कझाकस्तानच्या राष्ट्राध्यक्षांकडून हिंसक निदर्शकांवर गोळ्या घालण्याचे आदेश

– सुरक्षादलांच्या कारवाईत 26 जणांचा बळी
– चीनकडून निदर्शकांवरील कारवाईचे समर्थन
– रशियाचे लष्कर नूर सुल्तानमध्ये दाखल

नूर सुल्तान/मॉस्को – सुरक्षादलांवर हल्ले व राष्ट्रीय संपत्तीची नासधूस करून अराजक माजविणारे निदर्शक नाहीत, तर ते दहशतवादी असल्याचा ठपका कझाकस्तानचे राष्ट्राध्यक्ष कॅसिम-जोमार्ट तोकायेव यांनी ठेवला. अशा दहशतवाद्यांना दिसता क्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश राष्ट्राध्यक्ष तोकायेव यांनी दिले. गेल्या चोवीस तासात कझाकस्तानच्या सुरक्षादलांनी केलेल्या कारवाईत 26 जण ठार झाले असून तीन हजारांहून अधिक जणांना ताब्यात घेतले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्राध्यक्ष तोकायेव यांनी ही कठोर भूमिका स्वीकारली आहे.

गोळ्या घालण्याचे आदेश

तीन दशकांपूर्वी सोव्हिएत रशियातून बाहेर पडल्यानंतर कझाकस्तानमध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंसक निदर्शने झाली. निदर्शकांनी राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान तसेच सरकारी इमारती, पोलीस स्टेशनवर हल्ले चढविले होते. यामध्ये कझाकस्तानच्या सुरक्षादलांचे 18 जवान मारले गेले आहेत. राष्ट्राध्यक्ष तोकायेव यांनी आणीबाणी जारी केल्यानंतर सुरक्षादलांनी केलेल्या कारवाईत 26 जण ठार तर 18 जण जखमी झाले.

कझाकस्तानच्या अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, तीन हजार जणांना ताब्यात घेतले आहे. निदर्शकांच्या हल्ल्यांमध्ये सातशेहून अधिक जवान जखमी झाल्याची माहिती अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने दिली. राष्ट्राध्यक्ष तोकायेव यांनी इंटरनेट सेवा बंद केल्यामुळे कझाकस्तानमधील निदर्शनांचे नेमकी माहिती समोर येत नसल्याचे पाश्‍चिमात्य माध्यमांचे म्हणणे आहे.

गुरुवारच्या हिंसाचारानंतर राष्ट्राध्यक्ष तोकायेव यांनी शुक्रवारी कझाकस्तानला संबोधित करताना हिंसाचार थांबविण्याचे आवाहन केले. इंधनाचे दर आधीपेक्षाही कमी केल्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष तोकायेव यांनी केली. तसेच यापुढे शरण येणाऱ्या निदर्शकांवर कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नसल्याचे आश्‍वासन तोकायेव यांनी दिले. पण हिंसाचारावर ठाम असलेल्या दहशतवाद्यांना दिसता क्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश कझाकस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी दिले. कझाकस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी निदर्शकांविरोधात स्वीकारलेल्या कारवाईवर अमेरिका व युरोपमधून टीका होत असताना चीनने त्याचे समर्थन केले आहे.

कझाकस्तानमधील सर्वात मोठे शहर असलेल्या अल्माटीमध्ये भीषण हिंसाचार सुरू असल्याच्या बातम्या येत आहेत. तर काही ठिकाणी स्फोट आणि गोळीबार झाल्याचा दावा आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था करीत आहे. यानंतर संपूर्ण कझाकस्तानमध्ये ‘रेड अलर्ट` जारी करण्यात आला आहे. कझाकस्तानमधील परिस्थिती हाताळण्यासाठी रशियाप्रणित माजी सोव्हिएत देशांच्या ‘कलेक्टिव्ह सिक्युरिटी ट्रिटी ऑर्गनायझेशन-सीएसटीओ`ची पथके राजधानी नूर सुल्तानमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.

रशियन लष्कराचे मोठे पथक लष्करी वाहनांसह कझाकस्तानमध्ये उतरले असून पुढच्या काही तासात आर्मेनियाचे पथकही कझास्तानात उतरणार आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info