वॉशिंग्टन – ‘हवामानबदल रोखण्यासाठी अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने काही पर्याय निवडले आहेत. हे पर्याय पाश्चिमात्यांच्या आघाडीचे तुकडे करणारे आहेत’, अशा शब्दात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी अमेरिकेला खडसावले. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याशी विविध मुद्यांवर चर्चा केली. यावेळी रशिया-युक्रेन युद्ध व इतर मुद्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये एकमत दिसून आले असले तरी इंधन निर्यात व व्यापारावरील मतभेद कायम असल्याचे स्पष्ट झाले.
रशिया-युक्रेन युद्धात युक्रेनला समर्थन देऊन आपली एकजूट दाखविणाऱ्या पाश्चिमात्य आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचे हळुहळू समोर येत आहे. गेल्या शुक्रवारी युरोपिय महासंघाच्या मंत्र्यांच्या बैठकीत सदस्य देशांचे मंत्री तसेच महासंघातील अधिकाऱ्यांनी अमेरिकेवर घणाघाती टीका केली होती. रशिया-युक्रेन युद्धात शस्त्रे व इंधनाची विक्री करून अमेरिका स्वतःचा फायदा करून घेत आहे, असा ठपका युरोपिय मंत्र्यांनी ठेवला होता. महासंघाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अमेरिका युरोपचा सहकारी राहिला आहे की नाही, अशा कडवट शब्दात आपली नाराजी व्यक्त केली होती. युरोपमधून होणाऱ्या या टीकेच्या पार्श्वभूमीवर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष अमेरिकेच्या दौऱ्यावर दाखल झाले होते.
बुधवारी राजधानी वॉशिंग्टनमधील फ्रेंच दूतावासात झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही अमेरिकेच्या धोरणांवर टीकास्त्र सोडले. ‘अमेरिकेने केलेल्या नव्या कायद्यामुळे अमेरिका व युरोपमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. मतभेद इतके टोकाला गेले आहेत अमेरिकेतील कंपन्या यापुढे युरोपात गुंतवणूक करतील की नाही अशी शंका निर्माण झाली आहे’, अशा शब्दात मॅक्रॉन यांनी बायडेन प्रशासनाच्या ‘इन्फ्लेशन रिडक्शन ॲक्ट’वर टीका केली. गुरुवारी एका अमेरिकी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतही त्यांनी या कायद्यावर कोरडे ओढले.
‘रशिया-युक्रेन युद्ध व इतर अनेक भूराजकीय मुद्यांवर अमेरिका व फ्रान्स परस्परांच्या सहकार्याने पुढे जात आहेत. मात्र हवामानबदलासंदर्भातील विधेयक व सेमीकंडक्टर्सच्या बाबतीत अमेरिकने युरोपबरोबर समन्वय राखल्याचे दिसत नाही. त्यामुळे या क्षेत्रात समान स्पर्धेची संधी नाकारली गेली आहे’, असा दावा फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी केला. गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये बायडेन यांच्याबरोबर झालेल्या चर्चेतही मॅक्रॉन यांनी ‘इन्फ्लेशन रिडक्शन ॲक्ट’चा मुद्दा उपस्थित केला. यावेळी बायडेन यांनी, मी यावर माफी मागू शकत नाही, कारण कायद्यावर मीच स्वाक्षरी केली आहे, अशा शब्दात आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी त्यात काही दुरुस्ती केली जाऊ शकेल, असे आश्वासनही दिले.
रशिया-युक्रेन मुद्यावर अमेरिका व युरोपिय देशांकडून युक्रेनला देण्यात येणारे सहाय्य कायम ठेवण्याचा निर्धार दोन्ही राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केला. पुतिन यांनी आक्रमण थांबविण्याचा निर्णय घेतला तर आपण त्यांच्याशी चर्चेस तयार आहोत, असा दावाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी यावेळी केला. रशिया-युक्रेन युद्धासह काही मुद्यांवर अमेरिका व फ्रान्समध्ये सहकार्य असले तरी अनेक बाबतीत मतभेद असल्याचेही समोर आले आहे. गेल्या वर्षी अमेरिकेने ब्रिटनच्या सहाय्याने ऑस्ट्रेलियाबरोबर केलेल्या ‘ऑकस डील’वरून फ्रान्स व अमेरिकेत तणाव निर्माण झाला होता. फ्रान्सने अमेरिकेतील आपल्या राजदूतांना माघारी बोलविण्याचाही निर्णय घेतला होता. दोन देशांमधील मतभेद पूर्णपणे दूर झाले नसल्याचे मॅक्रॉन-बायडेन भेटीवरून दिसून येत आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |