Breaking News

इस्रायलच्या अणुप्रकल्पाजवळ सिरियाचा क्षेपणास्त्र हल्ला

जेरूसलेम/दमास्कस – इस्रायलच्या दिमोना अणुप्रकल्पाजवळ गुरुवारी पहाटे क्षेपणास्त्र हल्ला झाला. हा हल्ला सिरियातून चढविण्यात आला होता. यामध्ये अणुप्रकल्पाचे नुकसान झालेले नाही. पण यानंतर इस्रायलने सिरियात हवाई हल्ले चढवून त्याला प्रत्युत्तर दिले. पहिल्यांदाच सिरियाने इस्रायलच्या दक्षिणेकडे हल्ला चढविण्याची क्षमता असलेले लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र वापरले, याकडे इस्रायली लष्करी विश्‍लेषक लक्ष वेधत आहेत. इस्रायलच्या सुरक्षेसाठी ही चिंतेची बाब ठरू शकते, असा इशारा इस्रायली माध्यमे देत आहेत.

Dimona nuclear reactor, अणुप्रकल्पाजवळइस्रायलच्या दक्षिणेकडील नेगेव्ह शहरात दिमोना अणुप्रकल्प आहे. गुरुवारी पहाटे दिमोनापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर असलेल्या अबू क्रिनात भागात क्षेपणास्त्र कोसळले. यामुळे दिमोना अणुप्रकल्पाच्या हद्दीत बसविलेले सायरन वाजू लागले. या क्षेपणास्त्राच्या स्फोटाचे आवाज जेरूसलेमपर्यंत ऐकू गेल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. यानंतर इस्रायलच्या लढाऊ विमानांनी सिरियाची राजधानी दमास्कसजवळच्या भागात जोरदार हल्ले चढविले. यामध्ये आपले चार जवान मारले गेल्याचा आरोप सिरियाची सरकारी वृत्तवाहिनी करीत आहे.

अबू क्रिनात भागात कोसळलेले रशियन बनावटीचे ‘एसए-५’ जमिनीवरुन हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र होते, अशी माहिती इस्रायली लष्कराने दिली. या क्षेपणास्त्राचा वापर हवाई हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी केला जातो. त्यामुळे इस्रायलच्या हवाई हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी सिरियाने प्रक्षेपित केलेले क्षेपणास्त्र थेट दिमोनाजवळ कोसळले. त्यामुळे या हल्ल्याद्वारे इस्रायलच्या दक्षिणेकडील शहरांपर्यंत मारा करणारी क्षेपणास्त्रे आपल्याकडे असल्याचा इशारा सिरिया देत आहे, असा दावा इस्रायली लष्करी विश्‍लेषक करीत आहेत.

दिमोना अणुप्रकल्पाच्या सुरक्षेसाठी त्याचबरोबर प्रमुख शहरे, ठिकाणे आणि लष्करी तळांच्या सुरक्षेसाठी इस्रायलने हवाई सुरक्षा यंत्रणा तैनात केल्या आहेत. दिमानो अणुप्रकल्पाच्या सुरक्षेसाठी देखील इस्रायलने अमेरिकन बनावटीची पॅट्रियॉट हवाई सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

Dimona nuclear reactor, अणुप्रकल्पाजवळ Dimona nuclear reactor, अणुप्रकल्पाजवळ

असे असतानाही, सिरियातून साधारण ३०० किलोमीटर अंतरावरुन प्रक्षेपित केलेले क्षेपणास्त्र दिमोनाजवळ कसे पोहोचले? पॅट्रियॉट यंत्रणा कशी अयशस्वी ठरली? असे प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. इस्रायली लष्कराने याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, इराणच्या नातांझ अणुप्रकल्पात स्फोट घडविणार्‍या इस्रायलला अद्दल घडविण्यासाठी इस्रायलच्या दिमोनावर हल्ला करून जशास तसे प्रत्युत्तर द्या, अशी मागणी इराणच्या वर्तमानपत्राने गेल्या आठवड्यात केली होती. सदर वर्तमानपत्र इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांचे माजी सल्लागार हुसेन शरियतमदारी यांच्या मालकीचे आहे. अवघ्या पाच दिवसात दिमोनाजवळ हा हल्ला झाल्यामुळे यामागे इराण किंवा सिरियातील इराणसंलग्न दहशतवादी संघटना असल्याचा दाट संशय इस्रायली माध्यमे व्यक्त करीत आहेत.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info