बाखमतच्या पूर्व भागावर वॅग्नर ग्रुपने ताबा मिळविल्याचा दावा

मॉस्को/किव्ह – डोन्बास क्षेत्रातील बाखमत शहराच्या पूर्व भागावर रशियाच्या ‘वॅग्नर ग्रुप’ या खाजगी लष्करी कंपनीने ताबा मिळविला आहे. ‘वॅग्नर ग्रुप’चे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांनी यासंदर्भात दावा करतानाच ही आघाडी आम्ही जिंकून दाखवू, असेही बजावले. रशियाच्या या वक्तव्यांवर युक्रेनकडून प्रतिक्रिया उमटली. रशियाने बाखमतवर ताबा मिळविल्यास रशियन लष्करासाठी पूर्व युक्रेनचे मार्ग खुले होतील, अशी भीती राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी व्यक्त केली. रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू यांनीही बाखमतवरील ताब्यामुळे रशियन फौजांना युक्रेनमध्ये आगेकूच करणे शक्य होईल, असा दावा नुकताच केला होता.

वॅग्नर

मीठ व जिप्समच्या खाणींसाठी प्रसिद्ध असलेले बाखमत हे सामरिकदृष्ट्या अत्यंत मोक्याच्या जागी वसलेले शहर म्हणून ओळखण्यात येते. पूर्व युक्रेनमधील अनेक शहरांना जोडणारे मार्ग बाखमतमधून जातात. त्यामुळे बाखमत रशियाच्या हाती पडल्यास पूर्व युक्रेनमधील या शहरांवर हल्ले करणे रशियासाठी काही प्रमाणात सोपे ठरु शकते. बाखमतवर ताबा मिळाल्यानंतर रशिया चॅसिव यार, स्लोव्हिआन्स्क व क्रॅमाटोर्स्क या शहरांवर हल्ले चढवू शकतो. परिणामी युक्रेनला डोनेत्स्क प्रांतासह डोन्बास क्षेत्रावरील नियंत्रण गमवावे लागू शकते, असे सांगण्यात येते. त्यामुळे रशिया व युक्रेन या दोन्ही बाजूंनी बाखमतची लढाई अत्यंत प्रतिष्ठेची बनविल्याचे दिसत आहे.

वॅग्नर

यापूर्वी गेल्या ऑगस्टमध्ये रशियन फौजांनी बाखमतवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यात यश आले नव्हते. पण गेल्या दोन महिन्यात रशियाने बाखमतला प्राधान्य देत शहरातील बहुतांश भाग ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे. ‘वॅग्नर ग्रुप’कडून याबाबत करण्यात आलेला दावा लक्ष वेधून घेणारा ठरतो. ‘वॅग्नर ग्रुप’चे प्रमुख प्रिगोझिन यांनी ऑडिओ तसेच व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून पूर्व बाखमत आपल्या ताब्यात असल्याचे ठामपणे सांगितले. त्याचबरोबर येत्या काही काळात ‘वॅग्नर ग्रुप’ पूर्ण बाखमत ताब्यात घेईल, असेही बजावले.

वॅग्नर

प्रिगोझिन यांच्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनीही एका मुलाखतीत बाखमत सोडणार नसल्याचे म्हटले आहे. युक्रेनच्या रणनीतिक डावपेचांच्या दृष्टिने बाखमत महत्त्वाचे असल्याचे झेलेन्स्की यांनी सांगितले. बाखमतनंतर रशियन फौजा पूर्व युक्रेनमध्ये अधिक मुसंडी मारु शकतात व त्यामुळेच आमचे जवान आज बाखमतमध्ये ठाण मांडून आहेत, याकडे झेलेन्स्की यांनी लक्ष वेधले.

मात्र पाश्चिमात्य विश्लेषकांनी युक्रेनकडून बाखमतच्या लढाईवर दिला जाणारा भर अनाठायी असल्याचा दावा केला. युक्रेनने आपल्या फौजा व लष्करी स्रोत पुढील हल्ल्यांसाठी वाचवायला हवेत, याची जाणीव अमेरिकी विश्लेषक मायकल कॉफमन यांनी करून दिली. नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनीही येत्या काही दिवसात बाखमत रशियन फौजांच्या हाती पडू शकते, असे म्हटले आहे. मात्र हा काही युद्धातील निर्णायक क्षण ठरणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info