Breaking News

लेबेनॉन आणखी एका स्फोटाने हादरले

बैरूत – सात आठवड्यानंतर लेबेनॉन पुन्हा एकदा शक्तिशाली स्फोटाने हादरले. राजधानी बैरूतच्या दक्षिणेकडे असलेल्या ‘ऐन काना’ येथील हिजबुल्लाहच्या शस्त्रास्त्रांच्या कोठारात हा स्फोट झाला असून यामध्ये अनेकजण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. स्फोटानंतर हिजबुल्लाहच्या दहशतवादी व समर्थकांनी सदर भागाचा ताबा घेऊन माध्यमांना प्रवेश नाकारला आहे. त्याचबरोबर तांत्रिक कारणांमुळे हा स्फोट झाल्याचे स्पष्टीकरण हिजबुल्लाह व लेबेनीज यंत्रणांनी दिले आहे. त्यामुळे बैरूतप्रमाणे हा स्फोट आणि याचे हिजबुल्लाहशी असलेले कनेक्शन याकडे संशयाने पाहिले जात आहे.

स्फोटाने हादरले

बैरूतपासून ३० मैल अंतरावर असलेल्या ‘ऐन काना’ या गावात मंगळवारी भीषण स्फोट झाला. या स्फोटाने जबर हादरे बसल्याचा दावा आजूबाजूच्या भागातील नागरिकांनी केला. तर या स्फोटाने घटनास्थळी असलेल्या इमारतीच्या ठिकर्‍या उडाल्या असून धूराचे प्रचंड लोट बाहेर पडत असल्याची माहिती समोर येत आहे. या स्फोटात प्रचंड प्रमाणात जीवितहानी झाली असून शेकडो जण जखमी झाल्याचे दावे प्रत्यक्षदर्शींनी माध्यमांशी बोलताना केले आहेत. पण हिजबुल्लाहने या स्फोटात फार मोठी हानी झाली नसल्याचे सांगून याप्रकरणी सारवासारवीचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर हिजबुल्लाहने या स्फोटानंतर घटनास्थळाचा ताबा घेऊन वेगाने हालचाली सुरू केल्याच्या बातम्या आहेत.

या ठिकाणी हिजबुल्लाहने इराणकडून मिळालेली शस्त्रास्त्रे जमा केली होती, असा दावा केला जातो. यामध्ये रॉकेट्स, क्षेपणास्त्रांचा साठा असल्याचे बोलले जाते. त्यामुळे कानठळ्या बसविणारा स्फोट झाल्याची शक्यता वर्तविण्यात येते. मात्र या स्फोटाचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. हिजबुल्लाहने तांत्रिक कारण असल्याचे सांगून सदर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ४ ऑगस्ट रोजी बैरूतमध्ये झालेल्या संशयास्पद स्फोटावर चर्चा करणे हिजबुल्लाहने टाळले होते. पण हिजबुल्लाहनेच बैरूतमधील स्फोटाचे कारण ठरलेल्या अमोनियम नायट्रेटचा येथील कोठारात प्रचंड साठा केला होता, हे कालांतराने समोर आले होते. या स्फोटात किमान २०० जणांचा बळी तर हजारो जण जखमी झाले होते. त्यानंतर लेबेनॉनमध्ये हिजबुल्लाहविरोधात निदर्शनेही झाली होती.

स्फोटाने हादरले

हिजबुल्लाहने इस्रायलवर हल्ले चढविण्यासाठी अमोनियम नायट्रेटचा साठा केल्याचा आरोप इस्रायली वृत्तसंस्थेने केला होता. काही वर्षांपूर्वी हिजबुल्लाहने इस्रायलला तशी धमकीही दिली होती, याची आठवण इस्रायली वृत्तसंस्थेने करुन दिली होती. तर हिजबुल्लाहने इराणच्या साथीने युरोपमध्ये देखील अमोनियम नायट्रेटचा साठा केल्याचा आरोप अमेरिका व इस्रायलने केला होता. गेल्या काही वर्षात युरोपिय देशांच्या सुरक्षा यंत्रणांनी हिजबुल्लाह समर्थकांच्या ठिकाणी केलेल्या कारवाईत हा साठा जप्त करण्यात आला होता. इराण तसेच हिजबुल्लाह प्रमुखाच्या आदेशांनुसार युरोपमधील अमेरिका, इस्रायलच्या हितसंबंधांवर हल्ले चढविण्यासाठी या अमोनियम नायट्रेटचा स्फोटकांमध्ये वापर केला जाणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

दरम्यान, ऐन काना भागात झालेल्या या स्फोटाच्या काही तास आधी या हवाई क्षेत्रातून इस्रायली विमानांनी अनेकवेळा घिरट्या घातल्याचा दावा लेबेनॉनच्या स्थानिक वृत्तसंस्थेने केला आहे. मंगळवार सकाळपर्यंत इस्रायली विमानांच्या घिरट्या सुरूच होत्या, असे या वृत्तसंस्थेचे म्हणणे आहे. तर इस्रायलने लेबेनॉनमधील या स्फोटाप्रकरणी प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info