मॉस्को – ‘रशियाच्या प्रतिस्पर्ध्यांनी रशियाच्या अंधकारमय भवितव्याबाबत काही भाकिते वर्तविली होती. ती सर्व भाकिते चुकीची ठरली आहेत’, अशी ग्वाही रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिली. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यावर अमेरिकेसह पाश्चिमात्य देश व इतर मित्रदेशांनी रशियाविरोधात मोठ्या प्रमाणात निर्बंध लादले होते. रशियन अर्थव्यवस्थेसह जवळपास सर्व क्षेत्रांना लक्ष्य करून रशियन राजवटीला कमकुवत करण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. रशिया कमकुवत झाल्यावर युक्रेनमधील संघर्ष थांबविल, असा दावा पाश्चिमात्यांकडून करण्यात आला होता. मात्र निर्बंध लादून अनेक महिने उलटल्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरू असून अर्थव्यवस्थेला मोठा हादरा देण्याचे प्रयत्नही फसल्याचे दिसत आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिलेली ग्वाही त्याला दुजोरा देणारी ठरते.
गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस रशियाने युक्रेनविरोधातील लष्करी मोहीम सुरू केली होती. दहा महिने उलटल्यानंतरही या मोहिमेअंतर्गत रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरू असून नवी शहरे व भाग ताब्यात घेतल्याचे दावे रशियाकडून करण्यात येत आहेत. शुक्रवारी रशियाच्या संरक्षण विभागाने, डोन्बास क्षेत्रातील सोलेदार शहर ताब्यात घेतल्याची अधिकृत घोषणा केली. गुरुवारी रात्री 12 जानेवारीला सोलेदार युक्रेनच्या ताब्यातून मुक्त करण्यात आल्याचे रशियाच्या संरक्षण विभागाने म्हटले आहे. पुढील आक्रमक मोहिमांसाठी सोलेदारचा ताबा महत्त्वपूर्ण असल्याचेही यात सांगण्यात आले. पाश्चिमात्य माध्यमांनीही युक्रेनच्या लष्करी तुकड्यांनी सोलेदारमधून माघार घेतल्याचे वृत्त देत रशियाने केलेल्या दाव्यांना दुजोरा दिला आहे.
दरम्यान, सोलेदारवर ताबा मिळवितानाच रशियन फौजांकडून ‘स्वातोव-क्रेमिना’ भागात नवे हल्ले चढविण्यात आले आहेत. त्याचवेळी बाखमत, ॲव्हडिव्हका व डोनेत्स्क शहराच्या पश्चिमेकडील भागात संघर्ष तीव्र झाल्याचे सांगण्यात आले. डिनिप्रो नदीच्या पश्चिम भागातही रशियन लष्कराकडून जोरदार मारा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. रशियाने बाखमत शहरावर लक्ष केंद्रित केले असून खार्किव्ह प्रांतातील काही भागांमध्ये आगेकूच करण्याचीही तयारी केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. रशियाकडून नवे हल्ले सुरू असतानाच बेलारुसने आपल्या आर्टिलरी युनिट्सना ॲलर्टवर राहण्याचे आदेश दिल्याचे वृत्त समोर आले आहे.
रशियन हल्ल्यांची तीव्रता वाढत असतानाच युक्रेनने पाश्चिमात्य देशांनी तातडीने शस्त्रपुरवठा करावा, अशी मागणी लावून धरली आहे. त्याला फ्रान्सने प्रतिसाद दिल्याचे समोर आले असून ‘एएमएक्स-आरसी 10’ हे वजनाने हलके असणारे रणगाडे पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी फ्रान्सने युक्रेनला ‘सीझर आर्टिलरी सिस्टिम’ तसेच रणगाडाभेदी क्षेपणास्त्रे पुरविली होती. युक्रेनचे सुमारे दोन हजार जवान फ्रान्समध्ये लष्करी प्रशिक्षण घेत असल्याचेही सांगण्यात येते.
फ्रान्सकडून करण्यात येणाऱ्या नव्या शस्त्रपुरवठ्यावर रशियाने तीव्र प्रतिक्रिया दिली. फ्रान्सचा निर्णय हे बेजबाबदार पाऊल असून त्यामुळे रशिया-युक्रेन संघर्षाला अधिकच चिथावणी मिळेल, अशी टीका रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिआ झाखारोव्हा यांनी केली.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |