चर्चा सुरू असली तरीही युक्रेनवरील लष्करी कारवाई थांबविणार नसल्याचा रशियाचा इशारा

मॉस्को/किव्ह – रशिया आणि युक्रेनचे प्रतिनिधी तुर्कीमध्ये चर्चा करीत आहेत. या चर्चेला यश मिळत असल्याचा दावा माध्यमांनी केला आहे. यामुळे गेल्या ३३ दिवसांपासून सुरू असलेले युक्रेनमधील युद्ध थांबण्याची आशा निर्माण झाली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील इंधनाचे दर प्रति बॅरल शंभर डॉलर्सच्या खाली उतरले होते. मात्र युक्रेनवरील कारवाई थांबणार नाही, अशी घोषणा रशियाने केली आहे. तसेच युक्रेनचे हवाई दल आता शिल्लक राहिलेले नसल्याची घोषणा रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू यांनी केली.

लष्करी कारवाई

मंगळवारी युक्रेनच्या मायकोलेव्ह, खेरसॉन, ओडेसा आणि मारिओपोल शहरावर रशियाने हल्ले चढविले. हे हल्ले म्हणजे ‘ब्लॅक सी’पासून युक्रेनला तोडण्याचा रशियाचा प्रयत्न असल्याचा आरोप होत आहे. याबरोबरच युक्रेनी लष्कराची हवाई सुरक्षा यंत्रणा रशियन लष्कराने उडवून दिल्याचे वृत्त आहे. युक्रेनचे हवाई दल रशियाने उद्ध्वस्त केल्याची घोषणा रशियाच्या संरक्षणमंत्र्यांनी केली आहे. म्हणूनच युक्रेन अमेरिका व नाटोच्या सदस्यदेशांकडून हवाई सुरक्षा यंत्रणा आणि विमानभेदी लॉंचर्सची मागणी करीत असल्याचे सांगितले जाते. रशियाची ही लष्करी कारवाई सुरू असतानाच, तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये रशिया व युक्रेनचे प्रतिनिधी चर्चा करीत आहेत.

या चर्चेकडे जगाचे लक्ष लागले असून माध्यमांनी या चर्चेला यश मिळत असल्याचे दावे केले होते. याचा परिणाम कच्च्या तेलाच्या दरावर झाला व पहिल्यांच हे दर प्रति बॅरल शंभर डॉलर्सच्या खाली आले आहेत. मात्र रशियाने युक्रेनवरील कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे सांगून हे युद्ध अजूनही संपलेले नाही, असा इशारा दिला आहे. आपल्या सार्‍या मागण्या मान्य झाल्याखेरीज रशिया युक्रेनवरील लष्करी कारवाई थांबविणार नाही, असे या देशाने आधीच स्पष्ट केले होते. युक्रेनने नाटोमध्ये सहभागी होऊ नये, ही रशियाची प्रमुख मागणी आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की मान्य करीत असून यामुळे दोन्ही देशांमध्ये समेट होण्याची शक्यता बळावली आहे. मात्र रशिया एकाच वेळी चर्चा व लष्करी हल्ले कायम ठेवून युक्रेनवर एकाच वेळी लष्करी आणि राजनैतिक पातळीवरील दडपण वाढवित असल्याचे दिसते.

म्हणूनच मायकोलेव्ह, खेरसॉन, ओडेसा आणि मारिओपोल या युक्रेनच्या शहरांवर हल्ले चढविणार्‍या रशियाने युक्रेनची राजधानी किव्ह आणि चेर्निव्ह शहराच्या जवळील लष्करी कारवाया कमी करण्याची तयारी केली आहे. रशियाच्या उपसंरक्षणमंत्र्यांनी ही माहिती दिल्याचा दावा केला जातो.

दरम्यान, अमेरिका युक्रेनमधील हे युद्ध अधिकच भडकवित असल्याचा आरोप करणार्‍या रशियाने अमेरिकेवर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या लष्करी मोहिमेत सहभागी झालेल्या ४०० अफगाणी जवानांना युक्रेनमध्ये तैनात करण्याची तयारी अमेरिकेने रशियन वृत्तसंस्थेने म्हटले आहे. सिरिया व इराक या देशांमधील दहशतवाद्यांनाही अमेरिकेने युक्रेनमध्ये लढण्यासाठी धाडल्याचे आरोप काही रशियासमर्थक वृत्तसंस्थांनी केले होते.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info