युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणाची धार वाढल्यानंतर अमेरिकेकडून युक्रेनसाठी अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची घोषणा

- ब्रिटन व फ्रान्सचीही रशियावर घणाघाती टीका

युक्रेनवरील

वॉशिंग्टन/लंडन/पॅरिस – रशियाने युक्रेनवरील हल्ल्याची तीव्र्रता प्रचंड प्रमाणात वाढविल्यानंतर पाश्चिमात्य देशांकडून त्यावर प्रतिक्रिया उमटली आहे. अमेरिकेने युक्रेनला ७७ कोटी डॉलर्सहून अधिक रक्कमेची शस्त्रास्त्रे पुरविण्याची घोषणा केली असून यात प्रगत संरक्षण साहित्याचा समावेश आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन यांनी रशियाचे युक्रेनवरील हे हल्ले साम्राज्यवादी युद्धखोरीचा भाग असल्याचा ठपका ठेवला. ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाने युक्रेनवर हल्ला चढविणाऱ्या रशियाला नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या जी-२० परिषदेत सहभागी होण्याची संधी मिळता कामा नये, अशी मागणी केली आहे.

युक्रेनच्या डोनेत्स्क आणि खार्किव्ह प्रांतांवर रशियाने जबरदस्त हल्ले चढविले असून गेल्या दोन दिवसात या हल्ल्यांची धार अधिकाधिक वाढली आहे. अमेरिका व पाश्चिमात्य देशांकडून मिळालेली शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्याच्या बळावर युक्रेनी लष्कराचे रशियन सैन्यावर हल्ले वाढू लागल्यानंतर, रशियाची युक्रेनविरोधी लष्करी मोहीम अधिक आक्रमक बनल्याचे दिसते. रशियन आक्रमणाची तीव्रता वाढल्यानंतर युक्रेनचे पाठिराखे मानले जाणाऱ्या अमेरिका, ब्रिटनने त्याची गंभीर दखल घेतली. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी देखील रशियावर टीकास्त्र सोडले आहे.

युक्रेनवरील

अमेरिकेने युक्रेनसाठी सुमारे ७७ कोटी, ५० लाख डॉलर्सची अतिरिक्त शस्त्रास्त्रे व प्रगत संरक्षणसाहित्य पुरविण्याची घोषणा केली. यामध्ये १६ हॉवित्झर यंत्रणा, १००० जॅव्हलिन सिस्टीम्स्‌‍, एचएआरएम-हार्म क्षेपणास्त्रे यांच्यासह बोईंग कंपनीने तयार केलेले १५ ‘स्कॅनईगल ड्रोन्स’ तसेच शक्तीशाली स्फोटांनाही दाद न देणारी ४० एमआरएपीएस लष्करी वाहनांचा समावेश आहे. याबरोबरच लष्करी वाहनांचा वेध घेणाऱ्या ‘दोन हजार अँटी आर्मर राऊंडस्‌‍’ देखील अमेरिका युक्रेनी लष्कराला पुरविणार आहे. रशियाच्या हल्ल्यांची तीव्रता वाढल्यानंतर अमेरिकेने घोषित केलेले हे सहाय्य युक्रेनच्या युद्धाची दाहकता अधिकच वाढविणारे असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

युक्रेनवरील

युक्रेनचे युद्ध पेटल्यानंतरच्या काळात रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी अनेकवार संवाद साधून हे युद्ध रोखण्याचा प्रयत्न करणारे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी रशियावर सडकून टीका केली. रशियाने साम्राज्यवादी मानसिकतेतून आपला भूभाग परत मिळविण्यासाठी युक्रेनवर हे भीषण हल्ले चढविले आहेत, असा ठपका राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी ठेवला. तसेच फ्रान्ससह युरोपिय देशांच्या जनतेला युक्रेनच्या युद्धाचा फार मोठा फटका बसत असला तरी स्वातंत्र्य आणि आपल्या मुल्यांच्या संरक्षणासाठी हे मोल द्यावेच लागेल, असा संदेश मॅक्रॉन यांनी दिला आहे. रशियन सैन्य युक्रेनमध्ये मुसंडी मारत असून आता हे युद्ध आपल्यापासून काही तासांवर येऊन ठेपलेले आहे, याची जाणीव फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी करून दिली.

ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाने युक्रेनवर हल्ला चढविणाऱ्या रशियावर राजनैतिक बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. नोव्हेंबर महिन्यात इंडोनेशियाच्या बालीमध्ये होणाऱ्या जी-२०च्या बैठकीत रशियाचा सहभाग रोखण्याचे आवाहन ब्रिटनने सदस्यदेशांना केले. युक्रेनच्या युद्धात तटस्थ भूमिका स्वीकारणारे काही देश जी-२०मध्ये असून ब्रिटनने केलेली ही मागणी मान्य होण्याची शक्यता नाही. मात्र या युद्धात तटस्थ राहून अप्रत्यक्षपणे रशियाची बाजू घेणाऱ्या देशांवर ब्रिटनच्या या मागणीमुळे दडपण येऊ शकते.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info