मॉस्को/किव्ह – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अणुहल्ल्यांबाबत दिलेल्या इशाऱ्यानंतर रशियन फौजांनी युक्रेनमध्ये घणाघाती हल्ले सुरू केले आहेत. गेल्या 24 तासात रशियाने डोन्बास क्षेत्र तसेच दक्षिणेतील मायकोलेव्ह भागात मोठे हल्ले चढविले. मायकोलेव्हमध्ये केलेल्या क्षेपणास्त्रहल्ल्यात युक्रेनच्या ‘फॉरेन लिजन’चा भाग असणारे 300 जवान मारले गेले. याच प्रांतातील इतर संघर्षात युक्रेनच्या 200 जवानांचाही बळी गेला आहे. रशियाच्या संरक्षण विभागाने ही माहिती दिली. दरम्यान, रशियाने ताब्यात घेतलेल्या युक्रेनमधील प्रांतांच्या सुरक्षेसाठी रशिया अण्वस्त्रे तैनात करु शकतो, असा इशारा परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी दिला आहे.
दोन आठवड्यांपूर्वी युक्रेनी लष्कराने खार्किव्हमध्ये चढविलेल्या प्रतिहल्ल्यांमध्ये रशियाच्या लष्करी तुकड्यांना माघार घ्यावी लागली होती. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी याची दखल घेऊन अधिक आक्रमक हल्ल्यांचा इशारा दिला होता. त्यापाठोपाठ अतिरिक्त सैन्यतैनातीची घोषणा करीत अणुहल्ल्यांबाबत देण्यात येणाऱ्या धमक्या पोकळ नसल्याचेही बजावले होते. पुतिन यांनी युक्रेनमधील रशियन लष्कराच्या तैनातीची फेररचना करण्याचे आदेश दिल्याचेही समोर आले होते. या पार्श्वभूमीवर रशियन लष्कराने युक्रेनवरील हल्ले अधिक प्रखर केल्याचे दिसत आहे.
दक्षिण युक्रेनमधील मायकोलेव्ह तसेच ओडेसामध्ये मोठे हल्ले करण्यात आले. मायकोलेव्ह प्रांतातील कॅलिनोव्हका भागातील परदेशी तुकड्यांच्या तळावर क्षेपणास्त्र डागण्यात आले. या हल्ल्यात किमान 300 परदेशी जवान ठार झाल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली. या हल्ल्यानंतर युक्रेनच्या ‘फॉरेन लिजन’मध्ये हजारापेक्षा कमी जवान शिल्लक राहिले असावेत, असा दावा रशियाच्या संरक्षण विभागाचे प्रवक्ते इगोर कोनाशेन्कोव यांनी केला. मायकोलेव्ह प्रांतातील युक्रेनी तळांवरही हल्ले करण्यात आले असून त्यात 200 जवान ठार झाले असावेत, असे संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
दक्षिण युक्रेनमधील महत्त्वाचे बंदर असलेल्या ओडेसावरही हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांसाठी ड्रोन्सचा वापर करण्यात आला. शहरातील प्रशासकीय इमारतींना लक्ष्य करण्यात आल्याचे युक्रेनच्या यंत्रणांनी सांगितले आहे. ओडेसावर ड्रोन हल्ला चढविण्याची गेल्या तीन दिवसांमधील ही दुसरी वेळ ठरली आहे. रशियाने वापरलेले ड्रोन्स इराणचे असल्याचा दावा युक्रेनने केला. डोनेत्स्क प्रांतातील बाखमत शहरावरही हल्ले करण्यात आले असून शहराचा पूर्वेकडील भाग रशियन फौजांनी ताब्यात घेतल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, रशियाचे परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी युक्रेनमधील संघर्षावरून नवा इशारा दिला. संयुक्त राष्ट्रसंघटनेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत, युक्रेनमध्ये नियंत्रण मिळविलेल्या प्रांतांना रशिया संपूर्ण सुरक्षा पुरवेल, अशी ग्वाही लॅव्हरोव्ह यांनी दिली. यावेळी अण्वस्त्रांच्या तैनातीबाबत प्रश्न उपस्थित केला असता ही तैनातीदेखील नव्या प्रांतांना लागू होईल, असे रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी बजावले. रशियाने युक्रेनमधील लुहान्स्क, डोनेत्स्क, खेर्सन व झॅपोरिझिआ प्रांतांतील बहुतांश भागावर नियंत्रण मिळविले आहे. या प्रांतांमध्ये सार्वमताची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ती पूर्ण झाल्यावर रशिया या प्रांतांना आपल्यात सामील करून घेईल, असे सांगण्यात येते. या पार्श्वभूमीवर, लॅव्हरोव्ह यांचा इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |