चीन तैवानविरोधी युद्धाची तयारी करीत आहे

- अमेरिकेच्या माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराचा इशारा

वॉशिंग्टन – ‘तैवानला चीनमध्ये सामील करण्याबाबत राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग अतिशय गांभीर्याने पावले उचलत आहेत. त्यांनी चिनी जनतेला तैवानविरोधी युद्धासाठी तयार राहण्याची सूचना दिली आहे. त्यामुळे चीन कोणत्याही क्षणी तैवानविरोधात युद्ध पुकारू शकतो’, असा इशारा अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जनरल एचआर मॅक्‌‍मास्टर यांनी दिला. त्याचबरोबर चीनविरोधी युद्धासाठी तैवानला शस्त्रसज्ज केले तर ते अमेरिकेच्याच फायद्याचे ठरेल, असेही मॅक्‌‍मास्टर यांनी बायडेन प्रशासनाला सुचविले आहे.

तैवानविरोधी

अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपद भूषविलेल्या मॅक्‌‍मास्टर यांनी अमेरिकी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बायडेन प्रशासनाची धोरणे आणि अमेरिकेसमोरील आव्हाने यावर आपली परखड मते मांडली. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे इरादे चांगले नाहीत. अशावेळी बायडेन प्रशासनाने चीनबाबत स्वीकारलेली भूमिका अमेरिकेच्या हितसंबंधांसाठी हितकारक ठरत नाही, याची जाणीव मॅक्‌‍मास्टर यांनी करुन दिली.

“आर्थिक, व्यापारी आणि ‘वुल्फ वॉरिअर डिप्लोमसी’च्या आघाडीवरच नाही तर लष्करी आघाडीवरही चीन अधिकाधिक आक्रमक बनत चालला आहे. ही अतिशय गंभीर बाब ठरते. पण त्याहून अधिक गंभीर म्हणजे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग आपल्या जनतेला तैवानविरोधी युद्धासाठी तयार करीत आहेत”, असे मॅक्‌‍मास्टर यांनी बजावले. चीनने याआधीही तैवानवर हल्ल्याच्या धमक्या दिल्या होत्या. पण जिनपिंग यांनी तैवानबाबत यावेळी दिलेले इशारे अधिक गंभीर असल्याचा दावा मॅक्‌‍मास्टर यांनी केला.

पाच महिन्यांपूर्वी तिसऱ्यांदा चीनच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर जिनपिंग यांनी आपल्या जनतेला संबोधित करताना तैवानवर हल्ला चढविण्याविषयी दिलेल्या इशाऱ्याकडे अमेरिकेने थेट युद्धाची धमकी म्हणून पहावे, असे मॅक्‌‍मास्टर म्हणाले. रशिया-युक्रेनप्रमाणे चीन-तैवान युद्धाचा भडका उडू नये, असे बायडेन प्रशासनाला वाटत असेल तर त्यांनी तैवानला आधीच शस्त्रसज्ज करावे, असेही अमेरिकेच्या माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी बजावले आहे.

दरम्यान, इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील आपल्या हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेने तैवानच्या सुरक्षेला महत्त्व द्यावे, अशी मागणी जपानने काही महिन्यांपूर्वी केली होती. पण बायडेन प्रशासन अजूनही तैवानच्या सुरक्षेकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. उलट बायडेन प्रशासनाची धोरणे तैवानवर हल्ला चढविण्यासाठी चीनला प्रोत्साहन देणारी असल्याचे दावे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे टीकाकार करीत आहेत.

नाटोचे माजी प्रमुख तैवानच्या भेटीवर

तैपेई – नाटो या लष्करी संघटनेचे माजी प्रमुख आंद्रेस रासमुसेन मंगळवारी तैवानची राजधानी तैपेईमध्ये दाखल झाले. लवकरच ते तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन यांची भेट घेतील. तैवानच्या मुद्यावरुन अमेरिका व चीनमध्ये तणाव निर्माण झालेला असताना नाटोच्या माजी प्रमुखांची ही भेट लक्ष वेधून घेणारी ठरते.

तैवानविरोधी

रासमुसेन या भेटीतून तैवानला जगभरातील लोकशाहीवादी देशांचे समर्थन मिळवून देण्याचा आणि युरोपिय महासंघ-तैवान सहकार्य वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. ‘अलायन्स ऑफ डेमोक्रसीज्‌‍’ या अभ्यासगटाने हा दावा केला. डेन्मार्कचे माजी पंतप्रधान व त्यानंतर नाटोचे माजी प्रमुख असलेल्या रासमुसेन यांनीच 2017 साली या अभ्यासगटाची स्थापना केली होती.

तैवान हा आपलाच भूभाग असल्याचा दावा करणाऱ्या चीनसाठी रासमुसेन यांचा हा दौरा म्हणजे फार मोठे आव्हान असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय विश्लेषक करीत आहेत.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info