मॉस्को/किव्ह – रशियन फौजांनी दक्षिण युक्रेनमधील खेर्सनसह डोनेत्स्क मधील हल्ले अधिक तीव्र केले आहेत. गेले दोन दिवस सातत्याने खेर्सन शहरात तसेच डोनेत्स्क प्रांतातील विविध शहरांमध्ये तोफा, रॉकेट्स व मॉर्टर्ससह क्षेपणास्त्रांचा मारा सुरू आहे. या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवरच रशिया दक्षिण युक्रेनमध्ये मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी दिला. दरम्यान, युक्रेनने रशियाच्या ब्रिआंस्क प्रांतातील इंधनसाठ्यांवर ड्रोनहल्ला चढविला असून हा साठा रशियन लष्कराचा भाग असल्याचे सांगण्यात येते.
युक्रेनच्या मुख्य शहरांवर क्षेपणास्त्रांचे हल्ले करून वीज व पाणीपुरवठा यंत्रणा निकामी करणाऱ्या रशियाने डोन्बास व खेर्सनमधील कारवायांची तीव्रता अधिकच वाढविली आहे. अवघ्या एका आठवड्याच्या अवधीत रशियाने खेर्सन शहरावर अडीचशेहून अधिक हल्ले केल्याचे युक्रेनकडून सांगण्यात आले. ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेनेही याला दुजोरा दिला असून एका दिवसात तब्बल ५४वेळा हल्ले केल्याची माहिती दिली. या हल्ल्यांमुळे खेर्सनचा ताबा घेतलेल्या युक्रेनी लष्कराला शहरातील स्थिती पूर्वपदावर आणणे अद्यापही शक्य झालेले नाही. त्याचवेळी डिनिप्रो नदीच्या दुसऱ्या भागावर ताबा मिळवून रशियन लष्कराला मागे रेटण्याचे प्रयत्नही थंडावल्याचे सांगण्यात येते.
खेर्सनवरील हल्ले कायम ठेवतानाच पूर्व युक्रेनमध्येही रशियाकडून घणाघाती हल्ले करण्यात आले. गेल्या काही दिवसात रशियाने डोन्बास क्षेत्रातील जवळपास चार नव्या भागांवर ताबा मिळविल्याचे सांगण्यात येते. रशियन लष्कराने बाखमतच्या दिशेनेही आगेकूच केली असून युक्रेनी लष्कराकडून होणारा प्रतिकार कमी झाल्याचे दावे रशियन वृत्तसंस्थांनी केले आहेत. डोन्बासमधील भागांबरोबरच सुमी व खार्किव्हमध्येही मारा करण्यात येत असल्याचे रशियाच्या संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले. रशियाच्या या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशिया दक्षिण युक्रेनमध्ये मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला आहे.
दरम्यान, युक्र्रेनने रशियाच्या ब्रिआन्स्क प्रांतातील इंधनसाठ्यांवर ड्रोनहल्ला चढविल्याचे समोर आले. या हल्ल्यांमुळे या भागातील तीन मोठ्या ऑईल टँक्सनी पेट घेतला असून प्रचंड मोठी आग भडकली आहे. रशियन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चार चौरस किलोमीटर परिसरात आग भडकली आहे. गेल्या महिन्यातही युक्रेनने बेलगोरोदमधील इंधनसाठ्यांना लक्ष्य केले होते. बुधवारी झालेल्या हल्ल्यातील इंधनसाठे रशियन लष्कराच्या पुरवठ्याचा भाग होते, असे सांगण्यात येते. युक्रेनने गेल्या काही महिन्यात सीमाभागाला जोडून असलेल्या रशियन प्रांतांवर सातत्याने हल्ले केले आहेत.
Englishया बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |