वॉशिंग्टन/मॉस्को – ‘आपण रशियाला कमी लेखून चालणार नाही. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन युक्रेनमध्ये दीर्घकालिन युद्धाची योजना आखत आहेत. रशियाकडून सैन्याची अतिरिक्त जमवाजमव सुरू आहे. या युद्धासाठी रशियन लष्कर अधिक हानी स्वीकारण्यास तयार असल्याचेही दिसते. रशिया नवी शस्त्रे मिळविण्याचाही प्रयत्न करीत आहे. युक्रेनमधील युद्ध दीर्घकाळ सुरू ठेवण्यासाठी पुतिन यांनी तयारी केली आहे व ते लवकरच नवी आक्रमक मोहीम हाती घेऊ शकतात’, असा इशारा नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी दिला. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनीही त्याला दुजोरा दिला असून रशियाकडे अधिक मोठे हल्ले करण्यासाठी पुरेशी क्षेपणास्त्रे आहेत, असे बजावले.
युक्रेनचे युद्ध जितका अधिक काळ लांबेल, तितक्याच प्रमाणात रशियाला हानी सहन करावी लागेल, असे जगभरातील सामरिक विश्लेषक सांगत होते. रशियाचे आर्थिक व लष्करी स्त्रोत या युद्धात मोठ्या प्रमाणात वापरले जातील आणि यामुळे रशियाचे सामर्थ्य क्षीण होईल, असा तर्क या दाव्यामागे होता. पण युक्रेनचे युद्ध सुरू होऊन दहा महिने झाले तरी रशियाची अर्थव्यवस्था व लष्करी क्षमतेवर याचा फार मोठा गंभीर परिणाम झालेला नाही. उलट रशियन अर्थव्यवस्था या युद्धाच्या काळात अधिकच बळकट बनत चालली असून रशियाचा प्रभावही वाढतो आहे. यामुळे रशिया युक्रेनचे युद्ध संपविण्यासाठी अजिबात उत्सुक नाही. उलट आपले ध्येय साध्य झाल्याखेरीज हे युद्ध थांबणार नाही, असे रशियन नेते आत्मविश्वासाने सांगत आहेत. अशा परिस्थितीत, रशियाला युक्रेनने दिलेल्या टक्करीची मुक्तकंठाने प्रशंसा करणारे अमेरिका व नाटोचे सदस्य देश हवालदिल बनले आहेत. नाटो प्रमुख स्टोल्टनबर्ग यांच्या विधानातून त्याचा दाखला मिळतो आहे.
गेल्या दहा महिन्यांच्या कालावधीत युक्रेनच्या सैन्याने काही वेळेस रशियन लष्कराला माघार घेण्यास भाग पाडले होते. युक्रेनची ही कामगिरी म्हणजे रशियाचा पराभव असल्याच्या बढाया युक्रेनसह पाश्चिमात्य माध्यमांनी मारण्यास सुरुवात केली होती. मात्र प्रत्यक्षात दोन ते तीन माघारींनंतरही रशियन दले अधिक आक्रमकपणे हल्ले करीत असल्याचे व मोठ्या हल्ल्यांची त्यांची क्षमता कायम असल्याचे दिसून आले आहे. नाटोचे प्रमुख स्टॉल्टनबर्ग यांनीही याची जाणीव करून दिली. ‘रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनवर ताबा मिळविण्याचे ध्येय ठेले होते. या ध्येयापासून ते दूर केल्याचे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत’, याकडे नाटोच्या प्रमुखांनी लक्ष वेधले.
इतर युद्धांप्रमाणे रशिया-युक्रेन युद्धाची अखेरही वाटाघाटींनीच होईल, असे वाटते. तसे झाल्यास युक्रेनचे सार्वभौम व स्वतंत्र राष्ट्र म्हणून स्थान अबाधित रहायला हवे, असा दावाही स्टॉल्टनबर्ग यांनी केला. त्यासाठी युक्रेनला शस्त्रपुरवठा सुरू ठेऊन रशिया रणांगणावर कधीही जिंकणार नाही याची जाणीव पुतिन यांना करून देणे गरजेचे आहे, असेही नाटो प्रमुख म्हणाले. युद्ध जिंकणार नाही हे कळल्यानंतरच रशिया चर्चेसाठी तयार होईल, असेही स्टॉल्टनबर्ग यांनी बजावले.
नाटो प्रमुखांपाठोपाठ युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनीही रशिया नवे व मोठे हल्ले करण्याची क्षमता राखून असल्याचा इशारा दिला आहे. ब्रिटनच्या संरक्षणन विभागानेही, गेल्या काही दिवसांमध्ये रशियाकडून होणाऱ्या ‘लाँग रेंज स्ट्राईक्स’मध्ये वाढ झाल्याकडे लक्ष वेधले. गेल्या दोन महिन्यात रशियाने हजाराहून अधिक क्षेपणास्त्रे व ड्रोन्सचा वापर करून युक्रेनला लक्ष्य केल्याचे उघड झाले आहे.
हिंदीया बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |