वॉशिंग्टन/मॉस्को – युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षात रशिया जिंकते आहे आणि रशियाला सत्य परिस्थितीची जाणीव आहे, असा दावा अमेरिकेचे माजी लष्करी अधिकारी कर्नल डग्लस मॅकग्रेगर यांनी केला. त्याचवेळी युक्रेन रशियाविरोधात प्रतिहल्ले चढविण्याच्या स्थितीत नसून त्यांच्याकडे मनुष्यबळ व स्रोतांचा अभाव आहे, याकडेही मॅकग्रेगर यांनी लक्ष वेधले. गेल्या शतकातील आखाती युद्ध तसेच नाटोच्या युरोपातील मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेले अधिकारी म्हणून मॅकग्रेगर ओळखण्यात येतात. त्यांनी ट्रम्प प्रशासनात सुरक्षा सल्लागार म्हणूनही काम केले होते.
गेल्या काही दिवसात रशियाने युक्रेनमधील हल्ल्यांची तीव्रता वाढविली आहे. डोन्बासमधील महत्त्वाचे शहर असलेल्या बाखमतचा जवळपास ९० टक्के भाग रशियन फौजांनी ताब्यात घेतला आहे. उत्तर युक्रेनमधील खार्किव्हपासून ते दक्षिणेतील खेर्सनपर्यंत विविध भागातील युक्रेनच्या जागांवर सातत्याने मारा सुरू आहे. रशियाकडून सुरू असलेल्या या आक्रमक हल्ल्यांमुळे युक्रेनकडून आखण्यात आलेली प्रतिहल्ल्यांची मोहीम सातत्याने लांबणीवर पडत असल्याचे दिसत आहे. युक्रेनच्या काही अधिकाऱ्यांकडून या महिन्याच्या अखेरीस प्रतिहल्ले सुरू होतील, असे दावे करण्यात आले आहेत. मात्र त्यावर पाश्चिमात्य यंत्रणा तसेच अधिकाऱ्यांचा विश्वास नसल्याची माहिती समोर येते.
या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील माजी लष्करी अधिकाऱ्यांनी रशियाला यश मिळत असल्याचा दावा करणे लक्ष वेधून घेणारे ठरते. युट्यूबवरील एका कार्यक्रमात मॅकग्रेगर यांनी रशिया-युक्रेन युद्धाबाबत वक्तव्ये केली. युक्रेनची स्थिती अतिशय दयनीय असून अमेरिकाच त्यांना प्रतिहल्ल्यांसाठी पुढे ढकलत असल्याचा दावा माजी लष्करी अधिकाऱ्यांनी केला. युद्धस्थितीत मोठे बदल घडविण्यासाठी युक्रेनकडे पुरेसे मनुष्यबळ तसेच शस्त्रसामुग्री नसल्याचेही मॅकग्रेगर म्हणाले. रशियन फौजा मे व जून महिन्यात नवे हल्ले करण्याची शक्यता आहे. युक्रेनी फौजांनी माघार घेऊन आहे त्या भागाचा बचाव करण्याची तयारी करावी, असेही माजी लष्करी अधिकारी कर्नल डग्लस मॅकग्रेगर यांनी बजावले. अमेरिकेच्या संरक्षण विभागात झालेल्या लीकचा रशिया-युक्रेन युद्धावर फारसा प्रभाव पडणार नसल्याचेही माजी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अमेरिकेची ‘पॅट्रियॉट मिसाईल सिस्टिम’ युक्रेनमध्ये दाखल झाली आहे. युक्रेनचे संरक्षणमंत्री ओलेक्सी रेझ्निकोव्ह यांनी ही माहिती दिली. अमेरिकेने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात युक्रेनला पॅट्रियॉट क्षेपणास्त्र यंत्रणा देण्याचे मान्य केले होते. त्यानंतर जर्मनीच्या मार्फत ही यंत्रणा युक्रेनमध्ये दाखल झाली असून जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी त्याला दुजोरा दिला आहे. पॅट्रियॉट ही प्रभावी क्षेपणास्त्र यंत्रणा असली तरी रशियाविरोधातील युद्धात ‘गेमचेंजर’ ठरण्याची शक्यता नाही, असा दावा विश्लेषकांनी केला आहे.
युक्रेनने रशियाच्या बेलगोरोद प्रांतात केलेल्या हल्ल्याने अमेरिकी बनावटीच्या ‘स्विचब्लेड’ या आत्मघाती ड्रोनचा वापर केल्याचे वृत्त रशियन माध्यमांनी दिले आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |