अफगाणिस्तानच्या लष्कराच्या कारवाईत हजाराहून अधिक तालिबानी ठार – ३४ पाकिस्तानी दहशतवादीही मारले गेले

अफगाणिस्तानच्या लष्कराच्या कारवाईत हजाराहून अधिक तालिबानी ठार – ३४ पाकिस्तानी दहशतवादीही मारले गेले

काबुल – अफगाणी संरक्षणदलांनी गेले दोन आठवडे राबविलेल्या व्यापक मोहिमेत तब्बल एक हजारांहून अधिक पाकिस्तान पुरस्कृत तालिबानी दहशतवाद्यांना ठार करण्यात आले असून त्यात ३४ पाकिस्तानी दहशतवाद्यांचाही समावेश असल्याचे उघड झाले आहे. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. २९ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत अफगाणी लष्कर व सहयोगी दलांनी ही कारवाई पार पाडली, असेही यात सांगण्यात आले. गेल्या काही महिन्यात तालिबानकडून अफगाणिस्तानात होणार्‍या हल्ल्यांची तीव्रता वाढली असतानाच अफगाणी लष्कराला मिळालेले हे यश लक्ष वेधून घेणारे ठरते.

सध्या अमेरिकेसह रशिया, चीन, इराण हे देश तालिबानबरोबर शांतीचर्चा यशस्वी व्हावी म्हणून प्रयत्न करीत आहेत. अमेरिकेचे प्रतिनिधी एकीकडे शांतीकरार लवकरच होईल, असे संकेत देत आहेत. तर दुसर्‍या बाजूला शांतीचर्चेत सहभागी झालेली तालिबान, सरकार व जनतेला हल्ल्यांमध्ये नाहक मारले जाल, असे धमकावत आहे. काही दिवसांपूर्वी तालिबानने घडविलेल्या दहशतवादी हल्ल्यात १४ जणांचा बळी गेला होता तर १४५ जण जखमी झाले होते.

या पार्श्‍वभूमीवर अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेली माहिती महत्त्वाची ठरते. २९ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत जवळपास एक हजाराहून अधिक छोट्या-मोठ्या संयुक्त लष्करी मोहिमा राबविण्यात आल्या. या कारवायांमध्ये ११८६ पाकिस्तान पुरस्कृत तालिबानी दहशतवाद्यांना ठार करण्यात आले तर ५६८ दहशतवादी जखमी झाले आहेत. ५०हून अधिक तालिबानी दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

अफगाणिस्तानच्या संरक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गझनी, हेल्मंड, कंदाहार, कुंडूझ, कुनार यासह १०हून अधिक प्रांतांमध्ये कारवाई करण्यात आली. यात जवळपास २३१ हवाईहल्ल्यांचाही समावेश आहे.

अफगाणिस्तानातील जवळपास एक तृतियांश भागावर तालिबानचा अमल असल्याचे मानले जात असून ‘आयएस’सारखी दहशतवादी संघटनाही आपला विस्तार वाढविण्याच्या हालचाली करीत आहे. या पार्श्‍वभूमीवर अफगाणी संरक्षणदलाकडून होणारी कारवाई व त्यात पाकिस्तान पुरस्कृत तालिबानची झालेली हानी महत्त्वाची मानली जाते.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info