चिनी राष्ट्राध्यक्षांच्या सौदी दौऱ्यामुळे अमेरिकेचा प्रभाव संपुष्टात येणार नाही

- अमेरिकेच्या येमेनमधील विशेषदूतांचा दावा

वॉशिंग्टन – पुढच्या आठवड्यात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग सौदी अरेबियाचा दौरा करून सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेणार आहेत. चीनच्या राष्ट्राध्यक्षांचा हा दौरा म्हणजे सौदीवरील अमेरिकेचा प्रभाव संपुष्टात येत असल्याचे दाखवून देणारा ठरतो, असे काही विश्लेषकांचे म्हणणे आहे. मात्र येमेनमधील अमेरिकेचे विशेषदूत टीम लेंडरकिंग यांनी हा दावा फेटाळून लावला. सौदी अरेबियाच नाही तर आखाती क्षेत्रातील अमेरिकेचा प्रभाव कायम आहे, अमेरिका इथून कुठेही जाणार नाही, असे लेंडरकिंग यांनी म्हटले आहे.

अमेरिकेचा प्रभाव

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी जुलै महिन्यात सौदी अरेबियाला भेट दिली होती, याची आठवण लेंडरकिंग यांनी करून दिली. राष्ट्राध्यक्षांच्या या सौदी भेटीद्वारे अमेरिका या क्षेत्रातून कुठेही जाणार नाही, हा महत्त्वाचा संदेश देण्यात आलाचा दावा लेंडरकिंग यांनी केला. केवळ सौदीच नाही तर या क्षेत्रातील सर्वच देशांबरोबरील अमेरिकेचे सहकार्य यापुढेही कायम राहिल. दुसऱ्या देशांच्या नेत्यांनी सौदीला भेट दिल्याने अमेरिकेचा प्रभाव संपुष्टात आला असे दावे करणे चुकीचे ठरेल, असा खुलासा लेंडरकिंग यांनी दिला.

दुसऱ्या देशांचे नेत्यांनी सौदीला भेट देणे ही अगदी स्वाभाविक बाब ठरते, असे सांगून लेंडरकिंग यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या सौदी भेटीला अधिक महत्त्व देण्याचे टाळले आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या घडामोडी लक्षात घेता चीनच्या राष्ट्राध्यक्षांची ही सौदी भेट लक्षणीय बाब ठरते. जुलै महिन्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या दौऱ्यात सौदीकडे व इंधन उत्पादक आखाती देशांसमोर काही मागण्या ठेवल्या होत्या. यामध्ये इंधनाचे उत्पादन वाढविण्याच्या मागणीचा समावेश होता. सौदी व इतर इंधन उत्पादक देशांनी इंधनाचे उत्पादन वाढविले, तर इंधनाचे दर कमी होतील, असा तर्क त्यामागे होता.

अमेरिकेचा प्रभाव

युक्रेनचे युद्ध भडकलेले असताना, इंधनतेलाचे दर कडाडले आहेत. म्हणूनच युक्रेनवरील हल्ल्यासाठी रशियाला चिथावणी देणाऱ्या अमेरिकेच्या विरोधात जगभरात नाराजीची भावना आहे. अमेरिकन जनता देखील इंधनाच्या दरवाढीमुळे त्रासली असून याचा फटका राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना बसत आहे. अशा परिस्थितीत इंधनाचे दर कमी करण्यासाठी, बायडेन यांना सौदीचे सहकार्य अपेक्षित होते. पण सौदीने त्यांची ही मागणी धुडकावली होती.

आपला प्रतिस्पर्धी असलेल्या इराणला अनुकूल असलेले धोरण बायडेन प्रशासनान स्वीकारत असल्याची सौदीची भावना आहे. तसेच येमेनी बंडखोरांबरोबरील सौदीच्या संघर्षात बायडेन यांनी उघडपणे येमेनी बंडखोरांचे बळ वाढविणारे निर्णय घेतले होते. तसेच सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान हे पत्रकार जमाल खाशोगी यांच्या खूनात गुंतलेले असल्याचा आरोप करून बायडेन प्रशासनाने सौदीच्या नेतृत्त्वाविरोधात आघाडी उघडली होती. सौदीला अमेरिकन बनावटीची शस्त्रास्त्रे मिळू नयेत, यासाठी बायडेन प्रशासनाने पावले उचलली होती. कालांतराने हा निर्णय फिरविण्यात आला व बायडेन प्रशासनाने सौदीशी जुळवून घेण्याचे प्रयत्नही सुरू केले. यासाठी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी सौदीचा दौरा देखील केला होता. पण याचा अमेरिकेला विशेष लाभ मिळालेला नाही. सौदीने इंधनाचे उत्पादन वाढविण्याची बायडेन यांनी मागणी नाकारलीच. त्याचवेळी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व देण्याचेही सौदीने नाकारले होते.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्ा सौदी भेटीमागे ही पार्श्वभूमी आहे. म्हणूनच चिनी राष्ट्राध्यक्षांच्या सौदी दौऱ्यामुळे अमेरिकेच्या सौदीवरील प्रभावाला धक्का बसल्याचे दावे करण्यात येत आहेत. येमेनमधील अमेरिकेच्या विशेषदूतांनी हे दावे खोडून काढण्याचा कितीही प्रयत्न केला तरी अमेरिका व सौदीमध्ये आलेला दुरावा कमी करण्यासाठी अमेरिकेला याहूनही अधिक प्रयत्न करावे लागणार असल्याचे स्पष्टपणे दिसते आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info