मॉस्को/किव्ह – शनिवारी युक्रेनची राजधानी किव्ह आणि खार्किव्ह प्रांतात रशियाने क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा केला. या माऱ्यात दोन्ही शहरांमधील पायाभूत सुविधा व ऊर्जाप्रकल्पांना लक्ष्य करण्यात आले. याचे परिणाम दिसू लागले असून युक्रेनच्या आपत्कालिन यंत्रणा या हल्ल्याने झालेली हानी निस्तारण्यासाठी धडपडत असल्याचे समोर येत आहे. रशियाच्या हल्ल्यांची तीव्रता वाढत असतानाच, संयुक्त राष्ट्रसंघातील रशियाचे राजदूत व्हिसली नेबेन्झिया यांनी युक्रेनच्या युद्धावरून सज्जड इशारा दिला. रशियाचे हेतू साध्य झाल्याखेरीज युक्रेनचे युद्ध थांबणार नाही, असे रशियन राजदूतांनी स्पष्ट शब्दात बजावले आहे.
किव्ह तसेच खार्किव्हवर रशियाने केलेल्या या क्षेपणास्त्र हल्ल्यांचे सारे तपशील उघड झालेले नसले तरी खार्किव्ह प्रांताच्या गव्हर्नरांनी इथे रशियाच्या एस-300 क्षेपणास्त्रांचा मारा झाल्याचा दावा केला. या क्षेपणास्त्रांनी ऊर्जाप्रकल्प व उद्योगक्षेत्राला लक्ष्य केल्याचे गव्हर्नरांनी म्हटले आहे. तर राजधानी किव्हमध्ये देखील नागरी वस्ती नसलेल्या भागामध्ये रशियन क्षेपणास्त्रे कोसळली. यामुळे जीवितहानी झालेली नसली तरी वीजपुरवठ्याशी निगडित असलेली ठिकाणे यामुळे बाधित झाल्याचा दावा केला जातो. त्यामुळे रशियाने युक्रेनमधील पायाभूत सुविधा प्रकल्प व ऊर्जाप्रकल्पांना लक्ष्य करण्याची तयारी सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत. याआधीही रशियाने युक्रेनमधील उद्योग व ऊर्जाप्रकल्पांना लक्ष्य करणारे हल्लेे चढविले होते.
दरम्यान, रशियाचे युक्रेनवरील हल्ले यापुढेही सुरू राहतील, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघातील रशियाचे राजदूत व्हिसली नेबेन्झिया यांनी दिला आहे. युक्रेनमधील रशियनभाषिकांवर अन्याय होत आहे. 2014 साली बंड करून युक्रेनची सत्ता काबीज करणाऱ्या सरकारने रशियनभाषिकांवर अत्याचाराचे सत्र सुरू केले होते. जोवर या रशियनभाषिकांना वाचविण्याचे उद्दिष्ट साध्य होत नाही, तोपर्यंत रशिया स्वस्थ बसू शकत नाही. हे उद्दिष्ट राजनैतिक वाटाघाटींच्या मार्गाने किंवा युद्ध अशा दोन्ही प्रकारे साध्य करता येऊ शकते. राजनैतिक वाटाघाटींना यश मिळाले तर युक्रेनचे युद्ध थांबेल. पण तसे होण्याची शक्यता नाही, त्यामुळे रशियाचे युक्रेनवरील हल्ले यापुढेही सुरू राहतील, असे राजदूत नेबेन्झिया यांनी ठाणकावले. युक्रेनचे सध्याचे सरकार नाझी जर्मनीचा आदर्श समोर ठेवून रशियनभाषिकांवर अन्याय करीत असल्याचा ठपका रशियन राजदूतांनी ठेवला.
युक्रेनी जनतेशी रशियाचे वैर असू शकत नाही. मात्र 2014 साली उठाव करून युक्रेनची सत्ता काबीज करणाऱ्या पाश्चिमात्यांच्या हस्तकांविरोधात रशियाचा लढा सुरू राहील, असे राजदूत नेबेन्झिया यांनी स्पष्ट केले. याबरोबरच मिन्स्क करार रशियाच्या विरोधात युक्रेनला शस्त्रसज्ज करण्यासाठीच करण्यात आला होता, हे आता उघड झाल्याचे सांगून नेबेन्झिया यांनी अमेरिका व युरोपिय देशांवर सडकून टीका केली. 2015 साली रशिया व युक्रेनमध्ये संघर्षबंदी घडवून आणण्यासाठी मिन्स्क करार करण्यात आला होता. हा करार रशियाच्या विरोधात युक्रेनला शस्त्रसज्ज करण्यासाठी अवधी मिळावा, यासाठीच करण्यात आल्याची कबुली जर्मनीच्या माजी चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी दिली होती. फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा हॉलांदे यांनीदेखील मर्केल यांच्या या दाव्याला दुजोरा दिला होता. यानंतर युक्रेनचे युद्ध अमेरिका व नाटोनेच घडवून आणल्याचे उघड झाले, अशी जळजळीत टीका रशियाने केली होती. त्याचवेळी रशियाच्या विरोधात युक्रेनचा प्याद्यासारखा वापर होत असल्याची बाब मर्केल आणि हॉलांदे यांच्या कबुलीमुळे उघड झाल्याचा ठपकाही रशियाने ठेवला होता.
युक्रेनमध्ये रशिया केवळ युक्रेनी लष्कराशी नाही तर अमेरिका आणि नाटोशी लढत असल्याचे दावे रशियन नेते व राजनैतिक अधिकारी करीत आहेत. त्याचवेळी अमेरिकेने युक्रेनसाठी जाहीर केलेल्या लष्करी सहाय्याकडे बोट दाखवून रशियाने याविरोधात अधिक आक्रमक कारवाया केल्या जातील, असेही बजावले आहे. युक्रेनची राजधानी किव्ह तसेच खार्किव्ह प्रांतावर क्षेपणास्त्रांचे हल्ले चढवून रशिया आपल्या अधिक आक्रमक बनलेल्या डावपेचांची जाणीव युक्रेनला करून देत आहे. त्याचवेळी अमेरिका व नाटोच्या सदस्यदेशांकडून युक्रेनला पुरविल्या जाणाऱ्या शस्त्रसाठ्यालाच लक्ष्य करण्याची तयारी रशियाने केल्याचे संकेत मिळू लागले आहेत.
हिंदीया बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |