Breaking News

खशोगी यांच्या हत्येनंतरही अमेरिकेने सौदीच्या प्रिन्स मोहम्मद यांना साथ द्यावी – इस्रायली पंतप्रधानांचे अमेरिकेला आवाहन

वॉशिंग्टन/जेरूसलेम – ‘‘तुर्कीच्या इस्तंबूलमधील सौदी अरेबियाच्या दूतावासात पत्रकार जमाल खशोगीची झालेली हत्या थरकाप उडविणारी आहे. पण यामुळे अमेरिकेने सौदी अरेबिया व सौदीचे ‘क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान’ यांची साथ सोडू नये’’, असे सांगून इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी अमेरिकेला सौदीबाबत कठोर भूमिका न घेण्याचे आवाहन केले. त्यापेक्षा इराणचे आव्हान सर्वात मोठे असल्याची आठवण पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी केली. इस्रायलच्या पाठोपाठ इजिप्तनेही अमेरिकेला सौदीबरोबरील धोरणात्मक सहकार्य कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे.

इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू सध्या युरोपिय देशांच्या दौर्‍यावर आहेत. अमेरिकेतील आघाडीच्या वृत्तपत्राने त्यांच्या या दौर्‍याबाबत बातमी प्रसिद्ध केली. यामध्ये इस्रायली पंतप्रधानांनी बल्गेरिया, रोमानिया, सर्बिया आणि ग्रीस या देशांच्या नेत्यांना संबोधित करताना सौदीचे पत्रकार खशोगी यांच्या हत्येवर पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ‘खशोगी यांच्या हत्येची सविस्तर चौकशी झालीच पाहिजे. त्याचबरोबर आखात आणि जगातील स्थैर्य कायम राखायचे असेल तर सौदी अरेबियातील राजवटीला अस्थिर करून चालणार नाही. सौदी अस्थिर बनला तर काय होईल, याचा विचार केलेला बरा’, अशा नेमक्या शब्दात इस्रायली पंतप्रधानांनी सौदीच्या क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांची पाठराखण करण्याचे आवाहन केले. अमेरिकेच्या वर्तमानपत्राने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले.

खशोगी यांची हत्या महत्त्वाची आहेच, पण इराण ही त्याहून कितीतरी मोठे आव्हान आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे नेत्यान्याहू म्हणाले. युरोपिय देशांमध्ये इराणच्या सुरू असलेल्या कुरापतींकडे पाश्‍चिमात्य देशांनी अधिक लक्ष द्यावे, असे सांगून नेत्यान्याहू यांनी डेन्मार्क, नॉर्वे तसेच याआधी फ्रान्स, जर्मनी आणि बेल्जिअममधील इराणने आखलेल्या घातपाती हल्ल्याच्या कटाकडे लक्ष वेधले. इस्रायली गुप्तचर यंत्रणेच्या माहितीमुळे फ्रान्स आणि डेन्मार्कमधील कट वेळेआधीच उघड झाले, असेही नेत्यान्याहू म्हणाले. इराणला रोखणे हे फक्त इस्रायलच नाही तर युरोपिय देशांच्या सुरक्षेसाठीही महत्त्वाचे ठरते, असा दावा इस्रायली पंतप्रधानांनी यावेळी केला.

इस्रायलमधील इतर नेते देखील खशोगी प्रकरणी सौदी अरेबियावर दबाव टाकण्याऐवजी अमेरिका व युरोपिय देशांनी युरोपमधील इराणच्या कटकारस्थानांकडे लक्ष पुरवावे, अशी मागणी केली आहे. इराणची राजवट डेन्मार्कमध्ये असलेल्या आपल्या विरोधकांचा काटा काढण्यासाठी कारस्थान आखत असल्याचा आरोप करून डेन्मार्कने याचा निषेध केला होता. तसेच डेन्मार्कने इराणमधून आपल्या राजदूतांना माघारी बोलावले होते. नॉर्वेनेही या प्रकरणी इराणच्या दूतावासाला समन्स बजावले आहेत. हा इस्रायलच्या इराणविरोधी कटाचा भाग असल्याचा आरोप इराणकडून केला जातो.

मात्र इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी इराण हा दहशतवादाचा सर्वात मोठा समर्थक देश असल्याचे सांगून इराणपासून युरोपिय देशांनांही फार मोठा धोका संभवतो, हे पटवून देण्यासाठी राजनैतिक आघाडीच उघडल्याचे दिसत आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info