युक्रेन नाटोचा सदस्य झाल्यास रशिया व नाटोमध्ये युद्धाचा भडका उडेल

- रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा इशारा

मॉस्को/वॉशिंग्टन – जर युक्रेन नाटोचा सदस्य बनला तर रशिया व नाटोमध्ये युद्धाचा भडका उडेल, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिला. अमेरिकेला युक्रेनच्या सुरक्षेत रस नसून केवळ रशियाला रोखण्याचे साधन म्हणून युक्रेनचा वापर करण्यात येत असल्याचा आरोपही रशियन राष्ट्राध्यक्षांनी केला. अमेरिका व नाटो रशियाच्या सुरक्षेशी निगडित मुद्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याची टीकाही त्यांनी केली. पुतिन यांच्या या वक्तव्यांच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका व नाटोने तणाव कमी करण्यासाठी रशियाला प्रस्ताव दिल्याचे दावे प्रसिद्ध झाले आहेत.

युक्रेन नाटोचा सदस्य

रशियाने नवीन वर्षात युक्रेन सीमेवरील लष्करी तैनाती प्रचंड प्रमाणात वाढविल्याचे युक्रेन, अमेरिका व नाटोकडून सांगण्यात येत आहे. अमेरिका तसेच नाटोकडून युक्रेनवर कधीही आक्रमण होऊ शकते, असे इशारेही देण्यात येत आहेत. रशियाचे मंत्री व वरिष्ठ अधिकारी यासंदर्भातील आरोप सातत्याने फेटाळत होते. मात्र राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी त्यावर आपली भूमिका मांडली नव्हती. त्यामुळे मंगळवारी पुतिन यांनी केलेली वक्तव्ये लक्ष वेधून घेणारी ठरली आहेत. मंगळवारी राजधानी मॉस्कोत नाटोचा सदस्य देश हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन यांच्याबरोबर घेतलेल्या पत्रकार परिषदेत रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

‘अमेरिकेला युक्रेनच्या सुरक्षेची चिंता आहे, असे काही आपल्याला वाटत नाही. अमेरिकेचा मुख्य उद्देश रशियाची प्रगती रोखणे हा आहे. हा उद्देश साध्य करण्यासाठी युक्रेनचा फक्त एक साधन म्हणून वापर केला जात आहे. त्यासाठी अमेरिकेकडून रशियाला युक्रेनबरोबरच्या युद्धात ढकलण्याचे प्रयत्न होत आहेत. या युद्धाचा फायदा उचून रशियावर निर्बंध लादण्याचा अमेरिकेचा इरादा आहे’, असा घणाघाती आरोप राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी केला. अमेरिका व नाटो रशियाकडून मांडण्यात आलेल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा दावाही त्यांनी केला.

त्याचवेळी युक्रेनच्या नाटोतील सहभागासाठी प्रयत्न सुरू असून असे झाल्यास रशिया व नाटोमध्ये युद्धाचा भडका उडू शकतो, असेही पुतिन यांनी बजावले. नाटोचा सदस्य बनल्यावर युक्रेनने क्रिमिआ ताब्यात घेण्यासाठी लष्करी कारवाई केली, तर नाटो काय करणार आहे, याचा विचार युके्रनने केला आहे का? असा सवाल रशियन राष्ट्राध्यक्षांनी केला. अमेरिका-नाटो रशियाच्या सीमेनजिकच्या देशांमध्ये संरक्षण तैनाती वाढवित असल्याकडेही त्यांनी यावेळी लक्ष वेधले.

दरम्यान, पुतिन यांच्या वक्तव्यांच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका व नाटोकडून रशियाला प्रस्ताव देण्यात आल्याचा दावा एका स्पॅनिश दैनिकाने प्रसिद्ध केला आहे. त्यात रशियाला युरोपमधील नाटोच्या तळांचे परीक्षण करण्याची परवानगी देण्याच्या प्रस्तावाचा समावेश आहे. त्याचवेळी युक्रेनमध्ये नाटो क्षेपणास्त्रे तैनात करणार नसल्याच्या तरतुदीचाही उल्लेख आहे. रशियाने सीमेवरील लष्करी तैनाती मागे घेतल्यास शीतयुद्धाच्या काळातील शस्त्रकरारांचे पुनरुज्जीवन करण्याचे आश्‍वासनही देण्यात आल्याचे ‘एल पेस’ या स्पॅनिश दैनिकाने म्हटले आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info