत्स्क प्रांतातील हल्ल्यांची तीव्रता अधिकच वाढविण्यात आली आहे. या मोहिमेसाठी रशियाने कंत्राटी जवानांची कंपनी असणाऱ्या ‘वॅग्नर ग्रुप’ची पथकेही तैनात केल्याचे समोर आले आहे.
डोनेत्स्कमधील ‘वुहलहिर्स्क पॉवर प्लँट’च्या ताब्यामागे ‘वॅग्नर ग्रुप’चा सहभाग असल्याचे स्पष्ट होत आहे. रशियन माध्यमांवर यासंदर्भातील काही फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाले आहेत. त्याचवेळी ब्रिटीश गुप्तचर यंत्रणांकडून दिल्या जाणाऱ्या माहितीतही याला पुष्टी देण्यात आली. पूर्व युक्रेनला वीजपुरवठा करण्यात सदर वीजप्रकल्पाची महत्त्वाची भूमिका असल्याने यावरील ताबा रशियासाठी मोठे यश मानले जाते. या ऊर्जाप्रकल्पाबरोबरच आजूबाजूची काही गावेदेखील ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येते.
पूर्व युक्रेनमधील हल्ले सुरू असतानाच राजधानी किव्ह, खार्किव्ह तसेच मध्य युक्रेनमध्ये क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. राजधानी किव्हच्या उत्तरेस असलेल्या लष्करी तळाला लक्ष्य करण्यात आल्याचे रशियन संरक्षण विभागाने सांगितले. गुरुवारी सकाळी खार्किव्ह भागातील चुहिव शहरावर क्षेपणास्त्रहल्ले करण्यात आले. यात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचे संकेत युक्रेनी अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
दुसऱ्या बाजूला युक्रेनने रशियाचे नियंत्रण असलेल्या दक्षिण युक्रेनमधील खेर्सनमध्ये प्रतिहल्ले चढविले आहेत. या भागातील तीन महत्त्वाच्या पुलांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती युक्रेनने दिली. खेर्सनमधील रशियन फौजेचा रस्त्यामार्गे असलेला संपर्क तुटल्याचा दावाही युक्रेनी अधिकाऱ्यांनी केला. मात्र रशियाने हे वृत्त नाकारले असून दक्षिण युक्रेनमधील भागांसाठी अतिरिक्त लष्करी तैनाती करण्यात येत असल्याचे जाहीर केले.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |