डोन्बासमध्ये रशियन लष्कराने केलेल्या हल्ल्यात युक्रेनचे 200 जवान ठार

- रशियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची झॅपोरिझिआ अणुप्रकल्पाला भेट

मॉस्को/किव्ह – डोन्बास क्षेत्रातील रशियाच्या ताब्यातील जागा पुन्हा मिळविण्यासाठी युक्रेनने केलेल प्रतिहल्ले अपयशी ठरल्याचे समोर येत आहे. गेल्या 48 तासांमध्ये युक्रेनचे दोन मोठे हल्ले उधळण्यात आले असून त्यात 200हून अधिक युक्रेनी जवान ठार झाले आहेत. डोन्बास क्षेत्रातील रशियन अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली. रशियाने गेल्या काही दिवसात डोन्बास क्षेत्रावरच आपले लक्ष केंद्रित केले असून त्याला यश मिळत असल्याचे नव्या माहितीवरून दिसून येते. डोन्बासबरोबरच युक्रेनच्या दक्षिण व उत्तरेकडील भागांमध्येही रशियाने तोफा तसेच रॉकेट्सचा मारा केल्याचे युक्रेनकडून सांगण्यात आले.

जवान ठार

युक्रेनमधील लष्करी मोहीमेला सुरुवात केल्यानंतर रशियन फौजांनी दक्षिण युक्रेनमधील खेर्सन व झॅपोरिझिआसह पूर्व युक्रेनमधील लुहान्स्क प्रांतावर पूर्ण ताबा मिळविला होता. लुहान्स्कवरील ताबा हा रशियन मोहिमेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. ऑक्टोबर महिन्यानंतर युक्रेनी लष्कराने प्रतिहल्ल्यांची मोहीम तीव्र करीत लुहान्स्कमधील रशियन आघाड्यांवरही हल्ले चढविण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला या भागात मिळालेल्या यशानंतर युक्रेनला मोठी आघाडी मिळविण्यात अपयश आले आहे. मात्र तरीही गेल्या काही दिवसांमध्ये युक्रेनने लुहान्स्कच्या आघाडीवर नव्या लष्करी तुकड्या व शस्त्रसाठा तैनात केल्याचे दावे समोर आले होते.

जवान ठार

गेल्या आठवड्यापासून युक्रेनने लुहान्स्क प्रांतातील रशियन आघाड्यांवर हल्ले करण्यास सुरुवात केली होती. त्यात नोव्होल्युबोपव्हका, नेव्हस्कोये, मेकेयेव्हका, स्वातोवो, क्रेमिनाया यांचा समावेश आहे. या भागातील रशियन आघाड्यांवर सातत्याने रॉकेटस्‌‍, मॉर्टर्स व तोफांचे हल्ले सुरू होते. मात्र लुहान्स्कमधील स्थानिक सशस्त्र दल व रशियन फौजांनी या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिले. लुहान्स्कमधील या हल्ल्यांमध्ये युक्रेनचे 170हून अधिक जवान ठार झाल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली.लुहान्स्कबरोबरच डोनेत्स्कमध्येही युक्रेनचे हल्ले रोखण्यात यश मिळाल्याचे रशियाकडून सांगण्यात आले. डोनेत्स्कजवळ झालेल्या लढाईत युक्रेनचे 15हून अधिक जवान ठार झाल्याचे डोनेत्स्कमधील लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या हल्ल्यात युक्रेनी लष्कराचे रणगाडे, तोफा व सशस्त्र वाहने नष्ट करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

जवान ठार

डोन्बासबरोबरच रशियाने उत्तर व दक्षिण युक्रेनमधील हल्ल्यांचे सत्रही सुरू ठेवले आहे. उत्तर युक्रेनमधील खार्किव्ह शहरावर रशियाने रॉकेट्सचा मारा केला. तर दक्षिण युक्रेनमध्ये खेर्सन व ओलेश्की शहरांवर जोरदार हल्ले चढविले. खेर्सन शहर व जवळच्या परिसरात 24 तासांच्या अवधीत 50 हल्ले झाल्याची माहिती युक्रेनी अधिकाऱ्यांनी दिली. फक्त खेर्सन शहरात तब्बल 23 हल्ले झाले असून यात पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले. खेर्सन शहरावर सातत्याने होणाऱ्या या हल्ल्यांमुळे शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात शहर सोडून जात असल्याचे समोर आले आहे.

गेल्याच महिन्यात युक्रेनच्या फौजांनी खेर्सनवर ताबा मिळविताना लवकर सर्व काही सुरळीत होईल, असे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतर रशियाने या शहरावर अधिकच प्रखर हल्ले चढविले असून नागरिकांना शहर सोडून जाण्याव्यतिरिक्त पर्याय राहिलेला नाही, असा दावा स्थानिक अधिकाऱ्यांनी केला.

दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे निकटवर्तिय सर्जेई किरिलेन्को यांनी झॅपोरिझिआमधील अणुप्रकल्पाला भेट दिली. युक्रेन व आंतरराष्ट्रीय समुदायाकडून या प्रकल्पाच्या सुरक्षिततेबाबत सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर किरिलेन्को यांची भेट लक्ष वेधून घेणारी ठरते.

Englishहिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info