मॉस्को/किव्ह – ‘किव्हच्या राजवटीने ते रशियाविरोधात प्रतिहल्ल्यांची मोहीम राबवित असल्याचे जाहीर केले आहे. ही मोहीम कशी पुढे जाते व कशी संपते यावर आपले लक्ष आहे. युक्रेनमधील लष्करी मोहिमेत रशिया कुठेही घाई करणार नाही व आपण उद्दिष्टांवर ठाम असून त्यात कोणतेही बदल झालेले नाहीत. मात्र रशियन फौजांवर अधिक दडपण आणण्याचा प्रयत्न झाला तर रशिया पुढील काळात अधिक आक्रमक व जबर हल्ले करेल’, असा खरमरीत इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिला. राष्ट्राध्यष पुतिन हा इशारा देत असतानाच डोन्बासमधील मोहिमेसाठी चेचेन प्रांतातील दोन नव्या बटालियन तैनात करण्यात आल्याची माहिती चेचेन्या प्रांताचे प्रमुख रमजान कादिरोव्ह यांनी दिली.
गेल्या आठवड्यात युक्रेनच्या फौजांनी ईशान्य युक्रेनमधील रशियन लष्करावर जबर प्रतिहल्ले चढवून त्यांना माघार घेण्यास भाग पाडले होते. रशियन लष्कराची ही पिछेहाट रशियासह आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरली होती. रशियातील अनेक नेते, माजी लष्करी अधिकारी व पुतिन समर्थकांनी यावर जबरदस्त नाराजी व्यक्त करून आता उघड युद्धाची घोषणा करा, अशी आक्रमक मागणी पुढे केली होती. त्याचवेळी रशियाचा संरक्षण विभाग व वरिष्ठ अधिकाऱ्यांवर टीकेची झ्ाोडही उठली होती. किव्ह व इतर भागांमधील पराभवाप्रमाणेच हे प्रकरणही दाबले जाईल अथवा त्याला वेगळा रंग दिला जाईल, असे दावे माध्यमांमधून होत होते.
मात्र समरकंदमधील ‘एससीओ’ बैठकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकारपरिषदेत राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनच्या प्रतिहल्ल्यांची दखल घेऊन प्रत्युत्तराचा इशाराही दिला. ‘युक्रेनकडून प्रतिहल्ले सुरू असतानाही रशियाची डोन्बासमधील लष्करी मोहीम पुढे सुरू आहे. ती थांबणार नाही. मोहीम मंद गतीने पण टप्प्याटप्प्याने आगेकूच करीत आहे. रशियन लष्कर हळुहळू एकएक भाग ताब्यात घेत आहे. रशिया आपल्या पूर्ण फौजेसह लढत नाही, ही बाब लक्षात घ्या. रशियन लष्कराचा निव्वळ एक हिस्सा त्या क्षेत्रात आहे. ते कंत्राटी जवान आहेत. त्यामुळे त्यात काही मर्यादा आहेत’, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले.
‘गेल्या काही दिवसात रशियन फौजांनी युक्रेनला जबरदस्त दणके दिले आहेत. हे हल्ले म्हणजे इशारा होता. रशियन फौजांवर दबाव आणण्याच्या घटना पुढे सुरू राहिल्या तर अधिक आक्रमक व जबर प्रत्युत्तर मिळेल’, असा इशारा रशियन राष्ट्राध्यक्षांनी दिला. खार्किव्हमधील रशियाच्या माघारीनंतर पुढील 48 तासांमध्ये रशियाने खार्किव्ह तसेच मध्य युक्रेनमधील शहरांवर मोठे क्षेपणास्त्रहल्ले चढविले होते. त्यानंतर गेल्या दोन दिवसात रशियन फौजांनी डोन्बास क्षेत्रातील दोन शहरे ताब्यात घेतल्याचे समोर आले आहे. त्याचवेळी दक्षिण युक्रेनमध्ये सुरू असणाऱ्या प्रतिहल्ल्यांचा रशियन फौजांनी जबर प्रतिकार केल्याचेही समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा इशारा लक्षवेधी ठरतो.
खार्किव्हमधून रशियन फौजांनी माघारी घेतल्यानंतर युक्रेनसह पाश्चिमात्य माध्यमांनी मोठमोठे दावे करण्यास सुरुवात केली होती. मात्र अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रशियन क्षमतेला कमी लेखू नये, अशा शब्दात बजावले होते. लष्करी क्षमतांचा विचार करता अजूनही रशियाकडे जबरदस्त लष्करी ताकद कायम असल्याने त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, याची जाणीव अमेरिकेचे प्रवक्ते जॉन किरबाय यांनी करून दिली होती. डोन्बासमध्ये दाखल झ्ाालेल्या दोन ‘चेचेन बटालियन’ व पुतिन यांचा इशारा याला दुजोरा देणारा ठरतो.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
![]() |
https://twitter.com/WW3Info |
![]() |
https://www.facebook.com/WW3Info |