अमेरिका-तैवानच्या संरक्षण सहकार्यावर चीनची नवी धमकी

अमेरिका-तैवानच्या संरक्षण सहकार्यावर चीनची नवी धमकी

बीजिंग – चीनच्या ‘वन चायना पॉलिसी’ला हादरा देत अमेरिकेने तैवानला हवेतून जमिनीवर मारा करणार्‍या १३५ क्षेपणास्त्रांनी सज्ज करण्याचा निर्णय जाहीर केला. लढाऊ विमानातून प्रक्षेपित केली जाणारी ही क्षेपणास्त्रे चीनच्या किनारपट्टीवरील भूभागाला लक्ष्य करू शकतात. यामुळे संतापलेल्या चीनने तैवानला शस्त्रसज्ज करणार्‍या अमेरिकेला धमकावले. ही क्षेपणास्त्रे पुरवून अमेरिका तैवानच्या स्वातंत्र्याची मागणी करणार्‍या विघटनवादी गटांना चीनच्या विरोधात भडकवित आहे. या सहकार्याविरोधात चीनच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती पावले उचलण्यात येतील, अशी धमकी चीनने दिली. काही दिवसांपूर्वीच चीनने तैवानवर हल्ल्यासाठी ‘एस-४००’ व हायपरसोनिक क्षेपणास्त्रे रोखली होती.

चीन तैवानविरोधातील युद्धापासून फक्त एक पाऊल दूर असल्याचा दावा चीनचे माजी लष्करी अधिकारी करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’कडून सातत्याने युद्धसराव सुरू असून, त्याचे व्हिडिओ व फोटोग्राफ्स प्रसिद्ध करण्यात येत आहेत. हे सराव तैवानवरील हल्ल्याची रंगीत तालीम असल्याचे दावे चीनच्या सरकारी माध्यमांकडून करण्यात येत आहेत. तर गेल्याच आठवड्यात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी चीनच्या लष्करी तळांना भेट देऊन युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेशही दिले होते. त्यानंतर चीनने तैवानच्या सीमेपासून जवळ असणार्‍या भागात ‘डीएफ-१७’ ही हायपरसोनिक क्षेपणास्त्रे व ‘एस-४००’ ही प्रगत हवाईसुरक्षा यंत्रणा तैनात केल्याची माहिती उघड झाली होती. तसेच ‘जे-२०’ या स्टेल्थ लढाऊ विमानांचा समावेश असलेल्या २० ‘एअरफोर्स ब्रिगेड्स’ तसेच ‘मरिन कॉर्प्स’च्या १० तुकड्या तैवाननजिक असणार्‍या संरक्षणतळांवर तैनात करण्यात आल्या होत्या.

चीनने तैवानजवळ केलेल्या या लष्करी हालचालीला काही तास उलटत नाही तोच अमेरिकेने तैवानला १३५ क्षेपणास्त्रांची विक्री करण्याचे जाहीर केले. १.८ अब्ज डॉलर्सच्या सहकार्याअंतर्गत देण्‍यात येणार्‍या या क्षेपणास्त्रांमुळे आपल्या संरक्षण सज्जतेत वाढ होईल, असा दावा तैवान करीत आहे. सुमारे ३०० किलोमीटर अंतरापर्यंत मारा करू शकणारी ही क्षेपणास्त्रे चीनच्या फुजियांग व ग्वांगदोग प्रांतातील शहरांपर्यंत हल्ले चढवू शकतात. पण चीनच्या कम्युनिस्ट पार्टीशी तैवानची कुठलीही शस्त्रस्पर्धा नसून रणनीतिक संकल्पनेसह व बचावात्मक आवश्यकतांनुसार तैवान ही शस्त्रखरेदी करीत असल्याचे तैवानचे संरक्षणमंत्री येन दे-फा यांनी स्पष्ट केले.

पण या सहकार्यामुळे चीन संतापला असून अमेरिकेने १९७०च्या दशकात अमेरिका आणि चीनमध्ये प्रस्थापित झालेल्या करारांचे उल्लंघन केल्याचा आरोप चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला. तैवान हा चीनचा अविभाज्य भूभाग असून या सहकार्यामुळे तैवानच्या स्वातंत्र्याची मागणी करणार्‍या विघटनवादी गटांना अमेरिकेने चुकीचे संकेत दिल्याची टीका चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी केली. या सहकार्यामुळे अमेरिका, चीन द्विपक्षीय संबंध अधिकच बिघडल्याचा आरोप लिजियाने यांनी केला. अमेरिकेच्या या निर्णयाच्या विरोधात लवकरच पावले उचलली जातील, अमेरिकेला प्रत्युत्तर मिळेल, असा इशारा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info