युरोपातील इंधनसंकट तीव्र होत असतानाच ‘ओपेक प्लस’कडून तेलाच्या उत्पादनात घट करण्याची घोषणा

तेलाच्या उत्पादनात घट

व्हिएन्ना – इंधन उत्पादक देशांची आघाडीची संघटना ‘ओपेक’सह इतर उत्पादक देशांचा गट म्हणून ओळख असणाऱ्या ‘ओपेक प्लस’ने कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट करण्याची घोषणा केली. युरोपातील इंधनपुरवठ्याचे संकट तीव्र होत असतानाच ‘ओपेक प्लस’ने केलेली ही घोषणा लक्ष वेधून घेणारी ठरते. ओपेक प्लसचा नवा निर्णय म्हणजे राजकीय भूमिकेचा भाग असून पाश्चिमात्य देशांना संदेश देण्याचा प्रयत्न आहे, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. दरम्यान, पाश्चिमात्य देशांनी निर्बंध उठविल्याशिवाय युरोपचा इंधनपुरवठा सुरळीत करणार नाही, असा सज्जड इशारा रशियाने दिला.

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून होणाऱ्या इंधनपुरवठ्यात घट होत आहे. पाश्चिमात्य देशांनी आपल्यावर निर्बंध लादल्यास किंवा दर नियंत्रित करण्याचा प्रयत्न केल्यास आपण कच्चे तेल तसेच नैसर्गिक इंधनवायूची निर्यात थांबवू, असा इशाराही रशियाने दिला होता. रशियाने हा इशारा प्रत्यक्षात उतरविल्यास इंधनबाजारपेठेत मोठी उलथापालथ होऊन कच्च्या तेलाचे दर 200 ते 300 डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत भडकू शकतात. ही शक्यता ध्यानात घेऊन पाश्चिमात्य देशांनी ‘ओपेक’ला इंधनपुरवठ्यात वाढ करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार गेल्या तीन महिन्यात ‘ओपेक प्लस’कडून सात लाख बॅरल्सची वाढ करण्यात आली होती.

तेलाच्या उत्पादनात घट

मात्र आता ‘ओपेक प्लस’ने आपली भूमिका बदलली असून पुढच्या महिन्यापासून उत्पादनात एक लाख बॅरल्सची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अनिश्चितता व इराण डीलनंतर तेलाच्या उत्पादनात होणारी वाढ ही कारणे दिली आहेत. आतापर्यंत केलेल्या वाढीच्या तुलनेत घट नाममात्र दिसत असली तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. ‘ओपेक प्लस’च्या घोषणेनंतर काही तासातच कच्च्या तेलाच्या दरांमध्ये तीन टक्क्यांची वाढ झाली असून दर प्रति बॅरल 95 डॉलर्सवर पोहोचले आहेत. नजिकच्या दिवसात हे दर पुन्हा 100 डॉलर्सची पातळी ओलांडू शकतात, असे संकेत विश्लेषकांनी दिले आहेत.

तेलाच्या उत्पादनात घट

अमेरिका व युरोपसह इतर पाश्चिमात्य देशांनी रशियाच्या इंधनक्षेत्रावर मोठ्या प्रमाणात निर्बंध लादले आहेत. युरोपिय देशांनी पुढील काही वर्षात रशियाकडून होणारी इंधनआयात पूर्णपणे थांबविण्याचे महत्त्वाकांक्षी इरादेही जाहीर केले आहेत. मात्र भविष्यातील योजना जाहीर करणाऱ्या युरोपिय देशांना वर्तमानकाळात इंधनपुरवठा व वाढत्या दरांच्या मुद्यांवर तोडगा शोधता आलेला नाही. त्यासाठी आखात व आफ्रिकी देशांच्या विनवण्या कराव्या लागत आहेत.

दरम्यान, रशियन सरकारचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी पाश्चिमात्यांचे निर्बंध उठल्याशिवाय युरोपचा इंधनपुरवठा सुरळीत होणार नसल्याचा इशारा दिला आहे. रशियाने ‘नॉर्ड स्ट्रीम 1’ इंधनवाहिनीतून होणारा इंधनपुरवठा तांत्रिक दोषाचे कारण देऊन बंद केला आहे. यामुळे युरोपिय देशांमधील इंधनवायूचे दर 30 टक्क्यांनी वाढले असून या देशांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. इंधनपुरवठा बंद होण्यामागे निर्बंध व युरोपची धोरणे कारणीभूत असल्याचा ठपकाही रशियाने ठेवला आहे.

English      हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info