Breaking News

रशियन अणुप्रकल्पातील स्फोटात पाच शास्त्रज्ञ ठार – किरणोत्सर्गाच्या भीतीमुळे २५० किलोमीटर परिघातील प्रदेश रिकामा केला

मॉस्को/वॉशिंग्टन – गेल्या आठवड्यात रशियाच्या ‘सेवेर्दोविंच’ शहरात झालेल्या स्फोटाबाबत निर्माण झालेले गूढ कमी करण्याचा प्रयत्न रशियन यंत्रणांनी केला. ‘योनोक्सा’ येथील छोट्या अणुप्रकल्पाजवळ घेण्यात आलेली क्षेपणास्त्र चाचणी भयानकरित्या फसल्यामुळे झालेल्या स्फोटात पाच शास्त्रज्ञांचा बळी गेला, अशी घोषणा रशियन अणुऊर्जा संघटनेने केली. ही एक दुर्घटना असल्याचे रशियन यंत्रणांनी म्हटले आहे. तर रशियाच्या या अपयशी क्षेपणास्त्र चाचणीतून अमेरिकेला शिकण्यासारखे बरेच आहे, अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.

राजधानी मॉस्कोपासून ४०० किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘सेवेर्दोविंच’ शहरात ८ ऑगस्ट रोजी सकाळी मोठा स्फोट झाला. कानठळ्या बसविणारा हा स्फोट होता, असे स्थानिकांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केले होते. तर रशियन यंत्रणांनी यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले होते. या स्फोटानंतर सदर ठिकाणापासून अडीचशे किलोमीटर पर्यंत पसरलेल्या प्रदेशातील नागरिकांना तातडीने इतरत्र हलविण्यात आले. तसेच स्फोटाची जागा लष्कराने ताब्यात घेतली होती.

राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी तातडीने संरक्षणमंत्री तसेच लष्करी अधिकार्‍यांची बैठक घेऊन वरिष्ठ अधिकार्‍यांना ‘सेवेर्दोविंच’साठी रवाना केले होते. अवघ्या काही तासात झालेल्या या घडामोडींमुळे या घटनेकडे जगभरातील माध्यमांचे लक्ष लागले होते. या स्फोटाच्या आठवडाभरआधी रशियात किमान दोन ठिकाणी मोठे स्फोट झाले होते. पण या दोन्ही स्फोटांवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात लष्करी हालचाली झाली नव्हती. त्यामुळे सेवेर्दोविंच स्फोटाप्रकरणी रशियन सरकार काहीतरी लपविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप ब्रिटिश माध्यमांनी सुरू केला होता.

या स्फोटाविषयी चार दिवस मौन पाळल्यानंतर सोमवारी रशियन यंत्रणांनी याबाबतची पहिली माहिती जाहीर केली. येथील छोट्या अणुप्रकल्पाजवळ एक लष्करी तळावर क्षेपणास्त्र चाचणी घेण्यात येत होती. पण तांत्रिक बिघाडामुळे ही चाचणी फसली आणि मोठा स्फोट झाला. या स्फोटात पाच शास्त्रज्ञांचा बळी गेळा असून सोमवारी त्यांना ‘नॅशनल हिरो’ म्हणून गौरविण्यात आले. या घटनेची रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गंभीर दखल घेतल्याचा दावा केला जातो.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन अणुप्रकल्पाजवळ झालेल्या या स्फोटावर प्रतिक्रिया देताना ‘स्कायफॉल’ असा उल्लेख केला. ‘‘रशियन ‘स्कायफॉल’मुळे सगळ्यांच्याच चिंता वाढल्या होत्या. रशियाच्या या अपयशातून अमेरिका या घटनेतून नक्की बोध घेईल. पण आमच्याकडे रशियापेक्षा अधिक प्रगत तंत्रज्ञान आहे’’, असे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info