मॉस्को/किव्ह – युक्रेनने गुरुवारी झॅपोरिझिआमध्ये असणाऱ्या अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ले चढविल्याचा आरोप रशियन अधिकाऱ्यांनी केला. युक्रेनच्या या बेजबाबदार हल्ल्यांमुळे जग आण्विक संकटाच्या दिशेने ढकलले जात असल्याचा इशारा रशियाचे संयुक्त राष्ट्रसंघटनेतील राजदूत वॅसिली नेबेन्झिआ यांनी दिला. संयुक्त राष्ट्रसंघटनेनेही नव्या हल्ल्यांची गंभीर दखल घेतली असून असे हल्ले भयावह संकटाला निमंत्रण देणारे ठरतील, असे बजावले आहे. रशिया व युक्रेन या देशांनी अणुप्रकल्पाच्या क्षेत्रात ‘डिमिलिटराईझ्ड् झोन’ तयार करण्यासाठी पावले उचलावीत असे आवाहन महासचिव अँटोनिओ गुतेरस यांनी केले. दोन दिवसांपूर्वीच रशियाने झॅपोरिझिआमध्ये असणाऱ्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या मुद्यावर सुरक्षा परिषदेची बैठक घेण्याची मागणी केली होती.
गुरुवारी युक्रेनच्या लष्कराने झॅपोरिझिआमध्ये असणाऱ्या अणुऊर्जा प्रकल्पावर दोन हल्ले चढविल्याची माहिती स्थानिक रशियन अधिकाऱ्यांनी दिली. पहिल्या हल्ल्यात प्रकल्पातील कमांडंटच्या कार्यालयाजवळ पाच स्फोट झाले. त्यानंतर प्रकल्पातील अग्निशमन केंद्राजवळ पाच शेल्स आदळले. या दोन्ही हल्ल्यांमुळे प्रकल्पाच्या परिसरात आग लागली, अशी माहिती रशियन अधिकारी व्लादिमिर रोगोव यांनी दिली. या हल्ल्यांपैकी एक स्फोट प्रकल्पातील ‘रेडिओॲक्टिव्ह स्टोरेज’जवळ झाल्याचाही दावा रोगोव यांनी दिला. या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा परिषदेत झालेल्या बैठकीत रशियाने गंभीर इशारा दिला.
‘आम्ही पाश्चिमात्य मित्रदेशांना वारंवार युक्रेनच्या अणुप्रकल्पावरील हल्ल्यांबाबत सांगत आहोत. पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला समजावून हे हल्ले रोखावे. अन्यथा युक्रेनच्या बेजबाबदार हल्ल्यांचे दूरगामी परिणाम भोगावे लागतील. युक्रेनच्या कारवायांमुळे जग आण्विक संकटाच्या दिशेने ढकलले जात आहे. यासाठी युक्रेनला समर्थन देणारे पाश्चिमात्य देशच जबाबदार राहतील’, असे रशियाचे संयुक्त राष्ट्रसंघटनेतील राजदूत वॅसिली नेबेन्झिआ यांनी बजावले. पुढच्या काही दिवसांमध्ये कोणत्याही क्षणी झॅपोरिझिआमध्ये असणाऱ्या अणुऊर्जा प्रकल्पात भयावह आपत्ती घडू शकते, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
रशियाच्या इशाऱ्यापाठोपाठ संयुक्त राष्ट्रसंघटनेनेही झॅपोरिझिआमधील हल्ल्यांची गंभीर दखल घेतली आहे. संयुक्त राष्ट्रसंघटनेचे महासचिव गुतेरस यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून अणुप्रकल्पाची हानी झाल्यास त्याचे भयंकर परिणाम संपूर्ण क्षेत्रात दिसतील, अशी चिंता व्यक्त केली. या प्रकल्पाचा वापर कोणत्याही प्रकारच्या लष्करी कारवाईसाठी होऊ नये, उलट सदर परिसर ‘डिमिलिटराईझ्ड् झोन’ व्हावा यासाठी रशिया व युक्रेनने पावले उचलायला हवीत, असे आवाहनही गुतेरस यांनी केले. सुरक्षा परिषदेतील आघाडीच्या देशांनीही झॅपोरिझिआमधील हल्ल्यांबाबत प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. भारताने हल्ल्यांवर चिंता व्यक्त करताना दोन्ही बाजूंनी संयम दाखवायला हवा, असे म्हटले आहे.
युक्रेनने सदर हल्ल्यांवरून होणारे आरोप फेटाळले आहेत. उलट रशिया सदर प्रकल्पावरून ‘न्यूक्लिअर ब्लॅकमेल’ करीत असल्याचा आरोप युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी केला. रशिया या भागातून बाहेर पडला तरच युरोप आण्विक संकटापासून सुरक्षित राहिल, असा दावाही त्यांनी केला. फेब्रुवारी महिन्यात युक्रेनवर चढविलेल्या हल्ल्यानंतर काही आठवड्यांमध्ये रशियाने युक्रेनमधील झॅपोरिझिआ अणुप्रकल्पावर ताबा मिळविला होता. सदर प्रकल्प युक्रेनसह युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पांपैकी एक असून त्याची क्षमता तब्बल सहा हजार मेगावॅट इतकी आहे. या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात संवर्धित युरेनियम तसेच अणुइंधनाचा साठा आहे. सध्या या प्रकल्पात युक्रेनी कंपनीचे कर्मचारी कार्यरत आहेत.
युक्रेनने गेल्या महिन्यात दक्षिण युक्रेनमध्ये रशियाच्या ताब्यात असणाऱ्या भागांवर प्रतिहल्ले सुरू केले होते. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये सदर अणुऊर्जा प्रकल्पाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रशियाने या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात लष्कर तसेच प्रगत संरक्षणयंत्रणा तैनात केल्या आहेत. रशियाच्या या तैनातीला धक्का देण्यासाठी युक्रेनी फौजा प्रकल्पाच्या नजिकच्या परिसराला लक्ष्य करीत असल्याचे सांगण्यात येते. मात्र युक्रेन तसेच पाश्चिमात्य यंत्रणांनी हे दावे फेटाळले असून रशियाच प्रकल्पाच्या परिसरात हल्ले घडवून त्याचा दोष युक्रेनवर ढकलत असल्याचे म्हटले आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |