युक्रेनच्या आघाडीवर रशियाने जबरदस्त मारा सुरू केला

- हवाई व क्षेपणास्त्रहल्ल्यांची तीव्रता वाढविली

मारा

मॉस्को/किव्ह – युक्रेनने क्रिमिआ तसेच दक्षिण युक्रेनमधील रशियन नियंत्रणाखालील भागात केलेल्या हल्ल्यानंतर रशियाने आपल्या लष्करी मोहिमेची तीव्रता पुन्हा वाढविण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी तसेच बुधवारी रशियाने युक्रेन आघाडीवरील सर्व भागांमध्ये जबर मारा केल्याचे समोर आले आहे. यात ईशान्य युक्रेनमधील खार्किव्हपासून दक्षिणेकडील ओडेसामध्ये केलेल्या हल्ल्यांचा समावेश आहे. गेल्या ४८ तासांमध्ये रशियन फौजांनी मोठ्या प्रमाणावर हवाई तसेच क्षेपणास्त्र हल्ले चढविल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे. दरम्यान, क्रिमिआवरील सलग दोन हल्ल्यांनतर रशियाच्या भागातील प्रदेश परत मिळविण्यासाठी अधिक व्यापक कारवाई करण्याचा दावा वरिष्ठ युक्रेनी अधिकाऱ्यांनी दिला.

मारा

गेल्या काही दिवसात युक्रेनने रशियाच्या ताब्यातील क्रिमिआ, डोनेत्स्क तसेच खेर्सन प्रांतात लक्षणीय हल्ले चढविले होते. या हल्ल्यांमध्ये रशियाचे हवाई तळ, लष्करी तळ, शस्त्रसाठे तसेच रसदीचे मार्ग उद्ध्वस्त करण्यात यश मिळविले होते. युक्रेनच्या या हल्ल्यांमुळे रशियाला धक्के बसल्याचा दावा युक्रेन तसेच पाश्चिमात्यांकडून करण्यात आला होता. मात्र गेल्या २४ तासांमध्ये युक्रेन आघाडीवरील सर्व भागांमध्ये जोरदार हल्ले करून रशियाने हा समज खोटा ठरविला आहे.

मारा

रशियाच्या लढाऊ विमानांनी उत्तर युक्रेनमधील झायटोमिर, खार्किव्ह तसेच पूर्व युक्रेनमधील सोलेदार व मरिन्का आणि दक्षिण युक्रेनमधील झॅपोरिझिआमधील भागांमध्ये मोठे हवाईहल्ले चढविले. खार्किव्हसह दक्षिण युक्रेनमधील ओडेसा शहरात मोठे क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. ओडेसावरील हल्ल्यांसाठी ‘स्ॅटेजिक बॉम्बर्स’चा वापर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. याव्यतिरिक्त डोन्बासमधील स्लोव्हियान्स्क, बाखमत, ॲव्हडिविका भागांमध्ये सातत्याने तोफा, रणगाडे व रॉकेट्सचा जबर मारा सुरू आहे. रशियन फौजा दिवसाला आठशे वेळा मारा करीत असल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला. तर उग्लेदर व बाखमतनजिक युक्रेनी लष्कराची आघाडी तोडून आगेकूच केल्याची माहितीही रशियाच्या संरक्षण विभागाने दिली.

काही दिवसांपूर्वी युक्रेनने रशियाच्या ताब्यात असलेल्या खेर्सनमध्ये हल्ला करून रेल्वे ब्रिज उडवून दिला होता. रशियाच्या रसदीसाठी हा पूल महत्त्वाचा होता, असे सांगण्यात येते. त्यापाठोपाठ डोनेत्स्क प्रांतात रशियाची खाजगी लष्करी कंपनी ‘वॅग्नर ग्रुप’चा मोठा तळ उडवून दिल्याचेही युक्रेनकडून सांगण्यात आले.

English

Click below to express your thoughts and views on this news:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info