इस्रायलशी सहकार्य करणार्‍या युएई-बाहरिनने अंतर्गत आव्हानांसाठी सज्ज रहावे – इराणच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची धमकी

इस्रायलशी सहकार्य करणार्‍या युएई-बाहरिनने अंतर्गत आव्हानांसाठी सज्ज रहावे – इराणच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची धमकी

तेहरान – ‘इस्रायलबरोबर सहकार्य प्रस्थापित करणार्‍या युएई आणि बाहरिन या देशांच्या राजवटींना, येत्या काळात संकटाचा आणि मोठ्या अंतर्गत आव्हानांचा सामना करावा लागेल. त्यासाठी या देशांच्या राजवटींनी सज्ज व्हावे’, असा इशारा इराणचे वरिष्ठ अधिकारी हुसेन आमिर-अब्दोल्लाहियान यांनी दिला. त्यांच्या या इशार्‍याला काही तास उलटत नाही तोच, बाहरिनमधील शियापंथियांचे सर्वोच्च धार्मिक नेते शेख इसा कासिम यांनी देखील बाहरिनमध्ये अस्थैर्य निर्माण होईल, अशी धमकी दिली आहे.

इराणच्या संसदेच्या सभापतींचे आंतरराष्ट्रीय राजकारणावरील सल्लागार हुसेन आमिर-अब्दोल्लाहियान यांनी रशियन वृत्तसंस्थेशी बोलताना युएई व बाहरिन या आखाती-अरब देशांनी इस्रायलबरोबर केलेल्या सहकार्यावर टीका केली. अमेरिकेच्या दबावाखाली येऊन युएई आणि बाहरिनच्या राजवटीने इस्रायलशी सहकार्य प्रस्थापित केल्याचा आरोप हुसेन यांनी केला. त्याचबरोबर या सहकार्याअंतर्गत सदर अरब देशांना विशेष अधिकार नसल्याचा दावाही इराणी नेत्यांनी केला. पण इस्रायलबरोबरच्या या सहकार्याचे परिणाम येत्या काळात दोन्ही अरब देशांना भोगावे लागतील, असे हुसेन यांनी धमकावले.

गेल्या महिन्यात इस्रायलने सौदी अरेबिया, युएई आणि बाहरिनसोबत स्वतंत्र लष्करी आघाडी उघडण्याचे संकेत दिले होते. पण इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू खोटे बोलत आहेत, असा दावा हुसेन यांनी केला. जर पुढच्या काळात युएई आणि बाहरिनने इस्रायलबरोबर लष्करी सहकार्य केलेच, तर त्याचे पडसाद या देशांमध्ये उमटतील. तरीही इस्रायलबरोबर लष्करी सहकार्य प्रस्थापित करण्याचा निर्णय घेतला, तर या देशांच्या राजवटींनी अंतर्गत आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज रहावे, अशी धमकी हुसेन यांनी दिली आहे.

बाहरिनच्या ‘अल-वेफाक नॅशनल इस्लामिक सोसायटी’ या अल-खलिफा राजवटीविरोधातील प्रमुख गटाने इस्रायलबरोबर सहकार्य करू नये, असे आवाहन केले आहे. बाहरिनच्या राजवटीचे इस्रायलबरोबरील सहकार्य इराणविरोधीच असेल. इस्रायलच्या तालावर नाचणे ही बाहरिनच्या राजवटीची कमजोरी आणि अपमान मानला जाईल, अशी टीका या गटाने केली.

सध्या बाहरिनमध्ये अंतर्गत तणाव निर्माण झालेला आहे. बाहरिनच्या राजवटीने काही नेत्यांना अटक केली आहे. याच्या विरोधात इराणसमर्थक शियापंथियांचे धार्मिक नेते शेख इसा कासिम यांनीही बाहरिनच्या राजांना धमकी दिली. ‘बाहरिनच्या राजवटीने कैद केलेल्या राजकीय नेत्यांचा कारागृहातच मृत्यू होणार नाही आणि दफनभूमी त्यांच्या मृतदेहांनी भरून जाणार नाही, याची काळजी घ्यावी. हे टाळले नाही तर बाहरिनमध्ये अस्थैर्य माजेल’, असा इशारा शेख कासिम यांनी राजे हमास बिन इसा अल-खलिफा यांना दिला.

२०११ साली अरब-इस्लामी देशांमध्ये आलेल्या जस्मिन रिव्होल्युशनच्या दरम्यान, बाहरिनमध्ये राजवटीच्या विरोधात शियापंथियांचे नेते व त्यांच्या समर्थकांनी निदर्शने केली होती. पुढे सौदी व युएईच्या सहकार्याने बाहरिनने सदर आंदोलन चिरडून या नेत्यांना अटक केली होती. या नेत्यांच्या सुटकेची मागणी शेख कासिम यांनी केली आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info