Breaking News

इराणच्या खामेनी यांनीच सौदीवरील हल्ल्याचे आदेश दिले – खामेनी यांच्या राजवटीला विरोध करणार्‍यांचा आरोप

पॅरिस – गेल्या महिन्यात सौदी अरेबियाच्या इंधनप्रकल्पांवर झालेल्या विध्वंसक हल्ल्याचे आदेश इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांनीच दिले होते. खामेनी यांनी दिलेल्या या आदेशानंतर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे वरिष्ठ अधिकारी ब्रिगेडिअर जनरल मोहम्मद फलाह यांच्या नेतृत्वाखाली सौदीच्या इंधनप्रकल्पांवर क्षेपणास्त्र हल्ले चढविण्यात आले, असा आरोप इराणच्या राजवटीचे कडवे विरोधक असलेल्या ‘नॅशनल कौंसिल ऑफ रेझिस्टंस’ने (एनसीआरआय) केला.

इराणच्या राजकीय घडामोडींवर सर्वाधिक प्रभाव असलेल्या धर्मगुरु खामेनी यांच्या अध्यक्षतेत ३१ जुलै रोजी राष्ट्रीय सुरक्षा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी, परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ तसेच ‘रिव्होल्युशनरी गार्ड्स’चे (आयआरजीसी) वरिष्ठ कमांडर्स या बैठकीत उपस्थित होते, असा दावा ‘एनसीआरआय’ने ब्रिटिश वृत्तसंस्थेकडे केला. या बैठकीत खामेनी यांनी ‘आयआरजीसी’च्या कमांडर्सना सौदी अरेबियाच्या इंधनप्रकल्पांवर ‘या-अली’ क्रूज क्षेपणास्त्र प्रक्षेपित करण्याचे आदेश दिले, अशी माहिती ‘एनसीआरआय’ने दिली.

खामेनी यांच्या आदेशानंतर ‘आयआरजीसी’च्या कमांडर्सनी सौदीच्या अबकैक, खुरैस या दोन सर्वात मोठ्या इंधनप्रकल्पांवर हल्ले चढविण्याची योजना तयार केली. या हल्ल्याची सूत्रे ब्रिगेडिअर जनरल फलाह यांच्याकडे सोपडवून १४ सप्टेंबर रोजी हल्ले चढविण्याचे निश्‍चित झाल्याचे ‘एनसीआरआय’चे प्रवक्ते शाहिन गोबादी यांनी सांगितले. सौदीच्या इंधनप्रकल्पांवरील हल्ल्यांबरोबरच इराणने आपल्या लष्कराला सज्जतेचे आदेश दिले होते. सौदीने इराणवर हल्ला चढविलाच तर त्याला प्रत्युत्तर देण्याची तयारीही इराणने ठेवली होती. तसेच देशांतर्गत उठाव व निदर्शने सुरू होऊ नये म्हणून अंतर्गत सुरक्षाही वाढविली होती, असे गोबादी म्हणाले.

सौदीच्या इंधनप्रकल्पांवरील क्षेपणास्त्र हल्ले म्हणजे युद्धगुन्हा ठरतो. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघ आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने इराणमधील खामेनी-रोहानी राजवटीविरोधात कठोर भूमिका स्वीकारावी, अशी मागणी ‘एनसीआरआय’ने केली आहे.

खामेनी राजवटीचे कडवे विरोधक असलेली ‘एनसीआरआय’ ही संघटना फ्रान्समध्ये कार्यरत आहे. दरवर्षी इराणमधील राजवट उलथण्यासाठी ‘एनसीआरआय’कडून जगभरातील नेत्यांना आवाहन केले जाते. या संघटनेकडे इराणमधील खामेनी राजवट, आण्विक तसेच क्षेपणास्त्र कार्यक्रम आणि इतर लष्करी हालचालींबाबत गोपनीय माहिती असल्याचे याआधीही उघड झाले होते. त्यामुळे या संघटनेने केलेल्या दाव्यांकडे गांभीर्याने पाहिले जाते.

अमेरिका व सौदी अरेबियाने इंधनप्रकल्पांवरील हल्ल्यांसाठी इराणच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. या हल्ल्यात वापरण्यात आलेली क्षेपणास्त्रे इराणी बनावटीची असल्याचे पुरावे सादर करून सौदीने इराणविरोधात राजनैतिक आघाडी उघडली होती. ब्रिटन, फ्रान्स व जर्मनीने देखील सौदीच्या या आरोपांना दुजोरा दिला. मात्र इराणने आपल्यावरील हे आरोप फेटाळून हे हल्ले येमेनमधील हौथी बंडखोरांनीच केल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर इराणवर कारवाईचा विचार जरी केला तरी सर्वंकष युद्ध पुकारण्याची धमकी इराणने दिली होती.

हिंदी    English

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info