ब्रिटनला ब्रेक्झिट करार नाकारण्याचे भयंकर परिणाम सोसावे लागतील – पंतप्रधान थेरेसा मे इशारा

ब्रिटनला ब्रेक्झिट करार नाकारण्याचे भयंकर परिणाम सोसावे लागतील – पंतप्रधान थेरेसा मे इशारा

लंडन – ‘ब्रेक्झिट’ करार मान्य करून घेण्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखविणार्‍या ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांना संसदेने पुन्हा एकदा पराभवाचा धक्का दिला. सलग तिसर्‍यांदा संसदेने पंतप्रधान मे व महासंघाने संयुक्तरित्या तयार केलेले ‘ब्रेक्झिट डील’ ३४४ विरुद्ध २८६ मतांनी फेटाळले. या नकाराचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा ब्रिटनच्या पंतप्रधानांनी दिला असून २०१५ सालानंतर तिसर्‍यांदा देश निवडणुकीला सामोरे जाईल, असे बजावले आहे. संसदेतील गोंधळ आणि राजधानी लंडनसह काही भागांमध्ये सुरू झालेली निदर्शने यामुळे ब्रिटन अराजकाच्या दिशेने जात असल्याचे संकेत राजकीय विश्‍लेषक व तज्ज्ञांनी दिले आहेत.

ब्रेक्झिट करार, फेटाळले, थेरेसा मे, युरोपिय महासंघ, निदर्शन, ब्रिटन, लिसा नंदी

शुक्रवारी रात्री ब्रिटनच्या संसदेत पुन्हा एकदा ‘ब्रेक्झिट’च्या विधेयकावर मतदान पार पडले. युरोपिय महासंघाबरोबर झालेल्या मूळ करारानुसार ब्रिटन २९ मार्चलाच बाहेर पडणार होता. त्यामुळे हे मतदान लक्ष वेधून घेणारे ठरले होते. या मतदानाला दोन दिवस राहिले असतानाच, पंतप्रधान थेरेसा मे यांनी कराराला समर्थन मिळाल्यास आपल्या पदाचा त्याग करण्याची तयारी दर्शविली होती. मे यांच्या या निर्णायक इशार्‍यामुळे सत्ताधारी पक्षातून कराराला होणारा टोकाचा विरोध मावळेल व त्याला मान्यता मिळेल, असे भाकित वर्तविण्यात आले होते.

ब्रेक्झिट करार, फेटाळले, थेरेसा मे, युरोपिय महासंघ, निदर्शन, ब्रिटन, लिसा नंदी

मात्र शुक्रवारी संसदेत झालेल्या मतदानात पंतप्रधान मे यांच्या ब्रेक्झिट कराराला ३४४ विरुद्ध २८६ अशा ५८ मतांच्या फरकाने पराभव पत्करावा लागला. मतदानादरम्यान सत्ताधारी पक्षातील ३४हून अधिक सदस्यांनी कराराच्या विरोधात मतदान केले. त्याचवेळी मे यांच्या सरकारला समर्थन देणार्‍या आयर्लंडच्या ‘डीयुपी’ या पक्षानेही विरोधात मत नोंदविले. त्यामुळे ‘ब्रेक्झिट’ पुन्हा एकदा नाकारली गेली आहे.

संसदेच्या या नकारानंतर पंतप्रधान मे प्रचंड निराश झाल्याचे समोर आले असून यापुढे ब्रिटनला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे खडसावले आहे. शुक्रवारी झालेले मतदान हा अखेरचा पर्याय होता, असा दावा करून यापुढे ब्रिटनच्या हातात काही राहिलेले नसेल, अशी खंतही मे यांनी व्यक्त केली. त्याचवेळी कोणताही नवा तोडगा निघाला नाही तर संसद बरखास्त करून पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागेल, असा खरमरीत इशाराही त्यांनी दिला.

ब्रिटनच्या संसदेने पंतप्रधान मे यांचा ‘ब्रेक्झिट’ करार तिसर्‍यांदा नाकारण्यापूर्वी त्याला असलेले इतर पर्यायही फेटाळून लावले आहेत. त्यामुळे ब्रिटनमधील राजकीय पक्षांना नक्की काय हवे आहे, याबद्दल प्रचंड गोंधळ व अनिश्‍चिततेचे वातावरण आहे. याचेच पडसाद देशाच्या विविध भागात उमटण्यास सुरुवात झाली आहे. काल रात्री संसदेने करार नाकारल्यानंतर राजधानी लंडनमध्ये हजारो नागरिकांनी निदर्शने करण्यास सुरुवात केली आहे. हे निदर्शक ‘ब्रेक्झिट’चे समर्थक असून त्यांची सुरक्षायंत्रणांशी चकमक उडाल्याचे वृत्त आहे.

या पार्श्‍वभूमीवर, ब्रिटीश प्रसारमाध्यमे व विश्‍लेषकांनी ‘ब्रेक्झिट’च्या पार्श्‍वभूमीवर सध्या निर्माण झालेली स्थिती देश अराजकाच्या दिशेने चालल्याचे संकेत देणारी आहे, असे दावे केले आहेत. संसदेबाहेर तसेच राजधानीच्या भागांमध्ये सशस्त्र पोलिसांची तैनाती व संसद सदस्यांना होणारी शिविगाळ हे वातावरण ‘सामान्य’ नसल्याची प्रतिक्रिया लेबर पार्टीच्या सदस्या लिसा नंदी यांनी दिली आहे.

दरम्यान, युरोपिय महासंघाकडूनही ‘ब्रेक्झिट’ कराराच्या पराभवावर तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. ब्रिटीश सरकारने १० एप्रिलच्या आत नवा प्रस्ताव द्यावा, नाहीतर १२ एप्रिलला ‘नो डील’सह ब्रिटन महासंघाच्या बाहेर पडलेला असेल, असा इशारा युरोपियन कौन्सिलचे प्रमुख डोनाल्ड टस्क यांनी दिला. ‘ब्रेक्झिट’च्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी १० एप्रिलला महासंघाची तातडीची बैठक बोलावण्यात आल्याचेही टस्क यांनी यावेळी जाहीर केले. टस्क यांच्या वक्तव्यानंतर आयर्लंड, ऑस्ट्रिया, बेल्जियम, डेन्मार्क या देशांमधील नेत्यांनीही ब्रिटीश संसदेतील निकालावर नाराजी व्यक्त केली आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info