वॉशिंग्टन – युक्रेनच्या चार प्रांतांमध्ये रशियाने सुरू केलेली सार्वमताची प्रक्रिया बोगस असल्याचे सांगून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी हे प्रांत रशियाला जोडण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही, असा इशारा दिला. हे आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन असून तसे केल्यास रशियाला याची फार मोठी किंमत चुकती करावी लागेल, असे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी बजावले आहे. त्याचवेळी रशिया युक्रेनच्या युद्धात अण्वस्त्रांचा वापर करण्याच्या देत असलेल्या धमकीवरही अमेरिकेकडून प्रतिक्रिया आल्याचा दावा माध्यमे करीत आहे. उघडपणे नाही पण बायडेन प्रशासनाने रशियाला संदेश पाठवून अणुयुद्धाबाबत इशारा दिल्याची माहिती माध्यमांनी उघड केली आहे.
आम्ही आमचे सहकारी व मित्रदेशांशी युक्रेनच्या मुद्यावर चर्चा करीत आहोत. पुढच्या काळात रशियावर जलदगतीने अतिरिक्त व कठोर निर्बंध लादले जातील. याची फार मोठी आर्थिक किंमत रशियाला भोगावी लागेल, असे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी जाहीर केले. रशियाने सार्वमत घेऊन युक्रेनचा भूभाग आपल्या देशाला जोडण्याचा प्रयत्न केला तर ते आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन ठरेल. अमेरिका याला कधीही मान्यता देणार नाही, असे बायडेन यांनी जाहीर केले. नाटोच्या प्रमुखांनीही याआधी जवळपास अशाच स्वरुपाची प्रतिक्रिया दिली असून जी7 देशांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करून रशियावर टीका केली. रशियाचा हा निर्णय अवैध आणि लोकशाहीविरोधी असल्याचे जी7 ने आपल्या निवेदनात म्हटले असून डोन्बासमधील सार्वमताला आपण मान्यता देणार नाही, अशी घोषणा केली.
पाश्चिमात्यांकडून अशा स्वरुपाच्या प्रतिक्रिया येतील, हे गृहित धरून रशियाने या सार्वमताच्या प्रक्रियेविरोधात राजकीय व लष्करी हालचालींना जबरदस्त प्रत्युत्तर देण्याची तयारी केली होती. यासाठी आवश्यकता भासल्यास अण्वस्त्रांचा वापर करतानाही आपण कचरणार नाही, असे स्पष्ट संकेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिले होते. तसेच आपल्याकडून दिली जाणारी अणुयुद्धाची धमकी पोकळ नाही, असे सांगून राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी सर्वांचा थरकाप उडविला होता. यानंतर अमेरिकेने रशियाला युक्रेनच्या युद्धात अण्वस्त्रे वापरल्यास त्याचे परिणाम संभवतील, अशी धमकी दिली. मात्र ही धमकी उघडपणे नाही तर गुप्तपणे देण्यात आल्याची माहिती अमेरिकन वर्तमानपत्रांनी उघड केली. त्याचा दाखला देऊन रशियन माध्यमांनीही ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |