मॉस्को/किव्ह – सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या बाखमत शहरात यश मिळत असतानाच रशियाने पूर्व व दक्षिण युक्रेनमधील विविध आघाड्यांवर प्रखर हल्ले चढविले आहेत. गेल्या दोन दिवसांमध्ये रशियन फौजांनी कुपिआन्स्क, क्रास्नि लिमन, उगलेदर व खेर्सनमध्ये जबर हल्ले केले असून त्यात युक्रेनचे जवळपास ५०० जवान ठार झाले आहेत. रशियाच्या संरक्षण विभागाने ही माहिती दिली.
शनिवारी रशियाच्या ‘सदर्न ग्रुप ऑफ फोर्सेस’ने डोनेत्स्क प्रांतात मोठी कारवाई केली. हवाईहल्ल्यांसह तोफा, रणगाडे व रॉकेटस्चा वापर करीत झालेल्या या कारवाईत युक्रेनच्या २००हून अधिक जवानांचा बळी गेल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली. क्रास्नि लिमन शहरावर केलेल्या स्वतंत्र हल्ल्यांमध्ये जवळपास १०० युक्रेनी जवान ठार झाले. त्यापूर्वी शुक्रवारी डोनेत्स्क प्रांताच्या दक्षिण भागात केलेल्या हल्ल्यांमध्ये युक्रेनचे ५० जवान मारले गेल्याचे संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
लुहान्स्क प्रांतातील कुपिआन्स्कमध्ये रशिया व युक्रेनच्या लष्करात तीव्र संघर्ष सुरू आहे. गेल्या ४८ तासांमध्ये रशियाने युक्रेनी लष्कराचे अनेक हल्ले उधळले आहेत. या लढाईत युक्रेनचे सुमारे ८० जवान ठार झाल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली. तर दक्षिणन युक्रेनमधील खेर्सन भागातही रशियाचे हल्ले सुरू असून जवळपास ४० युक्रेनी जवानांचा बळी गेल्याचे रशियन वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
रविवारी सकाळी रशियाने बाखमतनजिकच्या भागात रणगाडे व तोफांच्या सहाय्याने जबरदस्त मारा केला. या माऱ्यात मोठी जीवितहानी झाल्याचे युक्र्रेनकडून सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वीच युक्रेनच्या लष्कराने रशियाला बाखमतमध्ये यश मिळत असल्याची कबुली दिली होती. गेल्या आठवड्यात रशियन फौजांनी बाखमतजवळ असणाऱ्या स्लोव्हिआन्स्क तसेच ॲव्हडिव्हका शहरांवर मोठे हल्ले केले होते. ॲव्हडिव्हकामधील हल्ल्यांनंतर शहरातील नागरिकांना बाहेर पडण्याचे आदेश देण्यात आले होते. युक्रेनच्या काही अधिकाऱ्यांनी ॲव्हडिव्हका हे दुसरे बाखमत ठरेल, असेही बजावले होते.
तर बाखमत ताब्यात आल्यावर रशिया स्लोव्हिआन्स्कवर मोठा हल्ला चढवेल, असे सांगण्यात येते. पूर्व युक्रेनमधील डोन्बास क्षेत्रावर पूर्ण नियंत्रण मिळविण्यासाठी स्लोव्हिआन्स्कवरील ताबा महत्त्वाचा मानला जातो.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
![]() |
https://twitter.com/WW3Info |
![]() |
https://www.facebook.com/WW3Info |