Breaking News

चीनकडून इस्लामधर्मियांवर अत्याचार होत असताना पाकिस्तान-तुर्की-इराण चीनच्या विरोधात का बोलत नाही? अमेरिकेच्या नेत्यांचा सवाल

वॉशिंग्टन – चीन उघूरवंशिय इस्लामधर्मियांवर अनन्वित अत्याचार करीत आहे. पण पाकिस्तान, तुर्की व आखाती देश त्याविरोधात चकार शब्दही उच्चारित नाहीत, असे सांगून अमेरिकन कॉंग्रेसचे सदस्य ब्राड शेर्मन यांनी या देशांवर सडकून टीका केली. त्याचवेळी पाकिस्तान उघूरवंशियांचे तोंड बंद करण्यासाठी चीनला सहाय्य करीत असल्याचा आरोप शेर्मन यांनी केला. याआधी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी उघूरवंशिय इस्लामधर्मियांवर चीनकडून केल्या जाणार्‍या अन्यायाच्या विरोधात इराण का बोलत नाही? असा प्रश्‍न केला होता.

 गेल्या काही महिन्यांपासून चीनमधील उघूरवंशिय इस्लामधर्मियांचे अस्तित्वच धोक्यात आल्याच्या बातम्या येत आहेत. चीनमधील कम्युनिस्ट राजवटीने या अल्पसंख्यांक समुदायाच्या विरोधात कठोर भूमिका स्वीकारली असून या समुदायाला मूलभूत अधिकार नाकारण्यात आले आहेत. आपल्या धर्मानुसार उपासना व प्रार्थना करण्याचीही मुभा उघूरवंशियांना मिळत नाही. उघूरवंशिय इस्लामधर्मियांच्या प्रार्थनास्थळांनाही चीनकडून लक्ष्य केले जात आहे. तसेच या अल्पसंख्यांक समुदायातील मुलांना त्यांच्या धर्माचे शिक्षण मिळू नये, यासाठी चीन विशेष प्रयत्न करीत असून यासाठी चीनने कडक निर्बंध लादले आहेत.

असेच सुरू राहिले तर राजवट उघूरवंशियांची धार्मिक ओळख संपुष्टात आणण्यात चीन यशस्वी ठरेल, अशी चिंता उघूरवंशियांकडून केली जाते. म्हणूनच आंतरराष्ट्रीय समुदायाने आमचा सांस्कृतिक व धार्मिक पातळीवर होत असलेला संहार रोखावा, अशी कळकळीची विनंती उघूरवंशियांकडून सातत्याने करण्यात येत आहे. मात्र चीनची राजवट हे आरोप पूर्णपणे नाकारत असून याबाबत घेतले जाणारे आक्षेप निराधार असल्याचे चीनचे म्हणणे आहे. मात्र अमेरिकी माध्यमांनी हा प्रश्‍न उचलून धरला असून ट्रम्प प्रशासनाने उघूरवंशियांवर अन्याय करणार्‍या चीनच्या विरोधात ठाम भूमिका घेतली आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी या प्रश्‍नावर इराणला धारेवर धरले होते.

‘इस्लामधर्मिय असलेल्या उघूरवंशियांवर चीन इतके अत्याचार करीत असताना, इराण त्यावर काहीही बोलत नाही. ही एकच बाब इराणचा दुटप्पीपणा उघड करण्यासाठी पुरेशी ठरावी. चीनबरोबरील इंधनव्यापारावर परिणाम होईल, या भीतीने इराण चीनला दुखावण्याचे टाळत आहे’, असे परराष्ट्रमंंत्री पॉम्पिओ म्हणाले होते. तर अमेरिकन कॉंग्रेसच्या सुनावणीत बोलताना कॉंग्रेसमन ब्राड शेर्मन यांनी या प्रश्‍नावर पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. चीनकडून मिळणार्‍या लाभांचा विचार करून पाकिस्तान इस्लामधर्मियांवर चीनमध्ये होत असलेल्या अत्याचारांविरोधात भूमिका घेत नाही, असा दावा शेर्मन यांनी केला. तसेच तुर्की व आखाती देशदेखील या प्रश्‍नावर चीनला दुखावण्यास तयार नसल्याचा ठपका शेर्मन यांनी ठेवला आहे.

English हिंदी

 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info