मॉस्को/वॉशिंग्टन – अमेरिका आपल्या लष्करी उपक्रमांच्या माध्यमातून गोपनीय जैविक संशोधन करीत असून त्याचा वापर रशियासह इतर देशांविरोधात जैविक युद्ध छेडण्यासाठी होऊ शकतो, असा दावा रशियाच्या सिक्युरिटी कौन्सिलचे सचिव निकोलाय पत्रुशेव्ह यांनी केला. अवघ्या २४ तासांपूर्वीच जागतिक आरोग्य संघटनेने सुदानमधील जैविक प्रयोगशाळा बंडखोरांच्या ताब्यात गेल्याचा दावा करून जैविक संकटाचा धोका असल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर पत्रुशेव्ह यांनी अमेरिकेचा उल्लेख करून जैविक युद्धाचा इशारा दिल्याने ही बाब लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.
पत्रुशेव्ह यांनी अमेरिकेकडून सुरू असलेल्या जैविक संशोधनाचा उल्लेख करतानाच संशोधक व वैज्ञानिकांनी याकडे बारकाईने लक्ष द्यायला हवे, असे आवाहनही केले. रशियासह इतर कोणत्याही देशाविरोधात जैविक युद्ध छेडण्यापासून रोखायला हवे व त्यासाठी जोरदार प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही पत्रुशेव्ह यांनी बजावले. यावेळी त्यांनी माहिती तंत्रज्ञान, क्वांटम टेक्नॉलॉजी व एआयमधील प्रगतीचा उल्लेख करून यातील संशोधन जगातील सत्तासमतोलावर परिणाम घडविणारे ठरु शकते, असा दावाही केला.
युक्रेनवर हल्ला केल्यानंतर काही दिवसांनी रशियाने युक्रेनमधील अमेरिकी बायोलॅब्सचा मुद्दा उपस्थित केला होता. अमेरिकेच्या संरक्षण विभागाकडून युक्रेनमध्ये २६ जैविक प्रयोगशाळा चालविण्यात येतात. यावर अमेरिकेचे थेट नियंत्रण असून कोरोनासह इतर अनेक घातक विषाणूंवर यात प्रयोग सुरू असल्याचे आरोप रशियाने केले होते. युक्रेनमधील जवान तसेच सामान्य नागरिकांवर विषाणूंचे प्रयोग करण्यात येत असल्याचे रशियाने म्हटले आहे.
या प्रयोगशाळांशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेन यांचा संबंध असल्याचा दावाही रशियाने केला होता. युक्रेनच्या संसद सदस्यांनी अमेरिकी प्रयोगशाळांवर आक्षेप घेतल्याचेही रशियाने निदर्शनास आणून दिले होते. यासंदर्भातील माहिती तसेच पुरावे आंतरराष्ट्रीय यंत्रणांसमोर तसेच विविध बैठकांमध्ये सादरही करण्यात आले होते.
काही दिवसांपूर्वीच रशियन संसदेच्या अहवालात, अमेरिकेकडून ‘युनिव्हर्सल जेनेटिकली इंजिनिअर्ड बायोवेपन’ विकसित करण्यात येत असल्याचा इशारा देण्यात आला होता. हे शस्त्र केवळ मानवजातच नाही तर प्राणी व पिकांवरही घातक परिणाम करणारे असेल, असे रशियन संसदेच्या अहवालात बजावण्यात आले होते. अमेरिकेकडून युक्रेनमध्ये चालविण्यात येणाऱ्या जैविक प्रयोगशाळा व त्यातील प्रयोगांचा तपास केल्यानंतर ही माहिती समोर आल्याचे रशियाच्या संसदीय समितीने म्हटले होते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |