अमेरिकेपर्यंत पोहोचू शकणाऱ्या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची उत्तर कोरियाकडून चाचणी

- अमेरिका व दक्षिण कोरियाने लेझर गायडेड बॉम्ब डागले

अमेरिकेपर्यंत पोहोचू शकणाऱ्या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची उत्तर कोरियाकडून चाचणी

सेऊल – कोरियन क्षेत्रातील वातावरण अधिकाधिक स्फोटक बनत चालले आहे. अमेरिकेवर घणाघाती हल्ले चढविण्याच्या धमक्या देणाऱ्या उत्तर कोरियाने शुक्रवारी आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. १५ हजार किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकणाऱ्या या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या टप्प्यात अमेरिका येत असून याद्वारे उत्तर कोरियाने थेट अमेरिकेला इशारा दिल्याचा दावा दक्षिण कोरिया व जपान करीत आहे. यानंतर पुढच्या काही तासातच अमेरिका व दक्षिण कोरियाने हवाई सरावात लेझर गायडेड बॉम्ब डागून उत्तर कोरियाला प्रत्युत्तर दिले.

गेले वर्षभर उत्तर कोरियाने लघू, मध्यम पल्ल्याचे रॉकेट्स आणि क्षेपणास्त्रांच्या चाचणीचा सपाटा लावला होता. पण अचानक गेल्या दोन आठवड्यांपासून उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागणे सुरू केले आहे. शुक्रवारी सकाळी स्थानिक वेळेनुसार, सव्वादहाच्या सुमारास उत्तर कोरियाच्या लष्कराने पूर्वेकडील सागरी क्षेत्राच्या दिशेने आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले. सदर क्षेपणास्त्राने एक हजार किलोमीटरची उंची गाठून जपानच्या ओशिमा बेटापासून जवळपास २०० किलोमीटर अंतरावर कोसळले.

जपान व दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली. गेल्या दहा दिवसात दुसऱ्यांदा उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्राने जपानच्या सागरी हद्दीत प्रवेश केल्याची टीका जपानने केली. तर गेल्या महिन्यात उत्तर कोरियाच्या एका क्षेपणास्त्राने जपानची हवाईहद्द ओलांडली होती, याकडे जपानचे संरक्षण मंत्रालय लक्ष वेधत आहे. शुक्रवारी डागलेले आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र १५ हजाराहून अधिक किलोमीटर अंतर ओलांडू शकते. त्यामुळे या क्षेपणास्त्राच्या अमेरिकेची अतिपूर्वेकडील न्यूयॉर्क शहरे देखील येतात, असा इशारा जपानच्या संरक्षण मंत्रालयाने दिला.

पूर्व आशियात तणाव निर्माण करणाऱ्या उत्तर कोरियाच्या या प्रक्षोभक क्षेपणास्त्र चाचण्यांचा जपान कठोर शब्दात निषेध करीत असल्याचे जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी म्हटले आहे. अशा कारवाया अजिबात सहन केल्या जाणार नाहीत, असे जपानच्या पंतप्रधानांनी उत्तर कोरियाला ठणकावले. पंतप्रधान किशिदा ‘एशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन-ॲपेक’च्या बैठकीसाठी थायलंडमध्ये आहेत. उत्तर कोरियाने ही चाचणी घेतल्यानंतर अमेरिका व दक्षिण कोरियाच्या हवाईदलाचा शुक्रवारी एक विशेष सराव पार पडला. यामध्ये दोन्ही देशांच्या ‘एफ-३५’ या स्टेल्थ लढाऊ विमानांनी सहभाग घेतला होता. यावेळी एफ-३५ विमानांमधून ‘जीबीयू-१२’ या लेझर गायडेड बॉम्बचा मारा करण्यात आला. उत्तर कोरियाला इशारा देण्यासाठी अमेरिका व दक्षिण कोरियाने हा सराव केल्याचा दावा स्थानिक माध्यमे करीत आहेत.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info