अमेरिका तालिबानवर हवाई हल्ले चढवित राहिल – अमेरिकेच्या सेंटकॉमचे प्रमुख जनरल मॅकेन्झी

जनरल मॅकेन्झी

काबुल – ‘गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानातील तालिबानच्या ठिकाणांवरील हवाई हल्ले वाढविले आहेत. तालिबानने आपल्या कारवाया रोखल्या नाही तर अफगाणी लष्कराला सहाय्य करण्यासाठी या हवाई हल्ल्यांमध्ये वाढ केली जाईल’, असा इशारा अमेरिकेच्या सेंटकॉमचे प्रमुख जनरल केनिथ मॅकेन्झी यांनी दिला. मॅकेन्झी यांच्या या विधानांमुळे अमेरिका आणि तालिबानमधला शांतीकरार संपुष्टात आल्याचे उघड होत आहे. अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांचे परिणाम लवकरच समोर येतील, अशी धमकी याआधीच तालिबानने दिली होती.

काही तासांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांच्यात फोनवरुन चर्चा झाली. अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या सैन्यमाघारीसाठी अवघा महिना शिल्लक आहे. त्याआधी अफगाण सरकार व लष्कराने तालिबानचे हल्ले रोखावे, राजधानी काबुल तसेच इतर प्रांतांच्या राजधान्यांची सुरक्षा करावी, अशी सूचना बायडेन यांनी केल्याचा दावा केला जातो. अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी देखील हाच संदेश काही तासांपूर्वी दिला होता.

जनरल मॅकेन्झी

अमेरिकेच्या ‘सेंट्रल कमांड -सेंटकॉम’चे प्रमुख जनरल केनिथ मॅकेन्झी यांनी रविवारी काबुलला भेट देऊन राष्ट्राध्यक्ष गनी यांच्याबरोबर यासंबंधी चर्चा केली. अफगाणी राष्ट्राध्यक्षांबरोबर झालेल्या चर्चेनंतर जनरल मॅकेन्झी यांनी माध्यमांशी बोलताना तालिबानला खरमरीत संदेश दिला. तालिबानने हल्ले रोखले नाही तर अफगाणी लष्कराच्या सहाय्यासाठी अमेरिकेच्या तालिबानवरील हवाई हल्ल्यांमध्ये वाढ होईल, असा इशारा जनरल मॅकेन्झी यांनी दिला. पण 31 ऑगस्टच्या माघारीनंतरही अमेरिकेचे तालिबानवरील हल्ले कायम राहतील का, या प्रश्‍नावर थेट प्रतिक्रिया देण्याचे मॅकेन्झी यांनी टाळले.

जनरल मॅकेन्झी

तर सेंटकॉमच्या प्रमुखांनी राष्ट्राध्यक्ष गनी यांच्या सरकारला तालिबानच्या धोक्याची जाणीव करून दिली. ‘आपण लवकरच अफगाणिस्तानचा ताबा मिळवू, अशी दहशत तालिबान निर्माण करीत आहे. पण लष्करी कारवाईने तालिबान अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवू शकत नाही. राजकीय मार्गानेच हा प्रश्‍न सोडविता येऊ शकतो’, असे जनरल मॅकेन्झी यांनी सुचविले. मात्र तालिबानने वाटाघाटींसाठी राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी पद सोडून द्यावे अशी मागणी करीत आहे. त्यामुळे राजकीय चर्चेची शक्यता सध्या तरी निकालात निघाल्याचे दिसते.

दरम्यान, अमेरिकेने गेल्या आठवड्यात सलग दोन दिवस कंदहार आणि हेल्मंड प्रांतातील तालिबानच्या ठिकाणांवर हवाई हल्ले चढविले होते. या हवाई कारवाईसाठी अमेरिकेने पाकिस्तानच्या हवाईहद्दीचा वापर केल्याचा आरोप काही पत्रकार करीत आहेत. पाकिस्तानने कितीही नाकारले तरी अफगाणिस्तानात तालिबानवरील हल्ल्यांसाठी अमेरिकेला हवाईहद्दीचा वापर करण्यापासून पाकिस्तान रोखू शकत नाही, असे या पाकिस्तानी पत्रकारांचे म्हणणे आहे.

English  English

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info