ब्युनॉस आयर्स/ब्रासिलिया – लॅटिन अमेरिकेतील आघाडीच्या अर्थव्यवस्था म्हणून ओळखण्यात येणाऱ्या ब्राझिल व अर्जेंटिना या दोन देशांनी समान चलनाच्या हालचालींना वेग दिला आहे. रविवारी रात्री ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्व्हा अर्जेंटिनाच्या दौऱ्यावर दाखल झाले आहेत. या दौऱ्यात ते अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष अल्बर्टो फर्नांडेझ यांची भेट घेणार असून यावेळी व्यापारी सहकार्याबरोबरच समान चलनाच्या मुद्यावर चर्चा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. आपल्या अर्जेंटिना दौऱ्यापूर्वी राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्व्हा यांनी अर्जेंटिनाच्या राष्ट्राध्यक्षांसह लिहिलेला एक लेख प्रकाशित करण्यात आला आहे. या लेखात समान चलनाच्या मुद्याचा उल्लेख आहे.
‘दोन देशांमधील आर्थिक व्यवहार व इतर देवाणघेवाण यामध्ये असलेले अडथळे दूर करण्याचा आमचा प्रयत्न राहील. स्थानिक चलनांचा वापरासंदर्भातील नियम अधिक सुटसुटीत करून त्यात सुधारणा केली जाईल. त्याचवेळी दक्षिण अमेरिकेच्या समान चलनासंदर्भातही चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बाह्य घटकांमुळे होणारे नुकसान कमी करणे, व्यवहारांसाठी होणाऱ्या खर्चात कपात आणि आर्थिक व व्यापारी देवाणघेवाण वाढविणे हे समान चलनाचे उद्दिष्ट असेल’, अशी भूमिका दोन्ही राष्ट्राध्यक्षांनी आपल्या लेखात मांडली आहे.
ब्राझिलचे विद्यमान अर्थमंत्री फर्नांडो हदाद व त्यांचे सहकारी असणाऱ्या गॅब्रिएल गॅलिपोलो यांनी २०२२ साली लिहिलेल्या एका लेखात समान चलनाची संकल्पना मांडली होती. राष्ट्राध्यक्ष लुला यांनी आपल्या प्रचारमोहिमेत या लेखाचा व समान चलनाच्या संकल्पनेचा उल्लेखही केला होता. लुला व अर्जेंटिनाच्या राष्ट्राध्यक्षांनी लिहिलेल्या संयुक्त लेखात याचा उल्लेख झाल्याने आता या प्रस्तावाला वेग मिळाल्याचे दिसत आहे.
गेल्या शतकात १९८७ साली ब्राझिल व अर्जेंटिनामध्ये ‘गानुचो’ नावाने समान चलन स्थापन करण्याबाबत ‘प्रोटोकॉल’वर स्वाक्षरी करण्यात आली होती. यात समान चलन स्थापन करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याची गरज असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र त्यानंतर यासंदर्भात विशेष पावले उचलण्यात आली नाहीत. १९९०च्या दशकात समान चलनाचा प्रस्ताव गुंडाळण्यात आला. त्यानंतर १९९४ साली ब्राझिल व अर्जेंटिना याच देशांनी पुढाकार घेऊन ‘मर्कोसूर’ नावाच्या गटाची स्थापना केली. लॅटिन अमेरिकी देशांची सामायिक बाजारपेठ उभारणे हा या गटाच्या स्थापनेचा उद्देश होता. या गटात सध्या ब्राझिल व अर्जेंटिना वगळता उरुग्वे तसेच पॅराग्वे हे स्थायी सदस्य आहेत. त्याव्यतिरिक्त सात सहयोगी सदस्य व दोन निरीक्षक देशांचा समावेश आहे.
गेली काही वर्षे या गटाचेही कार्य थंडावल्याचे मानले जात होते. या पार्श्वभूमीवर ब्राझिल व अर्जेंटिनाने समान चलनाचा प्रस्ताव समोर आणून लक्ष वेधून घेतले आहे. लॅटिन अमेरिकेची अर्थव्यवस्था सहा ट्रिलियन डॉलर्सहून अधिक असून त्यातील ५० टक्के वाटा ब्राझिलचा आहे. तर अर्जेंटिना ही दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. हे दोन्ही देश लॅटिन अमेरिकी देशांची संघटना असणाऱ्या ‘सेलॅक’चेही सदस्य आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |