बायडेन प्रशासन भडकवित असलेले युक्रेनचे युद्ध म्हणजे फार मोठा घोटाळा व ‘मनी लाँड्रिंग’चे कारस्थान

- अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या सल्लागारांचा गंभीर आरोप

वॉशिंग्टन – युक्रेनच्या युद्धाला एक वर्ष पूर्ण होत असताना, हे युद्ध रोखण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी ते अधिकाधिक भडकवण्याचा प्रयत्न राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचे प्रशासन करीत असल्याचा आरोप अमेरिकेत सुरू झाला आहे. बायडेन प्रशासनाने उत्तेजन देऊन भडकवलेल्या या युद्धात युक्रेनला आपली मोठी जनसंख्या गमवावी लागेल, असा इशारा माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या सल्लागारांनी दिला आहे. त्याचवेळी युक्रेनचे हे युद्ध म्हणजे फार मोठा घोटाळा असून त्यामागे ‘मनी लाँड्रिंग’ अर्थात निधीच्या अवैध हस्तांतरणाचे कारस्थान असल्याचा ठपका देखील माजी राष्ट्राध्यक्षांच्या सल्लागारांनी ठेवला आहे. तर अमेरिकेतील काही सामरिक विश्लेषकांनी युक्रेनच्या युद्धामुळे रशिया व चीन हे अमेरिकेचे प्रबळ शत्रू एकमेकांच्या अधिकच जवळ आल्याची बाब लक्षात आणून दिली. यामुळे अमेरिकेला असलेला धोका प्रचंड प्रमाणात वाढल्याचे या सामरिक विश्लेषकांचे म्हणणे आहे.

मोठा घोटाळा

युक्रेनच्या युद्धात ‘मिलिटरी कॅज्युअलिटीज्‌‍’ अर्थात ठार झालेल्या व गंभीर जखमी झालेल्या जवानांची संख्या चार लाखांवर आहे. यातले दीड लाखाहून अधिक जवान ठार झालेले आहेत. चार कोटी इतकी जनसंख्या असलेल्या युक्रेनमध्ये ८० लाख ते एक कोटी निर्वासित भरलेले आहेत. तर ४० ते ५० लाख युक्रेनी रशियाने ताबा घेतल्या भूभागात राहतात. इतर युरोपिय देशांमध्ये कामासाठी वास्तव्य करणाऱ्या युक्रेनींची संख्या २० लाखांच्या आसपास आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने युक्रेनवासियांची संख्या दोन कोटींच्या आसपास आहे. अशा देशाला युद्धात ‘मिलिटरी कॅज्युअलिटीज्‌‍’ची हानी सोसावी लागत आहे, ही अत्यंत भयंकर बाब ठरते. रशियाबरोबरचे हे युद्ध अशारितीने चालू राहिले, तर युक्रेनला आपली फार मोठी जनसंख्या यात गमवावी लागेल, असा इशारा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे सल्लागार व अमेरिकी लष्कराचे माजी कर्नल डग्लस मॅक्‌‍ग्रेगर यांनी दिला.

हे सारे दिसत असताना देखील अमेरिकेचे बायडेन प्रशासन युक्रेनला अत्याधुनिक रणगाडे पुरवून रशियाविरोधी युद्धासाठी चिथावणी देत आहे. कारण हे युद्ध म्हणजे फार मोठा घोटाळा असून यात मनी लाँड्रिंग अर्थात निधीचे बेकायदेशीर हस्तांतरण केले जात आहे. युक्रेनला आत्तापर्यंत अमेरिकेने जाहीर केलेल्या अब्जावधी डॉलर्सच्या सहाय्याचा दाखला देऊन मॅक्‌‍ग्रेगर यांनी या युद्धात युक्रेनचा पराभव झाल्यानंतर, हे सहाय्य कुठे व कसे खर्च झाले, याचा कुणीही हिशेब मागणार नाही, याकडे लक्ष वेधले.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मॅक्‌‍ग्रेगर यांनी केलेले हे गंभीर आरोप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे सांगितले जाते. तर फॉक्स न्यूज या अमेरिकी वृत्तवाहिनीवर बोलताना पत्रकार ट्रकर कार्लस्‌‍न यांनी युक्रेनचे युद्ध भडकावून बायडेन प्रशासनाने नक्की काय साधले, असा प्रश्न विचारला आहे. शीतयुद्ध संपल्यानंतर रशियाबरोबर अमेरिकेने वैर पत्करण्याचे कारणच काय? असा सवाल कार्लस्‌‍न यांनी केला. या युद्धात युक्रेनला प्रचंड प्रमाणात सहाय्य पुरवून अमेरिकेने रशियाला आपला अधिक कट्टर शत्रू बनविले आहेच. पण यामुळे रशियाला चीनसारख्या प्रबळ देशाबरोबर अधिक घनिष्ठ सहकार्य करण्यास अमेरिकेने भाग पाडले आहे. रशिया व चीनसारखे प्रबळ देश एकत्र आल्यानंतर ते अमेरिकेसमोर फार मोठे आव्हान उभे करू शकतात. युक्रेनचे युद्ध भडकवून राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अमेरिकेसमोरील हा धोका अधिकच वाढविला आहे, याची जाणीव कार्लस्‌‍न यांनी करून दिली.

आधीचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी यावरून अमेरिकेला वारंवार इशारा दिला होता. पण ते रशियाधार्जिणे असल्याचे आरोप करून अमेरिकी माध्यमे त्याकडे दुर्लक्ष करीत राहिली. पण आता अमेरिकेला रशिया व चीनच्या एकीमुळे निर्माण झालेला धोका दुर्लक्षित करण्याजोगा राहिलेला नाही, असा इशारा कार्लस्‌‍न यांनी दिला. युक्रेनच्या युद्धाला वर्ष पूर्ण होत असतानाच, अमेरिकेत बायडेन प्रशासनाच्या भूमिकेवर अशा स्वरुपाचे प्रश्न विचारले जात असून अमेरिकेच्या सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचे बहुमत आलेले आहे. अशा परिस्थितीत बायडेन प्रशासनाला युक्रेनच्या युद्धासाठी पुढच्या काळात अब्जावधी डॉलर्सचे सहाय्य पुरविणे अवघड बनत जाईल, याचीही नोंद माध्यमे करीत आहेत. म्हणूनच बायडेन प्रशासनाने युक्रेनला रशियाविरोधात जोरदार मुसंडी मारण्यासाठी तुमच्याकडे अवघे काही महिनेच शिल्लक राहिलेले आहेत, असे बजावले होते. या ‘काही महिन्यांमध्ये’ रशियाची शक्य तितकी हानी करण्याचे काम युक्रेनने करावे, अशी बायडेन प्रशासनाची अपेक्षा असल्याचे संकेत या बातमीतून मिळाले होते.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info