मॉस्को – ‘युक्रेनने पोलंडमध्ये केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याने एक गोष्ट सिद्ध केली आहे. पाश्चिमात्यांकडून रशियाविरोधात छेडण्यात आलेले हायब्रिड वॉर त्यांनाच तिसऱ्या महायुद्धाच्या जवळ नेणारे पाऊल ठरते आहे’, या शब्दात रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्रि मेदवेदेव्ह यांनी पोलंडची घटना तिसऱ्या महायुद्धासाठी कारणीभूत ठरु शकते असा गंभीर इशारा दिला. मंगळवारी पोलंडमध्ये क्षेपणास्त्र हल्ला झाल्यावर युक्रेन व पोलंड हे देश रशिया आणि नाटोमध्ये थेट संघर्षाचा भडका उडावा यासाठी चिथावणी देत असल्याचा आरोप रशियाने केला होता. त्यानंतर आता मेदवेदेव्ह यांनी थेट तिसऱ्या महायुद्धासंदर्भात वक्तव्य केल्याने त्याकडे लक्ष वेधले गेले आहे.
पोलंडमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर सुरुवातीच्या काही तासांमध्ये युक्रेन तसेच पोलंडच्या नेत्यांकडून तसेच अधिकाऱ्यांकडून आक्रमक वक्तव्ये करण्यात आली होती. युक्रेनने रशियावर आरोपांची राळ उडवून नाटोने रशियाला प्रत्युत्तर देण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी केली होती. नाटोचा सदस्य देश असलेल्या पोलंडनेही नाटोच्या घटनेनुसार ‘आर्टिकल फोर’ अंतर्गत क्षेपणास्त्र हल्ल्याच्या प्रकरणावर चर्चा व्हावी, अशी आग्रही भूमिका घेतली. पोलंडसह पूर्व युरोपातील काही देशांनी आपल्या संरक्षणदलांना अलर्टवर राहण्याचे आदेश जारी केले होते.
मंगळवारी झालेल्या हल्ल्यासाठी रशियन बनावटीच्या ‘एस-३००’ हवाईसुरक्षा यंत्रणेतून सुटलेल्या क्षेपणास्त्राचा वापर झाल्याचे उघड झाले असले तरी सदर यंत्रणा युक्रेनच्या संरक्षणदलाकडून वापरण्यात येत असल्याचेही समोर आले आहे. क्षेपणास्त्र हल्ल्याच्या घटनेनंतर अमेरिका व नाटोकडून सावधगिरीची भूमिका घेण्यात येत असतानाही या युक्रेन व पोलंडकडून करण्यात येणारी वक्तव्ये आणि आक्रमकता यावर रशियाने शंका उपस्थित केल्या आहेत. हल्ला रशियाने केलेला नाही हे पुराव्यानिशी समोर येत असतानाही युक्रेन आपल्या भूमिकेपासून माघार घेण्यास तयार नसल्याने क्षेपणास्त्र हल्ल्याच्या घटनेचे गूढ अधिकच वाढत चालले आहे.
दरम्यान, रशियाने गुरुवारी युक्रेनवर पुन्हा एकदा घणाघाती क्षेपणास्त्र हल्ले केले. राजधानी किव्हसह झॅपोरिझिआ, डिनिप्रो यासह अनेक शहरांवर हे हल्ले करण्यात आल्याचे सांगण्यात येते. काही शहरांमध्ये जीवितहानी झाल्याचेही समोर आले आहे. हल्ल्यांमध्ये पूर्व युक्रेनमधील युक्रेनी इंधनकंपनीच्या साठ्यांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती युक्रेनी अधिकाऱ्यांनी दिली.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |