मॉस्को – रशिया येत्या काही दिवसात युक्रेनमध्ये नवे आक्रमण करण्याच्या तयारीत असल्याचा दावा युक्रेनच्या गुप्तचर यंत्रणा व संरक्षणमंत्र्यांकडून करण्यात आला होता. या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी रशिया व बेलारुसमध्ये संयुक्त हवाई सरावाला सुरुवात झाली. गेल्या दोन महिन्यांमध्ये रशिया व बेलारुसमध्ये संयुक्त सराव आयोजित होण्याची ही तिसरी वेळ ठरली आहे. हा सराव सुरू होत असतानाच रशियाने पोसायडन सुपर टॉर्पेडोसाठी ‘न्यूक्लिअर वॉरहेड’ तयार केल्याचे जाहीर केले आहे. येत्या काही महिन्यात हा ‘न्यूक्लिअर सुपर टॉर्पेडो’ बेलगोरोद या पाणबुडीवर तैनात करण्यात येईल, अशी माहिती ‘तास’ या रशियन वृत्तसंस्थेने दिली.
रशियाने गेल्या काही आठवड्यांमध्ये युक्रेनमधील आपले हल्ले अधिकाधिक प्रखर केले आहेत. युक्रेनमधील विविध शहरांवर सातत्याने क्षेपणास्त्र, ड्रोन्स व रॉकेटस्चे मोठे हल्ले करण्यात येत आहेत. तोफा, रणगाडे, मॉर्टर्स यांचाही वापर होत आहे. या हल्ल्यांमुळे युक्रेनमधील अनेक भाग बेचिराख झाल्याचे दावे युक्रेनच्या यंत्रणांकडून करण्यात आले होते. डोन्बास क्षेत्रासह खार्किव्ह, सुमी तसेच दक्षिण युक्रेनमध्ये खेर्सन, झॅपोरिझिआ, मायकोलेव्ह व ओडेसा या भागांना सातत्याने लक्ष्य करण्यात आले आहे. हे हल्ले सुरू असतानाच युक्रेनमधील रशियाचा ताबा असणाऱ्या क्षेत्रांमध्ये शस्त्रे व मनुष्यबळाची जमवाजमव सुरू आहे. ही तयारी युक्रेनवरील नव्या हल्ल्याची असल्याचे दावे युक्रेनी यंत्रणा व अधिकाऱ्यांनी केले आहेत.
या नव्या आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर, रशियाने बेलारुसमधील लष्करी तैनातीही वाढविली आहे. ही तैनाती रशिया व बेलारुसमध्ये झालेल्या कराराचा भाग असल्याचे सांगण्यात येते. मात्र पाश्चिमात्य आघाडीने रशिया बेलारुसच्या माध्यमातून युक्रेनवर हल्ला चढवू शकतो, असे दावे केले आहेत. सोमवारपासून रशिया व बेलारुसमध्ये सुरू झालेला नवा हवाईसराव या दाव्यांना अधिक बळ देणारा ठरतो. 1 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणाऱ्या या सरावात रशियाच्या प्रगत लढाऊ विमानांसह लष्करी तुकड्याही सहभागी झाल्या आहेत.
‘बेलारुसच्या सीमेवर युक्रेन सातत्याने चिथावणी देण्याचा प्रयत्न करतो आहे. या चिथावणीला प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत’, असे बेलारुसच्या सिक्युरिटी कौन्सिलचे सचिव पावेल मुरावेय्को यांनी बजावले. सरावादरम्यान, रशियाच्या लढाऊ विमानांकडून बेलारुसमधील सर्व लष्करी धावपट्ट्यांचा वापर करण्यात येईल, असे संकेत सूत्रांनी दिले आहेत. गेल्या महिन्यात बेलारुसमध्ये झालेल्या संयुक्त युद्धसरावाला रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी भेट दिली होती. या पार्श्वभूमीवर नवा सरावही लक्ष वेधून घेणारा ठरतो.
दरम्यान, रशियाच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर नाटो सदस्य देशांकडून युक्रेनला मोठ्या प्रमाणात ‘हेवी वेपनरी’ पुरविण्यात येईल, असे नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी जाहीर केले. गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिका, फ्रान्स, जर्मनी तसेच ब्रिटनने युक्रेनला नव्य शस्त्रसहाय्याची घोषणा केली होती. मात्र त्यानंतरही युक्रेनकडून तोफा व रणगाड्यांची मागणी होत असून रशियन हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी या यंत्रणा महत्त्वाच्या असल्याचा दावा युक्रेन करीत आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |