रशियाचे डोनेत्स्क, मध्य युक्रेन, स्नेक आयलंडवर जोरदार हल्ले

मॉस्को/किव्ह – रशियन फौजांनी पूर्व युक्रेनमधील डोन्बास क्षेत्रासह मध्य युक्रेन तसेच दक्षिण युक्रेनमधील ‘स्नेक आयलंड’वर मोठे हल्ले चढविल्याचे समोर आले. डोन्बास क्षेत्रातील स्लोव्हियान्स्क, क्रॅमाटोर्स्क व बाखमत शहराव तोफा व रॉकेट्सचा जबरदस्त मारा करण्यात आला. रशियन फौजा आपल्या मार्गात येणारी प्रत्येक गोष्ट नष्ट करीत असल्याचा दावा युक्रेनी अधिकाऱ्यांनी केला. दरम्यान, युक्रेनने पुन्हा ताब्यात घेतलेल्या ‘ब्लॅक सी’मधील ‘स्नेक आयलंड’वर रशियाने हवाईहल्ले चढविले आहेत.

काही दिवसांपूर्वी युक्रेनने दक्षिण युक्रेनमधील रशियाच्या ताब्यातील भाग पुन्हा मिळविण्यासाठी कारवाई सुरू केली होती. या कारवाईत रशियाची शस्त्रकोठारे तसेच महत्त्वाचे तळ उडवून दिल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात येतो. रशियाने आपले नुकसान झाल्याची कबुली दिली असली तरी युक्रेनचे दावे फेटाळले आहेत. त्याचवेळी युक्रेनच्या कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी रशियन फौजा आपल्या हल्ल्यांची तीव्रता सातत्याने वाढवित असल्याचे समोर आले.

बुधवारी रशियाने डोन्बास क्षेत्रातील सिवेर्स्क शहरात प्रवेश केल्याचा दावा रशियन संरक्षणदलांकडून करण्यात आला. येत्या काही दिवसात हे शहर ताब्यात घेऊन रशियन लष्कर बाखमत व इतर शहरांमधील युक्रेनचा बचाव तोडण्याचा प्रयत्न करेल, असे सांगण्यात येते. त्यासाठी रशियाने स्लोव्हियान्स्क, क्रॅमाटोर्स्क व बाखमतबरोबरच डोनेत्स्क शहराच्या नजिकही हल्ल्यांना सुरुवात केली. त्याचवेळी ईशान्य युक्रेनमधील खार्किव्हच्या दिशेनेही रशियाकडून करण्यात येणाऱ्या माऱ्याची तीव्रता वाढली आहे.

डोन्बासबरोबरच दक्षिण व मध्य युक्रेनमध्येही रशियाकडून मोठे हल्ले चढविण्यात आले. ब्लॅक सीमधील मोक्याची जागा असणाऱ्या ‘स्नेक आयलंड’वर रशियाच्या लढाऊ विमानांनी हल्ले केले आहेत. तर मध्य युक्रेनमधील विनिस्तिआ शहरावर कॅलिबर क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. या हल्ल्यात अनेकांचा बळी गेल्याची माहिती युक्रेनी यंत्रणांनी दिली. दक्षिण युक्रेनमधील मायकोलेव्हवरही क्षेपणास्त्र तसेच रॉकेट हल्ले झाल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, युक्रेनमध्ये अडकलेल्या दोन कोटी टन इतक्या अन्नधान्याच्या निर्यातीचा मार्ग मोकळा होण्याचे संकेत मिळाले आहेत. बुधवारी तुर्कीत झालेल्या बैठकीत रशिया, युक्रेन व तुर्की यांचे ‘जॉईंट कोऑर्डिनेशन सेंटर’ उभारण्यावर तिन्ही देशांमध्ये एकमत झाले. यापूर्वी युक्रेनच्या कोठारांमधील अन्नधान्य रशिया एकतर्फी निर्यात करीत असल्याचे आरोप युक्रेनकडून करण्यात आले होते.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info