Breaking News

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचा चीनमधल्या अमेरिकन नागरिकांसाठी ‘सॉनिक’ इशारा

वॉशिंग्टन – पॅसिफिक महासागरापासून ते व्यापारापर्यंतच्या क्षेत्रात अमेरिका आणि चीन एकमेकांच्या विरोधात खडे ठाकले आहेत. या दोन महासत्तांमध्ये विविध पातळ्यांवर संघर्ष पेट घेण्याच्या बेतात असतानाच, अमेरिकेतून आलेल्या एका बातमीने जगभरातील विश्‍लेषकांचे लक्ष वेधून घेतले. चीनमधल्या आपल्या नागरिकांना अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने ‘आरोग्यविषयक इशारा’ दिला आहे. चीनमध्ये तुमच्यावर ‘सॉनिक’ हल्ले होऊ शकतात, असा ‘संदेश’ अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने वेगळ्या शब्दात अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या नागरिकांना दिला आहे.

‘सॉनिक’चीनच्या ‘गुआंगझोउ’ या शहरात अमेरिकेच्या एका राजनैतिक अधिकार्‍याला अत्यंत वेगळा अनुभव आला. यावर्षाच्या एप्रिल महिन्यापर्यंत या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेल्या अमेरिकेच्या या अधिकार्‍याला ‘माईल्ड ट्रमॅटिक ब्रेन इंजरी’ (एमटीबीआय) झाल्याची माहिती समोर येत आहे. सदर अधिकार्‍याच्या मेंदूला झालेली ही इजा कुठल्या शस्त्राने नाही तर, अत्यंत तीव्र अशा ध्वनीलहरींमुळे झाल्याचे सांगितले जाते. यानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनमधील आपल्या सर्वच नागरिकांसाठी ‘हेल्थ अलर्ट’ जारी करून सावधानतेचा इशारा दिला आहे. ‘चीनमध्ये वावरताना एखाद्या ठिकाणी तुमच्यापर्यंत तीक्ष्ण ध्वनीलहरी पोहोचल्या आणि त्यामुळे तुमच्या शरीरावर विपरित परिणाम होऊ लागले, तर तत्काळ अशा ठिकाणापासून दूर जा’, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या नागरिकांना बजावले आहे.

याबाबतची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर माध्यमांनी २०१६ साली क्युबामध्ये अमेरिकेच्या राजनैतिक अधिकार्‍यांना अशाच स्वरुपाचा त्रास झाला होता, याची आठवण करून दिली. क्युबाची राजधानी हवाना येथे नियुक्त करण्यात आलेल्या अमेरिकेच्या राजनैतिक अधिकार्‍यांना व कर्मचार्‍यांना बधिरपणा, दृष्टी अंधूक होणे, भोवळ, डोकेदुखी आणि थकव्याचा त्रास जाणवला होता. हा सारा प्रकार ‘सॉनिक’ शस्त्रांचा अर्थात तीव्र ध्वनीलहरींचा वापर असलेल्या शस्त्रांमुळे झाल्याचे दावे केले जातात. याची गंभीर दखल घेऊन अमेरिकेने हवानामधील दूतावासातील आपल्या बर्‍याचशा अधिकारी व कर्मचार्‍यांना मायदेशी बोलावले होते.

चीनमध्ये अमेरिकेच्या राजनैतिक अधिकार्‍यांवरही ‘सॉनिक’ शस्त्राचा प्रयोग झाला का? असा प्रश्‍न माध्यमांकडून उपस्थित केला जात आहे. त्याचवेळी अमेरिका व चीनमध्ये सध्या पेटलेल्या संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर ही बातमी अधिकच महत्त्वाची ठरत असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमसृष्टीकडून केला जात आहे. खरोखरच हा सॉनिक शस्त्रांचा हल्ला आहे की हे अमेरिकेचे चीनच्या विरोधातील मानसिक दबावतंत्राचे युद्ध आहे, असे प्रश्‍न काही वृत्तसंस्थांनी विचारले आहेत.

अधिकृत पातळीवर याबाबत अमेरिकेने खुलासा केलेला नसला तरी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या नागरिकांसाठी याबाबत जारी केलेली सूचना बरेच काही स्पष्ट करणारी असल्याचे दिसते.

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info

 

English