रशियाचे दक्षिण युक्रेनमधील मायकोलेव्ह, झॅपोरिझिआ व खेर्सनमध्ये क्षेपणास्त्र हल्ले

- अमेरिकेकडून नव्या रशियन आक्रमणाचा इशारा

मॉस्को/किव्ह/वॉशिंग्टन – रशियाने गेल्या 24 तासांमध्ये दक्षिण युक्रेनमधील मायकोलेव्ह, झॅपोरिझिआ व खेर्सन प्रांतात क्षेपणास्त्रांचा मारा सुरू केला आहे. युक्रेनी लष्कराकडून याच क्षेत्रात प्रतिहल्ल्यांसाठी जमवाजमव सुरू असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे रशियाने या भागात वाढविलेली हल्ल्यांची तीव्रता लक्ष वेधून घेणारी ठरते. रशियाच्या या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, रशियन संरक्षणदले येत्या काही आठवड्यात युक्रेनवर नवे आक्रमण करु शकतात, असा इशारा अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे.

मायकोलेव्ह

गेल्या काही दिवसांमध्ये युक्रेनच्या प्रतिहल्ल्यांच्या योजनेबाबत वेगवेगळ्या प्रकारची माहिती समोर येत आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागातून ‘लीक’ झालेली माहिती, अमेरिकी माध्यमांचे दावे व युक्रेनी अधिकाऱ्यांकडून करण्यात येणारी वक्तव्ये यातून हा प्रतिहल्ला दक्षिण युक्रेनमध्ये रशियाने ताबा मिळविलेल्या भागांवर असेल, असे संकेत मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच रशियासमर्थक गटातील वरिष्ठ नेत्यांनी झॅपोरिझिआ व खेर्सन भागात लष्करी जमवाजमव सुरू असल्याचे सांगितले होते.

मायकोलेव्ह

या पार्श्वभूमीवर रशियन फौजांनीही दक्षिण युक्रेनमधील प्रांतांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. झॅपोरिझिआ व खेर्सन या दोन्ही प्रांतांमध्ये बचावफळी भक्कम करण्यावर भर देण्यात येत आहे. शेकडो किलोमीटर्स लांब खंदक खोदण्यात आले असून मोठ्या प्रमाणात सुरुंगही पेरण्यात आले आहेत. त्याचवेळी या दोन्ही प्रांतांमध्ये मोठ्या प्रमाणात लष्करी तैनाती करण्यात आली असून त्यात हवाईदलाच्या तुकड्यांचाही समावेश आहे.

ब्लॅक सी व झॅपोरिझिआत तैनात असलेल्या क्षेपणास्त्र यंत्रणांमधून क्षेपणास्त्रांचे हल्लेही वाढविण्यात आले आहेत. गेल्या 24 तासात मायकोलेव्ह, खेर्सन व झॅपोरिझिआत हल्ले झाले असून क्षेपणास्त्रहल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती युक्रेनकडून देण्यात आली आहे. झॅपोरिझिआतील हल्ल्यात क्षेपणास्त्रांबरोबरच रॉकेटस्‌‍ व तोफांचाही वापर करण्यात आला आहे.

मायकोलेव्ह

रशिया-युक्रेन युद्धाला तोंड फुटल्यानंतर वर्षभरात रशियन संरक्षणदलांची मोठी हानी झाल्याचे व रशियाकडील शस्त्रसाठा प्रचंड प्रमाणात घटल्याचे दावे युक्रेनसह पाश्चिमात्य माध्यमे तसेच यंत्रणांनी केले होते. रशिया दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील तसेच शीतयुद्धाच्या काळातील शस्त्रसाठा बाहेर काढून त्याचा वापर करीत असल्याचेही सांगण्यात येत होते. मात्र गेल्या दोन महिन्यांमध्ये रशियन फौजांनी केलेले हल्ले वास्तव याहून फारच वेगळे असल्याचे दाखवून देत आहेत.

अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या वक्तव्यांमधूनही याला दुजोरा मिळाल्याचे दिसत आहे. युक्रेनमधील हवामानात सुधारणा झाल्यानंतर रशिया युक्रेनमधील काही भागांवर आक्रमण करील, असा इशारा नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलचे प्रवक्ते जॉन किरबाय यांनी दिला. काही आठवड्यांपूर्वी युक्रेनच्या रशियावरील प्रतिहल्ल्यांचे दावे करणाऱ्या अमेरिकी वर्तुळातून आता रशियाच्या नव्या आक्रमणाबाबत वक्तव्ये सुरू झाल्याने ही बाब लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info