पूर्व युक्रेनमधील सोलेदारवर रशियाने नियंत्रण मिळविले

- ब्रिटनचा दावा

मॉस्को/लंडन/किव्ह – पूर्व युक्रेनमधील सोलेदार शहराच्या बहुतांश भागावर रशियाने नियंत्रण मिळविल्याचा दावा ब्रिटनच्या संरक्षण विभागाने केला. रशिया-युक्रेन युद्धात सहभागी असलेल्या ‘वॅग्नर मिलिटरी ग्रुप’ या कंत्राटी लष्करी कंपनीच्या पथकांनी सोलेदार ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येते. अमेरिकी संरक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही याला दुजोरा दिला आहे. मात्र युक्रेनने अजून याची पुष्टी केली नसून सोलेदारमध्ये प्रखर व रक्तरंजित संघर्ष सुरू असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, डोनेत्स्कमध्ये झालेल्या संघर्षात युक्रेनचे दीडशेहून अधिक जवान मारले गेल्याचे माहिती रशियासमर्थक बंडखोर गटाने दिली.

रशियाने नियंत्रण

डोनेत्स्क प्रांतातील सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक म्हणून सोलेदार ओळखण्यात येते. या शहरात ‘रॉक सॉल्ट’(सैंधव) व जिप्समच्या मोठ्या खाणी आहेत. यापूर्वी 2014 साली तसेच गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या संघर्षात रशियाने हे शहर ताब्यात घेतले होते. मात्र त्यानंतर युक्रेनी लष्कराने रशियन तुकड्यांना माघार घेण्यास भाग पाडले होते. त्यामुळे रशियासाठी या शहरावरील नियंत्रण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. हे शहर बाखमतपासून अवघ्या 18 किलोमीटर्स अंतरावर आहे. त्यामुळे बाखमतवरील ताब्यासाठी सोलेदारवरील नियंत्रण आवश्यक ठरते.

रशियाने नियंत्रण

रशियाने गेल्या काही दिवसांमध्ये आपले सर्व लक्ष बाखमतवर केंद्रित केल्याचे सांगण्यात येत होते. या शहरावर सातत्याने मोठे व प्रखर हल्ले करण्यात आले होते. मात्र युक्रेनने या शहरात भक्कम बचावफळी उभारल्याने थेट शहरावर ताबा मिळविणे कठीण झाले होते. या पार्श्वभूमीवर रशियन फौजांनी बाखमतवरील ताब्यासाठी नजिकच्या परिसरातील महत्त्वाच्या भागांवर हल्ले करून ती ताब्यात घेण्यास सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून सोलेदारला लक्ष्य करण्यात आले.

रशियन फौजा व ‘वॅग्नर ग्रुप’ने संयुक्तरित्या सोलेदारची मोहीम राबविल्याचे सांगण्यात येते. गेल्या चार दिवसांहून अधिक काळ सुरू असलेल्या लढाईनंतर सोलेदार जवळपास रशियाच्या ताब्यात आल्याचे समोर आले आहे. ब्रिटन व अमेरिका या देशांनी यासंदर्भात केलेली वक्तव्ये त्याला पुष्टी देणारी ठरतात. मात्र युक्रेन तसेच रशिया या दोन्ही देशांनी अधिकृतरित्या सोलेदारसंदर्भातील वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. सोलेदारवरील ताब्यानंतर पुढील काही दिवसात रशिया बाखमतवर नियंत्रण मिळवू शकतो, असा दावा काही विश्लेषकांनी केला आहे.

रशियाने नियंत्रण

रशियाने डोनेत्स्क प्रांतांच्या इतर भागांसह सुमी तसेच मायकोलेव्ह भागातही मोठे हल्ले केले आहेत. सोमवारी सुमी प्रांतात 90हून अधिक हल्ले झाले. यात तोफा व रॉकेटस्‌‍चा वापर करण्यात आला. या हल्ल्यांमध्ये अनेक इमारती तसेच घरे उद्ध्वस्त झाल्याचे सांगण्यात येते. तर डोनेत्स्क भागात झालेल्या संघर्षात रशिया समर्थक बंडखोर गटाने युक्रेनच्या दीडशेहून अधिक जवानांना ठार केल्याचा दावा केला.

दरम्यान, रशियाची प्रगत विनाशिका ‘ॲडमिरल गोर्शकोव्ह’ नॉर्वेजिअन सागरी क्षेत्रात दाखल झाल्याचे सांगण्यात येते. हायपरसोनिक क्षेपणास्त्रे तैनात असणाऱ्या या विनाशिकेकडून ‘एअर डिफेन्स एक्सरसाईज’ सुरू असल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info