वॉशिंग्टन/किव्ह – रशियाने गेल्या दशकात ताब्यात घेतलेल्या क्रिमिआवर हल्ले चढविण्यासाठी अमेरिका युक्रेनला अतिरिक्त शस्त्रपुरवठा व इतर प्रकारचे सहाय्य करू शकतो, असा दावा आघाडीच्या अमेरिकी दैनिकाने केला आहे. अमेरिकेने गेल्या काही दिवसांमध्ये युक्रेनला मोठ्या प्रमाणावर प्रगत शस्त्रे पुरविण्याबाबत घेतलेला निर्णय या दिशेने टाकलेले पाऊल ठरते, असे ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ या दैनिकाने म्हटले आहे. अमेरिकी दैनिक हा दावा करीत असतानाचा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी डॅव्होसमधील कार्यक्रमात क्रिमिआ पुन्हा ताब्यात घेण्याचा इरादा जाहीर केला.
एकेकाळी रशियन संघराज्याचा भाग असलेला क्रिमिआ हा प्रांत 1954 साली युक्रेनला हस्तांतरित करण्यात आला होता. त्यानंतर 2014 साली रशियाने हल्ला चढवून पुन्हा एकदा क्रिमिआवर ताबा मिळविला होता. मात्र आंतरराष्ट्रीय समुदायाने रशियाचा हा ताबा मान्य करण्यास नकार दिला आहे. गेल्या वर्षी रशिया-युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर युक्रेनने वारंवार क्रिमिआ पुन्हा ताब्यात आल्याशिवाय संघर्ष थांबणार नाही, अशी वक्तव्ये केली होती.
मात्र रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन व इतर आघाडीच्या नेत्यांनी क्रिमिआ हा आता मुद्दाच राहिलेला नाही, असे सांगून युक्रेनसह पाश्चिमात्य देशांची वक्तव्ये फेटाळली होती. गेल्या वर्षी युक्रेनने रशिया व क्रिमिआला जोडणारा ब्रिज तसेच क्रिमिआतील रशियन तळांवर हल्ले केले होते. या हल्ल्यांना रशियाने जोरदार प्रत्युत्तर दिले होते. क्रिमिआ हा राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासाठी संवेदनशील मुद्दा असल्याकडे रशियन विश्लेषकांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे या प्रांतावर हल्ला झाल्यास रशिया सर्वसामर्थ्यानिशी युक्रेनवर तुटून पडेल, असे मानले जाते. मात्र युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की सातत्याने क्रिमिआ हा युक्रेनचाच भाग असून तो ताब्यात घेतल्यावरच युक्रेनचे जवान आपली मोहीम थांबवतील, असे सातत्याने बजावत आहेत.
डॅव्होसमधील बैठकीत केलेल्या वक्तव्यातही क्रिमिआ हा युक्रेनचाच भूभाग असल्याचा दावा त्यांनी केला. पाश्चिमात्य देशांनी आम्हाला शस्त्रास्त्रे पुरवावीत व आम्ही आमचा क्रिमिआ परत मिळवून दाखवू, असा दावा झेलेन्स्की यांनी केला. झेलेन्स्की यांच्या या दाव्यामागे अमेरिकेकडून मिळणारे समर्थन असल्याचे समोर येत आहे.
अमेरिकेच्या बायडेन प्रशासनात क्रिमिआवरील हल्ल्यासाठी युक्रेनला सहाय्य करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आल्याचे अमेरिकी दैनिकाने म्हटले आहे. त्यासाठी युक्रेनला दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे व रॉकेट्सही पुरविण्यात येतील, असे संकेत अमेरिकी सूत्रांकडून देण्यात आले आहेत.
Englishया बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |