युक्रेनमधील अणुऊर्जा प्रकल्पावरून रशियाने सुरक्षा परिषदेची बैठक बोलावली

सुरक्षा परिषदेची बैठक

किव्ह/मॉस्को – युक्रेनमधील झॅपोरिझिआमध्ये असणाऱ्या अणुऊर्जा प्रकल्पावर युक्रेनी लष्कर हल्ले चढवित असल्याचा ठपका ठेवत रशियाने या मुद्यावर सुरक्षा परिषदेची बैठक बोलावली आहे. संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या अणुऊर्जा आयोगाने सुरक्षा परिषदेत युक्रेनकडून सुरू असलेल्या चिथावणीखोर कारवायांची माहिती द्यावी, अशी मागणी रशियाचे संयुक्त राष्ट्रसंघटनेतील वरिष्ठ अधिकारी दिमित्रि पोलियान्स्की यांनी केली. गेल्या काही दिवसात झॅपोरिझिआ अणुप्रकल्पाचा मुद्दा चांगलाच चिघळला असून त्यात दुर्घटना घडल्यास संपूर्ण युरोपला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा रशियाने दिला आहे. युक्रेनने रशियाचे आरोप फेटाळले असून प्रकल्पात घडणाऱ्या घटनांसाठी रशियालाच जबाबदार धरण्यात यावे, अशी भूमिका घेतली आहे.

सुरक्षा परिषदेची बैठक

फेब्रुवारी महिन्यात युक्रेनवर चढविलेल्या हल्ल्यानंतर काही आठवड्यांमध्ये रशियाने युक्रेनमधील झॅपोरिझिआ अणुप्रकल्पावर ताबा मिळविला होता. सदर प्रकल्प युक्रेनसह युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पांपैकी एक असून त्याची क्षमता तब्बल सहा हजार मेगावॅट इतकी आहे. या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात संवर्धित युरेनियम तसेच अणुइंधनाचा साठा आहे. सध्या या प्रकल्पात युक्रेनी कंपनीचे कर्मचारीच कार्यरत आहेत.

युक्रेनने गेल्या महिन्यात दक्षिण युक्रेनमध्ये रशियाच्या ताब्यात असणाऱ्या भागांवर प्रतिहल्ले सुरू केले होते. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये हा प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रशियाने या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात लष्कर तसेच प्रगत संरक्षणयंत्रणा तैनात केल्या आहेत. रशियाच्या या तैनातीला धक्का देण्यासाठी युक्रेनी फौजा प्रकल्पाच्या नजिकच्या परिसराला लक्ष्य करीत असल्याचे सांगण्यात येते. मात्र युक्रेन तसेच पाश्चिमात्य यंत्रणांनी हे दावे फेटाळले असून रशियाच प्रकल्पाच्या परिसरात हल्ले घडवून त्याचे खापर युक्रेनवर फोडत असल्याचे म्हटले आहे. मात्र रशियाने युक्रेनच हल्ले चढवित असल्याचे ठासून सांगितले असून याविरोधात थेट सुरक्षा परिषदेत धाव घेतल्याने या प्रकरणाला गंभीर वळण लागल्याचे दिसत आहे.

सुरक्षा परिषदेची बैठक

दरम्यान, झॅपोरिझिआ अणुप्रकल्पात कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास रशिया अमेरिका व ब्रिटनवर अण्वस्त्रहल्ला चढविल अशी धमकी रशियाच्या युरी कोट यांनी दिली. कोट हे रशियन माध्यमांमध्ये अँकर म्हणून कार्यरत असून कट्टर पुतिन समर्थक अशी त्यांची ओळख आहे.

युक्रेनमधील अणुऊर्जा प्रकल्पाबरोबरच रशियाने नाटोकडून युरोपात करण्यात येणाऱ्या अण्वस्त्रांच्या तैनातीवरही टीकास्त्र सोडले. नाटोने स्वतःला ‘न्यूक्लिअर अलायन्स’ म्हणून घोषित केले असून ‘नॉन न्यूक्लिअर’ देशांमध्ये अण्वस्त्र तैनाती सुरू आहे. हे अण्वस्त्रप्रसारबंदी कायद्याचे उल्लंघन ठरते. यामुळे आण्विक संघर्षाचा धोका अधिकच बळावल्याचे रशियाने बजावले आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info